श्रीसत्यनारायणदेव !

संपादकीय

प्रत्येक मनुष्याची उत्पत्ती ईश्‍वरापासून म्हणजे सच्चिदानंदापासून झाली आहे. त्यामुळे मनुष्याला या मर्त्यलोकात सातत्याने आनंदाची ओढ असते. यासाठी तो जीवनभर संघर्ष करत असतो आणि विविध माध्यमांतून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो; मात्र त्याचा हा आनंद शाश्‍वतापेक्षा अशाश्‍वतापासून मिळवण्याचा प्रयत्न अधिक असतो; कारण सध्याच्या कलियुगात तो ईश्‍वरी आनंदाकडे जाण्यापेक्षा मायेतील सुखाकडे आकृष्ट होतो. त्याला अशा वेळी योग्य मार्ग दाखवून ईश्‍वरी आनंदाकडे नेण्याची व्यवस्था या कलियुगात आणि सध्याच्या निधर्मी भारतात नसल्याने आणि मायेचे प्राबल्य अधिक असल्याने तो त्या दिशेने जातही नाही. अशामुळे शेवटी तो याच मायेत गुरफटून जन्म-मृत्यूच्या चक्रात अडकतो आणि ईश्‍वराशी म्हणजे सच्चिदानंदाशी एकरूप होऊ शकत नाही. सत्य, त्रेता आणि द्वापर युगांमध्ये मनुष्याला ईश्‍वरी आनंद मिळवण्याची आणि ‘त्याच्याशी एकरूप व्हायचे आहे’, याची अधिक प्रमाणात जाणीव होती आणि तो ते साध्य करण्याचाही प्रयत्न करत होता; मात्र आताच्या कलियुगात मनुष्याचा आध्यात्मिक स्तरच मुळात २० टक्क्यांपासून चालू होत असल्याने त्याला ईश्‍वराकडे जाण्याचा विचार तरी कसा येणार ? कलियुगातील ही स्थिती आधीच ओळखणारे महर्षि नारद यांनी भगवान श्रीविष्णूला या संदर्भात विचारणा केली होती. ‘कलियुगात मनुष्याला ईश्‍वरी आनंद मिळून तो मोक्षाला कसा जाऊ शकतो, याचा मार्ग सांगावा’, अशी प्रार्थना केली होती. त्यावर भगवान विष्णूने त्या वेळी श्रीसत्यनारायण देवाची कथा आणि व्रत सांगितले. ‘याचे आचरण केल्यास मनुष्याला ईश्‍वरी आनंद मिळून तो निजधामाला जाऊ शकतो’, असे सांगितले. तेव्हापासून कलियुगामध्ये श्रीसत्यनारायण पूजा आणि व्रत चालू झाले आहे. असंख्य लोक त्याचे आचरण करून आनंद घेऊन निजधामाला पावले आहेत.

गुरुकृपायोगानुसार साधना !

सध्या तर कलियुगांतर्गत कलियुगांतर्गत कलियुग असे हे सहावे कलियुग चालू आहे. अशा वेळी मनुष्याची आध्यात्मिक स्थिती आणखीनच खालावलेली आहे. अशा वेळी भगवान श्रीविष्णूने मनुष्याला अवघ्या काही वर्षांत जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्त होण्यासाठी अधिक सुलभ आणि सोपा मार्ग दाखवून त्याच्यावर कृपा केली आहे. जीवनाडीशास्त्र पट्टीमध्ये महर्षींनी परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीविष्णूचे अवतार असल्याचे घोषित केले आहे. तेच भगवान श्रीराम, श्रीकृष्ण आणि श्रीसत्यनारायण आहेत, असेच त्यांनी त्यात म्हटले आहे. हे कसे सत्य आहे, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या गुरुकृपायोगातून स्पष्ट होते. गुरुकृपायोगानुसार काही वर्षे भावपूर्ण आणि परिपूर्ण साधना केली, तर जीव आनंदप्राप्ती करत जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्त होऊ शकतो. आतापर्यंत सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली गुरुकृपायोगानुसार साधना करून १ सहस्रांहून अधिक साधक जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्त झाले आहेत, तर याहून अधिक ही स्थिती प्राप्त करण्याच्या वाटेवर आहेत, ही वस्तूस्थिती आहे. भगवान श्रीविष्णूचा अवतारच अशा प्रकारचे कार्य करू शकतो. हे अवतारी कार्य परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केले आहे. त्यामुळेच जीवनाडीपट्टीमध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले अवतार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

कृपावत्सल गुरुमाऊली !

भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितले आहे, ‘जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, तेव्हा तेव्हा मी अवतार घेऊन धर्माची पुनर्स्थापना करतो.’ परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य पहाता ते हेच करत आहेत, हे लक्षात येते. हिंदु (ईश्‍वरी) राष्ट्राची स्थापना म्हणजेच धर्माची पुनर्स्थापनाच होय! हे कार्य करण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहस्रो साधक त्यांची साधना आणि आनंदप्राप्तीचा मार्ग म्हणून कार्य करत आहेत. भारताच्या काही सहस्रो वर्षांच्या इतिहासात असे आध्यात्मिक कार्य झालेले नाही. धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी धर्माचे योग्य मार्गदर्शन आणि त्यातील ज्ञान सुलभ आणि सध्याच्या विज्ञानयुगात लोकांना समजून ते साधनेला लागतील, असा प्रयत्न परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केला आहे. त्यासाठीच ते वैज्ञानिक संशोधनाच्या माध्यमातून हिंदु धर्म आणि त्याचे शास्त्र किती प्रगत आणि अमूल्य आहे, हे दाखवून देत आहेत. त्यामुळे केवळ भारतीयच नव्हे, तर विदेशी (ख्रिस्ती आणि अन्य पंथीय) हेही गुरुकृपायोगानुसार साधना करू लागले आहेत आणि त्यांतील काही जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्तही झाले आहेत. साधनेला पंथांचे बंधन नसते, हे लक्षात येते. संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठीच परात्पर गुरु डॉ. आठवले अखंड कार्य करत आहेत. गेल्या दीड-दोन सहस्र वर्षांत निर्माण झालेले विविध पंथ हे मूळ सनातन वैदिक धर्मापासूनच विलग होऊन निर्माण झालेले आहेत. त्यामुळे श्रीविष्णूच हेच त्यांच्या पूर्वजांचे आराध्य दैवत होते, हे लक्षात येते. धर्माची पुनर्स्थापना करतांना पुढच्या पिढींना धर्माचे ज्ञान मिळण्यासाठी धर्मशिक्षण देण्याचा प्रयत्न परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आधीपासूनच चालू केला आहे. यासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. काही वर्षांत याची वास्तू निर्माण होऊन त्यात सहस्रो जीव धर्मशिक्षण घेऊन त्याद्वारे धर्माचरण करून पृथ्वीवर येणारे रामराज्य टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करणार आहेत. या रामराज्यात व्यक्तीची केवळ आध्यात्मिकच नव्हे, तर भौतिक प्रगतीही होणारी व्यवस्था असणार आहे. याच रामराज्यासाठी परात्पर गुरुमाऊली अहोरात्र झटत आहेत.

श्रीविष्णूचे श्री सत्यनारायण रूप हे कृपावत्सल आहे. परात्पर गुरुमाऊलींनी त्याच रूपात आम्हा साधकांना दर्शन देऊन कृतकृत्य केले आहे. समस्त मानवजातीच्या उद्धारासाठी झटणार्‍या कृपासिंधु गुरुचरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच ठरेल ! त्यांची अखंड कृपा या अज्ञानी जिवांवर रहावी, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना !


Multi Language |Offline reading | PDF