आज योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या शताब्दी जन्मोत्सवानिमित्त (१०० व्या वर्षातील पदार्पणानिमित्त) शेवगाव (नगर) येथे त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा !

।। आज योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचा शताब्दी जन्मोत्सव ।।

ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

शेवगाव (नगर) – योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या १०० व्या वर्षातील पदार्पणानिमित्त १८ मे या दिवशी येथे अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या अंतर्गत आध्यात्मिक आणि सामाजिक कार्य गौरव पुरस्कारही प्रदान करण्यात येणार आहे. मान्यवर आणि विविध संस्था यांच्या वतीने योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे अभिष्टचिंतन करण्यात येईल. या सोहळ्यास उपस्थित रहाण्याचे आवाहन ‘गुरुदत्त सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला आणि क्रीडा संस्था, शेवगाव, नगर’ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

सोहळ्यासाठी उपस्थित रहाणारे प्रमुख मान्यवर !

या सोहळ्यास ह.भ.प. दयानंदजी महाराज, श्री. एस्.व्ही. कुलकर्णी सर, श्री. अंबादास गर्कळ, मुंबई येथील श्री. अरविंदकाका कुलकर्णी, माजी आमदार श्री. नरेंद्र घुले, श्री. अंकुश पालवे आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.

आध्यात्मिक पुरस्काराचे मानकरी !

१. सनातन संस्थेचे साधक श्री. अतुल पवार

२. ‘गजानन आशिष’ या मासिकाचे संपादक श्री. मनोहर फडणीस

सामाजिक पुरस्काराचे मानकरी !

१. वर्धा येथील मंगेशीताई मून

२. बीड येथील पदव्युत्तर विभागाचे समन्वयक डॉ. महेंद्र गौशाल

आजच्या सोहळ्याचे स्थळ आणि वेळ

स्थळ : प.पू. दादाजी वैशंपायननगर, दूध शीतकरण केंद्राच्या मागे, पाथर्डी रोड, शेवगाव, नगर.

वेळ : दुपारी ३.३० वाजता

दिव्य सिद्ध मंत्र आणि योगसामर्थ्य यांद्वारे सनातनचे निरंतर रक्षण करणारे, परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे महामृत्यूयोग टाळणारे अन् हिंदु राष्ट्राच्या (ईश्‍वरी राज्याच्या) स्थापनेतील अडथळे दूरकरण्यासाठी वयाच्या १०० व्या वर्षीही प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे योगतज्ञ दादाजी वैशंपायन !

१०० व्या वर्षात पदार्पण करत असलेले योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘आज वैशाख पौर्णिमेला, म्हणजे १८.५.२०१९ या दिवशी योगतज्ञ दादाजी वैशंपायन १०० व्या वर्षात पदार्पण करत आहेत. गेली १५ वर्षे सनातनच्या साधकांना सर्वार्थाने सांभाळणारे, सनातनला सर्व संकटांपासून वाचवणारे, ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत; म्हणून अखंड अनुष्ठाने करणारे, तसेच माझा महामृत्यूयोग टळावा, यासाठी अविरत प्रयत्न करणारे योगतज्ञ दादाजी वैशंपायन असे थोर आणि महान संत आहेत की, ‘त्यांच्यामुळेच सनातनचे कार्य चालू आहे’, असे म्हणता येईल. साधकांवर होणारी वाईट शक्तींची आक्रमणे असोत, सनातन संस्थेवर आलेली संकटांची मालिका असो अथवा माझ्यावर महामृत्यूयोगाचे सावट असो, प्रत्येक क्षणी आणि प्रत्येक परिस्थितीत स्वतःची प्राणशक्ती अत्यंत अल्प असतांनाही सनातनच्या मागे योगतज्ञ दादाजी ठामपणे उभे राहिले आहेत. त्यांच्या दैवी पाठबळामुळेच संकटांचे निवारणही होत आहे.

कोणत्याही आपत्कालीन प्रसंगाविषयी जेव्हा आम्ही त्यांना कळवतो, तेव्हा ते त्वरित म्हणतात, ‘हो, हे मला ठाऊक आहे आणि यासाठी मी उपायही करत आहे.’ योगतज्ञ दादाजींसारख्या द्रष्ट्या संतांना त्यांच्यातील दिव्य शक्तीमुळे सनातनवर येणार्‍या कोणत्याही संकटाविषयी अगोदरच ज्ञात असते आणि ते त्याच्या निवारणासाठी विनाविलंब उपाय चालू करतात. या वेळी ते स्वतःच्या प्रकृतीची कोणतीच पर्वा करत नाहीत. संकटे येण्यापूर्वीही ते अनेक प्रतिबंधात्मक उपाय योजून प्रत्येक क्षणी आम्हा सर्वांचे रक्षण करत आहेत. सनातनच्या साहाय्यासाठी तत्परतेने धावून येणार्‍या वात्सल्यस्वरूप दादाजींची ही निरपेक्ष प्रीती पाहून मन थक्क होते. योगतज्ञ दादाजींप्रती कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.

दादाजींच्या उपायांची वैशिष्ट्ये म्हणजे ते स्थूल आणि सूक्ष्म या दोन्ही स्तरांवर उपायांची योजना करतात. त्यांच्या सिद्ध मंत्रांत एवढी शक्ती आहे की, मंत्रपठणामुळे साधकांना अनेक प्रकारचे लाभ होतात. त्यांनी सिद्ध केलेल्या दत्तमाला मंत्रपठणामुळे आलेली एक अनुभूती म्हणजे रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात साधक या मंत्राचे पठण करत असतांना काही कालावधीनंतर ध्यानमंदिराच्या बाहेरील परिसरात ३०० हून अधिक औदुंबराची झाडे आपोआपच उगवली. ‘मंत्रांचा वातावरणावर कसा प्रभाव पडतो ?’ याचा दृश्य परिणाम दाखवणारे हे उदाहरण असून त्यातून त्यांच्या मंत्रसामर्थ्याची प्रचीती येते.

अशा योगतज्ञ दादाजींचे पितृवत छत्र लाभणे, ही ईश्‍वराने सनातनवर केलेली मोठी कृपा असून त्यामुळेच सनातन संस्थेच्या कार्याचा विस्तार होत आहे. माझ्यावरील आणि सनातनवरील प्रीतीमुळे अधिकाधिक निर्गुण स्थितीत असूनही असंख्य त्रास सोसून या वयातही विविध अनुष्ठाने करणे, हे दादाजींसारखी थोर विभूतीच करू शकते. दादाजी हे सनातनला मिळालेले अनमोल आणि अद्वितीय असे वरदान आहे. त्यांचे ऋण फेडणे, ही सर्वथा अशक्य कोटीतील गोष्ट आहे.

१०० व्या वर्षात पदार्पण करत असलेले ऋषितुल्य योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता आणि नमस्कार !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले


Multi Language |Offline reading | PDF