परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने महर्षींच्या आज्ञेने केलेले धार्मिक विधी आणि जन्मोत्सव सोहळा यांसंदर्भातील संशोधनातून त्यांचा आध्यात्मिक स्तरावरील व्यापक लाभ लक्षात येणे

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दीर्घायुरारोग्य लाभावे, हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यातील सर्व अडथळे दूर व्हावेत, या कार्यात सहभागी असलेल्या साधकांसह सर्व हिंदुत्वनिष्ठांचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास दूर व्हावेत, तसेच सर्वांचे आयुष्यवर्धन व्हावे’, या हेतूने ५ मे २०१९ ते १२ मे २०१९ या कालावधीत रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ऋषींच्या आज्ञेने विविध धार्मिक विधी करण्यात आले.

यू.टी.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

या विधींच्या आध्यात्मिक स्तरावरील परिणामाचा अभ्यास ‘युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर’ (यू.टी.एस्.) हे आधुनिक वैज्ञानिक उपकरण, तसेच सूक्ष्म परीक्षण यांच्या माध्यमातून करण्यात आला. यासाठी ‘यू.टी.एस्.’ने केलेल्या अभ्यासाच्या अंतर्गत विविध विधींमध्ये वापरलेल्या वस्तूंचा विधीच्या पूर्वी आणि नंतर केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या. विधींच्या यजमान सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या विधीच्या आधी ‘यू.टी.’ स्कॅनरने केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या. दोन्ही सद्गुरूंच्या विधीनंतरच्या मोजण्यांच्या नोंदी करता आल्या नाहीत. याचे कारण ‘त्या नोंदी अनुमाने ८०० मीटरच्या पुढे जात असल्याने मोजण्यांच्या नोंदी करण्यासाठी आम्ही ज्या ठिकाणी जातो (एक औद्योगिक वसाहत), तिथे एवढा सलग भूभाग उपलब्ध नव्हता’, हे आहे.

११.५.२०१९ या दिवशी झालेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सव सोहळ्यात त्यांनी परिधान केलेल्या श्रीसत्यनारायण वेशातील वस्त्रालंकारांच्याही ते परिधान करण्यापूर्वी आणि केल्यानंतर केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या. या मोजण्यांच्या नोंदींचा अभ्यास, तसेच सूक्ष्म परीक्षणातून मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे त्यांचे विश्‍लेषण अद्याप पूर्ण झालेले नाही. हा अभ्यास पूर्ण झाल्यावर वाचकांसाठी या संशोधनाचे निष्कर्ष लेखमालेच्या रूपात या दैनिकातून प्रसिद्ध करण्यात येतील. आतापर्यंत झालेल्या अभ्यासातील काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे वाचकांसाठी येथे संक्षिप्त रूपात देत आहोत.

विष्णुयागाची पुर्णाहुती देतांना डावीकडून श्री. ईशान जोशी, श्री. अमर जोशी, सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

१. विधींमध्ये वापरलेल्या सर्व वस्तूंची सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ आणि एकूण प्रभावळ विधीनंतर पुष्कळ वाढली.

२. सद्गुरुद्वयींच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ आणि एकूण प्रभावळ प्रत्येक विधीनंतर पुष्कळ वाढणे

‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांच्यातील नकारात्मक ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा आणि एकूण प्रभावळ (ऑरा) मोजता येते. सामान्य व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये नकारात्मक ऊर्जा असू शकते; परंतु सकारात्मक ऊर्जा असेलच, असे नाही. ‘सामान्य व्यक्ती किंवा वस्तू यांची एकूण प्रभावळ साधारण १ मीटर असते’, हे लक्षात घेऊन पुढील सारणी वाचावी.

२ अ. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या पूजेपूर्वीच्या आणि होमापूर्वीच्या मोजण्यांच्या नोंदी

२ आ. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या पूजेपूर्वीच्या आणि होमापूर्वीच्या मोजण्यांच्या नोंदी

वरील २ सारण्यांमधून पुढील सूत्रे लक्षात येतात.

१. धार्मिक विधी आरंभ करण्यापूर्वीही दोन्ही सद्गुरूंच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ सामान्य व्यक्तीच्या तुलनेत जवळ जवळ ५०० पटींनी अधिक होती, तसेच त्यांची एकूण प्रभावळही जवळ जवळ ६०० पटींनी अधिक होती.

२. प्रत्येक दिवशी केलेल्या विधींनंतर दोन्ही सद्गुरूंच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ, तसेच एकूण प्रभावळ यांत उत्तरोत्तर पुष्कळ प्रमाणात वाढ झाली. हे पुढील दिवशीच्या विधीच्या पूर्वी केलेल्या मोजण्यांच्या नोंदींवरून लक्षात येते.

३. जन्मोत्सव सोहळ्यात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी परिधान केलेल्या श्रीसत्यनारायणाच्या वस्त्रालंकारांमध्ये ते परिधान करण्यापूर्वीच्या तुलनेत ते परिधान केल्यानंतर पुष्कळ अधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळणे

जन्मोत्सव सोहळ्यात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी परिधान केलेल्या श्रीसत्यनारायणाच्या प्रत्येक वस्त्रालंकारातील सकारात्मक ऊर्जा पुष्कळ प्रमाणात वाढलेली आढळली. विस्तारभयास्तव यातील ४ उदाहरणे पुढील सारणीत दिली आहेत.

