कोणी पाणी देता का पाणी ?

आज पाण्यासाठी महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांतच नव्हे, तर शहरी भागातही लोकांना वणवण फिरावे लागत आहे. मागील वर्षी चांगला पाऊस पडला असला, तरी यंदाही दुष्काळाचे सावट काही महाराष्ट्राची पाठ सोडतांना दिसत नाही. मार्च मासापासूनच नदी, नाले, तलाव आणि धरणातील पाण्याच्या साठ्यांनी तळ गाठायला प्रारंभ केला. परिणामी शहरी भागांतील पाणीपुरवठ्यात कपात करण्याची नामुष्की त्या त्या ठिकाणच्या स्थानिक प्रशासनावर ओढवली आहे, तर ग्रामीण भागात टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. बरे, टँकरने पुरवले जाणारे पाणी पिण्यालायक किती ?, याविषयीही शंकाच आहे. मुंबईलगत असलेल्या रायगड जिल्ह्यातील १५ पैकी ७ तालुक्यांमध्ये दूषित जलस्रोत असल्याचे निष्पन्न झाले आहे. एप्रिलमध्ये रायगड जिल्ह्यातील ८ सहस्र २९० जलस्रोतांपैकी १०.१२ टक्के म्हणजेच ८३९ जलस्रोतांचे नमुने पडताळणीकरिता घेतले होते. त्यापैकी २१८ नुमन्यांची जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेने पडताळणी केली असता त्यातील १८ टक्के म्हणजे ३९ जलस्रोत दूषित सापडले आहेत. एका रायगड जिल्ह्याची ही स्थिती, तर संपूर्ण महाराष्ट्रातील स्थितीचा विचारच न केलेला बरा !

महाराष्ट्राच्या अनेक भागांत दुष्काळामुळे गुराढोरांना प्यायला पाणी नाही. विदर्भ-मराठवाड्यामध्ये तर घरातील लोकांना प्यायला पाणी नाही, तर बाहेरून आलेल्या पाहुण्यांना कोठून देणार, अशी स्थिती आहे. तसेच दुष्काळामुळे ग्रामीण भागातील कुटुंब मुंबई, नवी मुंबई, पनवेल, ठाणे या शहरांमध्ये स्थलांतरित झाले आहेत. एखाद्या पुलाखाली वा मिळेल तिथे रात्र काढायची आणि दिवसा पोटापाण्यासाठी रोजगाराच्या शोधात फिरायचे हे विदारक वास्तव आज शहरात पहायला मिळत आहे. पालघर आणि नाशिक या जिल्ह्यांतील आदिवासी पाड्यांमध्ये तर महिलांना चार-पाच किलोमीटरपर्यंत पायपीट करून पाणी आणावे लागत आहे. काही ठिकाणी तर महिलांना हंडाभर पाण्यासाठी ४०-५० फूट खोल विहिरीत जीव धोक्यात घालून दोरखंडाच्या साहाय्याने उतरावे लागत आहे. सार्वजनिक नळ असो वा गावात आलेला पाण्याचा टँकर असो, या ठिकाणी पाण्यासाठी होणार्‍या हाणामार्‍या हे आता नवीन राहिलेले नाही. भविष्यात ‘पाण्यासाठी देशा-देशांमध्ये युद्ध होतील’, असे पूर्वी जे भाकीत वर्तवण्यात आले होते, तो दिवस आता दूर नाही, हे या सर्व परिस्थितीवरून स्पष्ट होते.

विकासाच्या नावाखाली होणारी बेसुमार जंगलतोड, आग ओकणारे विषारी रासायनिक कारखाने, वाहनांची वाढती संख्या, बंदीनंतरही प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात होणारा वापर, या आणि अशा अनेक गोष्टी पर्यावरणाच्या हानीला कारणीभूत आहेत; मात्र दारी येऊन ठेपलेल्या संकटानंतरही मनुष्य सावध होतांना दिसत नाही. त्यामुळे आज माणसाला पाण्याच्या शोधात पायपीट करावी लागते आहे. भविष्यात पाणी.. पाणी… करत जीव तोडावा लागला, तर त्यात आश्‍चर्य ते काय ?

– श्री. यज्ञेश सावंत, सनातन आश्रम, देवद, पनवेल.


Multi Language |Offline reading | PDF