देवाकडे कधी काही मागत नाही ! – पंतप्रधान मोदी

  • ‘मोदी यांनी देवाकडे काही मागावे’, अशी धर्मप्रेमी हिंदूंची अपेक्षा नाही; मात्र हिंदुद्वेष्ट्यांपासून हिंदूंच्या मंदिरांचे आणि देवतांच्या मूर्तींचे रक्षण करावे, अशी अपेक्षा आहे !
  • ‘शबरीमला प्रकरणात हिंदूंच्या धर्मभावनांचा आदर करावा, तसेच मंदिरांचे सरकारीकरण, हिंदूंचे होणारे धर्मांतर, हिंदूंच्या देवतांचा होणारा अवमान आदी घटना मोदी यांनी थांबवणे देवालाही अपेक्षित आहे’, असेच हिंदूंना वाटते ! 

केदारनाथ (उत्तराखंड) – देवदर्शनाला आल्यानंतर मी देवाकडे काही मागत नाही. देवाकडे काही मागण्यावर माझा विश्‍वास नाही. देवाने आपली निर्मिती देण्यासाठी केली आहे, मागण्यासाठी नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. केदारनाथमध्ये १८ मेच्या रात्री गरुडचट्टी येथे एका गुहेमध्ये मोदी यांनी १८ घंटे ध्यानधारणा केली. त्यानंतर १९ मेच्या सकाळी पत्रकारांशी संवाद साधतांना त्यांनी उपरोक्त विचार मांडले. ध्यानधारणा केल्यानंतर मोदी यांनी सकाळी उठून केदारनाथ मंदिरात पूजा केली. ‘बर्‍याच काळानंतर मला गुहेत ध्यानधारणा करण्याची संधी मिळाली’, असेही ते या वेळी म्हणाले.

१. मोदी पुढे म्हणाले की, निवडणुकीच्या धामधुमीनंतर मला येथे ध्यानधारणा करण्याची संधी मिळाली. आध्यात्मिक क्षेत्राला जाण्याची संधी मिळाली, केदारनाथच्या विकासासाठी कामे चालू आहेत. येथे काम करण्याची संधी अल्पच मिळते. येथील विकासकामांवर माझे नेहमी लक्ष असते.

२. लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर मोदी यांनी १८ मे या दिवशी केदारनाथ धामला भेट देत महादेवाचे दर्शन घेतले, तसेच १९ मे या दिवशी त्यांनी बद्रीनाथ धाम येथे जाऊन दर्शन घेतले. मागील २ वर्षांतील पंतप्रधान मोदी यांचा हा चौथा केदारनाथ दौरा आहे.

३. मोदी यांच्या या देवदर्शनावर विरोधकांनी टीका केली आहे. ‘मोदी यांनी कितीही देवदर्शन घेतले, तरीसुद्धा भाजपचा पराभव अटळ आहे’, असे काँग्रेसने म्हटले आहे. (प्रत्येक गोष्टीचे राजकारण करणार्‍या काँग्रेसने राहुल गांधी यांनीही गेली २-३ वर्षे हिंदूंची मते मिळवण्यासाठी मंदिरात जाण्याचा सपाटा लावला होता, त्याविषयी बोलावे. – संपादक) 

गुहेचे वैशिष्ट्य

समुद्रसपाटीपासून १२ सहस्र फुटाच्या उंचीवर असलेल्या या मानवनिर्मित गुहेत शौचालयापासून ते सीसीटीव्हीपर्यंतच्या सर्व अद्ययावत सुविधा उपलब्ध आहेत. या गुहेला ‘रूद्र गुफा’ असे नाव देण्यात आले आहे. ती पहाडी पद्धतीने दगडांपासून बनवण्यात आली आहे. येथे झोपण्यासाठी पलंगही ठेवण्यात आला आहे. त्यामुळे त्यावर बसून किंवा जमिनीवर बसून ध्यानधारणा करता येते. या गुहेची उंची १० फूट असल्याने आतमध्ये गुदमरायला होत नाही. तसेच गुहेला एक खिडकी असल्याने हवा खेळती रहते आणि त्या खिडकीतून केदारनाथाचे दर्शन करता येते. आता भाविकांना ही गुहा वापरण्यासाठी खुली करण्यात येणार आहे. एका भाविकाला किमान ३ दिवस येथे वास्तव करता येते. त्यासाठी भाविकांना नोंदणी करावी लागणार आहे. परिसरात अशा ५ गुहा उभारण्यात येणार आहेत.


Multi Language |Offline reading | PDF