मुंबई आणि सोलापूर येथील ‘हिंदू एकता दिंड्यां’मध्ये घडला हिंदूऐक्याचा अभूतपूर्व आविष्कार !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवानिमित्त हिंदु राष्ट्र-जागृती अभियान

मुंबई, १९ मे (वार्ता.) – हिंदु राष्ट्र स्थापनेचे प्रेरणास्रोत परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने भारतभर हिंदु राष्ट्र-जागृती अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाच्या अंतर्गत १९ मे या दिवशी मुंबई येथील गिरणगाव परिसरात, तर सोलापूर येथे ‘हिंदू एकता दिंडी’ काढण्यात आली. या दिंडीतून हिंदूऐक्याचा अभूतपूर्व आविष्कार घडला.

मुंबई येथील दिंडीत धर्मध्वजाचे पूजन करतांना हिंदुत्वनिष्ठ श्री. विशाल शिंदे आणि सौ. अश्‍विनी शिंदे

मुंबई – अश्‍वारूढ वीरांगना, लाठी-काठी, दांडपट्टा, दंडसाखळी आदी मर्दानी खेळ, विविध लोककला सादर करत विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना या दिंडीत सहभागी झाल्या होत्या. सनातन आणि विविध संप्रदाय यांचे साधक, हितचिंतक, दैनिक सनातन प्रभातचे वाचक आदी शेकडो राष्ट्र आणि धर्म प्रेमी या ‘हिंदू एकता दिंडी’मध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. यांसह अधिवक्ता, डॉक्टर, उद्योजक यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरही सहभागी झाले होते. या दिंडीमध्ये सनातनच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांचा वंदनीय सहभाग लाभला.

आर्थर रोड (चिंचपोकळी) येथून आरंभ झालेल्या दिंडीच्या आरंभी धर्मध्वजाचे पूजन करण्यात आले. मुंबईची ग्रामदेवता मुंबादेवी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची पालखीत ठेवण्यात आलेली प्रतिमा यांचे पूजन झाल्यानंतर श्रीफळ वाढवून अन् शंखनाद करून दिंडी मार्गस्थ करण्यात आली. ना.म. जोशी मार्ग, करी रोड येथून मार्गक्रमण करत लालबाग येथील भारतमाता चौकात दिंडींचे रूपांतर भव्य सभेत करण्यात आले.

सोलापूर येथे पालखीत ठेवलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रतिमेचे औक्षण करतांना पाच सुहासिनी

सोलापूर – उत्तम नियोजन आणि विविधतेने नटलेल्या या सोलापूर येथील दिंडीने सोलापूरवासियांच्या हृदयाचा ठाव घेतला. बाळी वेस, जाजू भवन येथे शंखनादाने आणि धर्मध्वज पूजनाने दिंडीचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी प्रथम धर्मध्वज, त्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्री भवानीदेवी यांची प्रतिमा असलेल्या अन् फुलांची मनमोहक सजावट केलेल्या २ पालख्या, कलश घेतलेल्या महिला, पारंपरिक वेशातील रणरागिणी आणि कार्यकर्ते, क्रांतीकारकांच्या वेशातील बालचमू, स्वरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके यांसमवेत राष्ट्र आणि धर्म यांच्याप्रती निष्ठा वाढवणार्‍या घोषणांनी सोलापूर शहर दणाणून गेले होते.


Multi Language |Offline reading | PDF