साधकांना श्रीसत्यनारायण रूपातील गुरुदर्शनाने कृतकृत्य करणारा आणि निर्गुण स्तराची अनुभूती देणारा परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७७ वा जन्मोत्सव सोहळा !

आज्ञेने महर्षींच्या, गुरु प्रगटले स्वस्वरूपात । यापूर्वी दिधले दर्शन राम, कृष्ण अन् विष्णु रूपांत ॥
आता करण्या कलियुगी साधकांच्या त्रासांवर मात । श्रीगुरु जन्मोत्सवी प्रगटले,
श्री सत्यनारायण रूपात । भावविभोर साधक, त्यांचा आनंद मावेना गगनात ॥

सध्याच्या कलियुगांतर्गत घोर कलियुगात साधकाला त्याच्या मनीषा पूर्ण करत मोक्षापर्यंत घेऊन जाणारे भगवान श्रीविष्णूचे करुणामय रूप म्हणजे ‘श्रीसत्यनारायण’ ! कृपाळू भगवंत त्याच्या भक्तांसाठी ‘अंतिम सत्य’ आणि ‘करुणाकर’ अशा ‘श्रीसत्यनारायण’ स्वरूपात प्रगटतो अन् त्यांना मोक्षापर्यंतची वाटचाल दाखवतो. सनातनचे साधक आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात प्रत्यक्ष अन् अप्रत्यक्षरित्या सहभागी असलेले धर्मप्रेमी यांच्यासाठी आधारस्थान असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले हे पृथ्वीतलावरील एकमेवाद्वितीय मोक्षगुरु आहेत. साधकांना आनंद देणारे आणि साधकांचा आनंद बनलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव म्हणजे वर्षभर पुरणारी चैतन्याची पर्वणीच असते. पूर्णावतारी भगवान श्रीकृष्ण, मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीराम आणि शेषशायी श्रीमन्नारायण या रूपांमध्ये दर्शन दिल्यानंतर ‘७७ व्या जन्मोत्सवाला गुरुमाऊली कोणत्या रूपात दर्शन देणार ?’, याची प्रत्येकच साधकाला उत्कंठा होती. अशातच वैशाख शुक्ल पक्ष सप्तमी (११ मे) हा दिवस साधकांच्या जीवनात नवचैतन्य घेऊन आला आणि ‘श्रीसत्यनारायण’ रूपातील गुरुदर्शनाने प्रत्येक साधक जीव कृतकृत्य झाला. ‘परात्पर गुरूंचे श्रीसत्यनारायण रूप हे भगवान श्रीविष्णूंच्या विश्‍वरूपाप्रमाणे असेल’, असे मयन महर्षींनी सांगितले होते. प्रत्यक्षात या सोहळ्यात श्रीसत्यनारायण रूपातील श्रीगुरूंचे दर्शन घेतांना साधकांना भगवंताच्या विश्‍वरूपाचे दर्शन होत असल्याची अद्वितीय अनुभूती आली. हा संस्मरणीय सोहळा शब्दब्रह्माच्या माध्यमातून पुनःपुन्हा अनुभवता यावा, यासाठी सोहळ्याचा सचित्र वृत्तांत येथे प्रसिद्ध करत आहोत. भगवान श्रीविष्णूची स्तुती केल्याने आपला भाव जागृत होऊन भगवंताचे तत्त्व आपल्याला अधिकाधिक प्रमाणात ग्रहण करता येते. या वृत्तांकनाच्या माध्यमातून श्रीसत्यनारायणाच्या रूपातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी ही स्तुतीपर शब्दसुमनांजली कृतज्ञतापूर्वक अर्पण करत आहोत ! ‘परात्पर गुरूंच्या श्रीसत्यनारायण रूपाचे अखंड स्मरण रहावे आणि श्रीगुरूंना अपेक्षित असे राष्ट्र-धर्माचे कार्य आमच्याकडून घडावे’, ही प्रार्थनारूपी याचना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी या वृत्ताच्या माध्यमातून करत आहोत.

दिव्यधुनीमकरन्दे परिमलपरिभोगसच्चिदानन्दे ।
श्रीपतिपदारविन्दे भवभयखेदच्छिदे वन्दे ॥

अर्थ : ज्या कमळांचा मकरंद म्हणजे गंगा आहे आणि सुगंध म्हणजे सच्चिदानन्द आहे, तसेच जे संसारभय नष्ट करणार्‍या अशा भगवान लक्ष्मीपती श्रीविष्णूच्या चरणकमलांना मी वंदन करतो.

कृतज्ञता पुष्पे अर्पितो श्रीगुरुचरणी । महर्षींच्या कृपेने गुरुदर्शन लाभले या नयनी ॥
घडण्या श्रीगुरूंचे दर्शन सर्वांना शब्दसुमनांतूनी । अर्पितो जन्मोत्सव शुभवार्ता तव चरणी ॥
सत्यनारायणाची ही वार्ता देईल आनंद त्रिभुवनी । देईल आनंद त्रिभुवनी ॥

परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांशी बसून ‘श्रीविष्णु गायत्री’ मंत्राच्या घोषात कृतज्ञतापूर्वक पुष्पार्चना करतांना डावीकडे सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ, तर ‘श्रीमहालक्ष्मी गायत्री’ मंत्राच्या घोषात पुष्पार्चना करण्याच्या सिद्धतेत सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

क्षणचित्रे

१. सोहळ्याच्या शेवटी प.पू. दास महाराज यांनी श्रीसत्यनारायण रूपातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्कार केला. प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) माई यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना श्रीकृष्णाची मूर्ती अर्पण करून साष्टांग नमस्कार केला अन् परात्पर गुरुमाऊलींना प्रदक्षिणा घातली.

२. जन्मोत्सवाच्या निमित्ताने आश्रमात पणत्या आणि समया प्रज्वलित करून दीपसोहळा साजरा करण्यात आला.

३. सोहळ्याच्या वेळी महर्षि मयन यांनी सांगितल्यानुसार परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी जांभळ्या रंगाची वस्त्रे परिधान केली होती, तर सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी हिरव्या रंगाची आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी पिवळ्या रंगाची साडी नेसली होती.

४. कार्यक्रमस्थळी ३ दिशांना ‘आत्मार्थ गणेशा’चे प्रतीक म्हणून षोडशोपचार पूजन केलेल्या चांदीच्या ३ श्री गणेशमूर्ती परात्पर गुरूंच्या श्री सत्यनारायण रूपाची साक्ष म्हणून ठेवण्यात आल्या होत्या.

५. सोहळ्याला आरंभ होण्यापूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जीवनपट आणि त्यांचे अद्वितीय कार्य, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने रामनाथी आश्रमात पार पडलेले धार्मिक विधी अन् आतापर्यंत साजरे करण्यात आलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे जन्मोत्सव यांसंदर्भातील ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली. त्यामुळे साधकांच्या भावस्मृतींना उजाळा मिळाला.

६. सोहळ्याचे संगणकीय प्रणालीद्वारे प्रक्षेपण करण्यात आले. यात तांत्रिक अडचणी आल्यामुळे सोहळ्यातील आरंभीच्या १० मिनिटांच्या भागाचे पुनर्प्रक्षेपण करावे लागले. सोहळ्याच्या शेवटी सोहळा दाखवण्यासाठी वापरण्यात आलेली संगणकीय प्रणाली अचानकपणे बंद पडली. यापूर्वी अशा प्रकारे संगणकीय प्रणाली बंद पडली नव्हती. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी धारण केलेल्या ‘श्रीसत्यनारायण’ रूपातील दर्शनाचा सूक्ष्मातून पुष्कळ मोठा परिणाम होणार’, असे महर्षींनी सोहळ्याच्या प्रारंभीच सांगितले होते. संगणकीय प्रणाली अचानक बंद पडणे, हा वाईट शक्तींच्या आक्रमणाचा परिणाम होता.

७. सद्गुरुद्वयी, तसेच सोहळ्यात वापरण्यात आलेल्या निरनिराळ्या वस्तू यांची यूनिव्हर्सल थर्मो स्कॅनर (यू.टी.एस्.) या संगणकीय प्रणालीद्वारे चाचणी करण्यात आली.

८. भारतातील १० सहस्रांहून अधिक साधकांनी, तसेच उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, एशिया पॅसिफिक आणि युरोप येथील १९५ साधकांनी या सोहळ्याचा संगणकीय प्रणालीद्वारे लाभ घेतला.

परात्पर गुरु डॉक्टरांना श्रीसत्यनारायणाच्या रूपात जवळून पहाण्याचे भाग्य लाभलेले सोहळ्यात उपस्थित संत आणि साधक !

१. पू. बाबा नाईक,  २. पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ, ३. पू. वैद्य विनय भावे ४. पू. पृथ्वीराज हजारे, ५. पू. संदीप आळशी, ६. ती. अनंत आठवले (ती. भाऊकाका) (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू),  ७. सौ. सुनीती अनंत आठवले, ८. कु. अनघा आठवले (ती. अनंत आठवले यांची नात)

१. प.पू. दास महाराज, २. पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक, ३. पू. (सौ.) शैलजा सदाशिव परांजपे, ४. पू. सदाशिव परांजपे, ५. सौ. ज्योती सुदिन ढवळीकर, ६. सौ. लता दीपक ढवळीकर, ७. पू. (कु.) रेखा काणकोणकर


Multi Language |Offline reading | PDF