सकारात्मक ऊर्जा वाढण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

३ अ. जन्मोत्सव सोहळ्याच्या कालावधीत परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्रीसत्यनारायणाची वेशभूषा केल्याने त्यांच्यामध्ये त्या देवतेचे तत्त्व आल्यामुळे त्यांनी धारण केलेले वस्त्रालंकार त्यांच्यामधील सात्त्विकतेने भारित होणे

३ अ १. केवळ ‘महर्षींचे आज्ञापालन’ म्हणून परात्पर गुरु डॉ. आठवले सोहळ्यात सहभागी झालेले असणे

३ अ २. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा आध्यात्मिक स्तर उच्च असल्यामुळे त्यांनी श्रीसत्यनारायणाची वेशभूषा केल्यावर त्याची स्पंदने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडे आकृष्ट होणे अन् त्याचा झालेला परिणाम : ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, हा अध्यात्मातील एक सिद्धांत आहे. त्यानुसार जेथे रूप असेल, तेथे त्याच्याशी संबंधित स्पंदने (शक्ती) असतात. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी जन्मोत्सवाच्या कार्यक्रमात महर्षींचे आज्ञापालन म्हणून श्रीसत्यनारायणाची वेशभूषा केली होती. श्रीसत्यनारायणाच्या वेशभूषेच्या माध्यमातून त्या देवतेची स्पंदने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडे आकृष्ट झाली. यातून हिंदु धर्मात प्रत्येक देवतेला विशिष्ट रूप असण्यामागे अध्यात्मशास्त्र आहे, हे लक्षात येते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा उच्च आध्यात्मिक स्तर आणि त्यांची सात्त्विकता यांमुळे त्यांच्याकडे श्रीसत्यनारायणाची स्पंदने आकृष्ट झाली. नुसता देवतेचा वेश परिधान करून सामान्य व्यक्तीमध्ये त्या देवतेची स्पंदने आकृष्ट होतीलच असे नाही.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये श्री सत्यनारायणाची स्पंदने आकृष्ट झाल्यामुळे त्यांनी धारण केलेले सर्व वस्त्रालंकार त्या सात्त्विकतेने भारित झाले. त्यामुळे त्यांमधील सकारात्मक ऊर्जा आणि एकूण प्रभावळ पुष्कळ प्रमाणात वाढली.

४. ‘यू.टी.एस्.’ नोंदी करतांना साधकाला आलेल्या अनुभूती

या विधींच्या संदर्भातील संशोधनाच्या अंतर्गत ‘यू.टी.’ स्कॅनरने मोजण्यांच्या नोंदी करतांना श्री. आशिष सावंत यांना विविध अनुभूती आल्या.

अ. या नोंदींपैकी बर्‍याच नोंदी औद्योगिक वसाहतीमधील डांबरी रस्त्यावर, भर दुपारी १२ ते दीड या कालावधीत उन्हात केल्या गेल्या. गोव्यातील मे मासातील तळपत्या उन्हात नोंदी करत असल्यामुळे श्री. आशिष यांच्या सर्वांगातून घामाच्या धारा अखंड वहात होत्या. एरव्ही घाम येऊ लागला की, त्यांची चिडचिड होते; परंतु जन्मोत्सवाशी संबंधित सर्व संशोधनाच्या अंतर्गत मोजण्यांच्या नोंदी करतांना त्यांची घामामुळे चिडचिड न होता उलट त्यामुळे गारवा जाणवत होता.

आ. मोजण्यांच्या नोंदी करत असतांना त्यांना आजूबाजूचे वातावरणही प्रसन्न आणि आनंदी होते, असे जाणवले.

इ. दुपारच्या वेळीही वारा सुटतो आणि गारवा निर्माण होतो, असे त्यांनी सातत्याने अनुभवले.

ई. अनेकदा या नोंदी करतांना तिथे गरुड घिरट्या घालतांना आढळले, तर काही वेळा मोराचा केकावली (मोराचा आवाज) ऐकू आला.

उ. या प्रसन्न वातावरणात मोजण्यांच्या नोंदी करत असतांना श्री. आशिष यांना ते वायुसारखे हलके हलके होऊन मागे मागे जात आहेत, असे जाणवले.

५. सद्गुरूंच्या ऊर्जेने श्री. आशिष मोजण्यांच्या नोंदींच्या वेळी मागे मागे जात असल्याने त्यांना थकवा न जाणवणे

श्री. आशिष सावंत सद्गुरुद्वयींच्या मोजण्यांच्या नोंदी करत असतांना त्यांना प्रत्येकीची सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ, तसेच एकूण प्रभावळ अशा प्रत्येक नोंदीसाठी किमान ५०० ते ७०० मीटर मागे मागे चालत जावे लागते. दोघींच्या नोंदी मिळून असे ४ वेळा जावे लागते. या संदर्भात सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितले की, श्री. आशिष सद्गुरुद्वयींच्या ऊर्जेने आपोआप मागे मागे ढकलले जातात. त्यामुळे भर उन्हात सलग एवढे चालूनही त्यांना थकवा येत नाही. गावाबाहेरील औद्योगिक वसाहतीमधील मार्गावरून नोंदी घेणे चालू असतांनाही ट्रक सतत भरधाव जात असतात. असे असूनही ट्रकांच्या वेगामुळे येणार्‍या वायूच्या झोतामुळे श्री. आशिषच नाही, तर त्यांच्या हातात असलेले ‘यू.टी.एस्.’ उपकरणही हलत नाही.’

– आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१५.५.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF