हिंदू असणे गुन्हा आहे का ?

संपादकीय

दोनच दिवसांपूर्वी देहलीत एक हिंदु पिता त्याच्या मुलीला घेऊन घरी जात होता. त्या वेळी काही धर्मांधांनी त्याच्या मुलीची छेड काढली. या पित्याने धर्मांधांच्या घरी जाऊन या गोष्टीचा जाब विचारला. त्या वेळी छेडछाड करणार्‍या धर्मांध मुलाच्या पित्याने पत्नीला गुरांना कापण्यासाठी वापरण्यात येणारा चाकू आणायला सांगितला आणि इतरांनी मिळून हिंदु पित्यावर सपासप वार केले. इतकेच नाही, तर त्याला वाचवणार्‍या हिंदु मुलावरही या धर्मांधांनी आक्रमण करून त्याच्यावरही वार केले. या प्रकरणात हिंदु पिता मृत्यूमुखी पडला, तर त्याचा मुलगा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. इतकी मोठी घटना घडूनही प्रसिद्धीमाध्यमांनी याची अत्यल्प नोंद घेतली; कारण मारणारा धर्मांध होता आणि मार खाणारा हिंदू ! निवडणुकीच्या काळात प्रत्येक छोट्या सूत्रावर रान उठवणार्‍या भाजपने तर याचा साधा निषेधही केल्याचे ऐकिवात नाही; कारण ‘हिंदुत्वाशी संबंधित सूत्र आपल्या राजकीय सोयीचे नाही’, असे बहुदा भाजपला वाटत असावे.

याउलट उत्तरप्रदेशात गोहत्येचा आरोप असणारा धर्मांध अखलाख जमावाच्या मारहाणीत बळी पडल्यावर पूर्ण देशात जणू आगडोंब उसळल्याप्रमाणे वातावरण होते. ‘पुरस्कारवापसी टोळी’ लगेच सक्रीय झाली होती. अनेकांना ही घटना म्हणजे जणू देशाच्या सार्वभौमत्वावर आक्रमणच वाटत होते. या घटनेवर प्रतिदिन दूरचित्रवाहिन्यांवर चर्चासत्र चालत आणि प्रसिद्धीमाध्यमांमध्येही रकानेच्या रकाने भरून प्रतिक्रिया येत असत. डावे, पुरो(अधो)गामी, सेक्युलर, काँग्रेस या सगळ्यांना ‘अखलाख’चा प्रचंड कळवळा आला होता. त्या वेळी भारतातील पुरो(अधो)गामी म्हणत होते ‘भारतातील मुसलमान घाबरलेले आहेत.’ त्याच लोकांना आज भारताच्या राजधानीत एका हिंदूंची हत्या झाल्यावर ‘भारतातील हिंदू घाबरलेले आहेत’, असे का वाटत नाही ? यावर कोणताच पुरोगामी, तसेच सेक्युलरवादी का बोलत नाही ? मुसलमानांच्या रमजान मासात ज्यात उपवास ठेवला जातो आणि ज्याला मुसलमान पवित्र समजतात, त्याच काळात धर्मांधांनी एका हिंदूंची हत्या झाल्यावर कोणी मौलाना, मौलवी अथवा मुसलमानांची अन्य संघटना-पक्ष निषेध का करत नाही ? सगळे धर्मनिरपेक्षवादी आता कुठे गेले ?

हिंदूंसाठी आज धर्मांधांच्या शेजारी रहाणे आणि मुलीची छेड काढल्यावर धर्मांधाला जाब विचारणे म्हणजे स्वत:चा जीव गमावणे, अशी स्थिती आहे. एरवी प्रत्येक सूत्रावर गळे काढून रडणारे राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल कुठे आहेत ? एकीकडे बंगाल राज्यात हिंदूंना सातत्याने धमक्या दिल्या जात आहेत, तर देहलीत मुलीच्या शीलाचे रक्षण करणार्‍या वडिलांचा खून करण्यात येत आहे ! भाजप काय, अथवा अन्य कोणताही राजकीय पक्ष हिंदूंसाठी काही करेल अशी स्थिती नाही. हिंदूंना आज कोणीही वाली नाही, हीच खरी वस्तूस्थिती आहे. त्यामुळे बहुसंख्य हिंदूंच्या कल्याणासाठी कार्यरत असलेले हिंदु राष्ट्रच त्यावर उत्तर आहे !

माथेफिरू कोण ?

नथुराम गोडसे’ यांना अभिनेते आणि राजकीय नेते कमल हसन यांनी ‘स्वतंत्र भारतातील पहिला हिंदु आतंकवादी’ ठरवल्यानंतर साध्वी प्रज्ञासिंह यांनी ‘नथुराम गोडसे हे देशभक्त होते आणि रहातील’, असे ठामपणे सांगून देशभक्तांची बाजू घेतली; पण दुदैव हे की, ‘हिंदुत्वनिष्ठ’ म्हणवणार्‍या भाजपने साध्वी प्रज्ञासिंह यांना त्यांच्या वक्तव्यांविषयी क्षमा मागायला लावली. ‘भाजप म्हणजे दुसरी काँग्रेस होऊ लागली आहे’, असे म्हणण्यामागचे हे एक कारण ! भाजपची ही राजकीय भूमिका देशभक्तांना रुचणारी नाही. जर भाजप नथुराम गोडसे यांना देशद्रोही ठरवू पहात असेल, तर ‘गोडसे यांनी कुठला देशद्रोह केला होता’, हे त्याने एकदा सांगूनच टाकावे. गांधीहत्येच्या घटनेने नथुराम गोडसे यांनी केलेल्या कार्याचे, त्यांच्या प्रखर देशप्रेमी विचारांचे अन् विश्‍लेषणाचे मूल्य एकदम शून्य कसे होऊ शकते ? भारताची फाळणी करणार्‍यांना ‘राष्ट्रपिता’ आणि त्यांना विरोध करणार्‍यांना देशद्रोही ठरवणे, हे कुठले बौद्धिक ?

पाकिस्तानला त्या काळी ५५ कोटी (म्हणजे आताचे जवळपास ५८ सहस्र कोटी रुपयांहून अधिक) देण्यासाठी उपोषण करणार्‍या गांधींना नथुराम गोडसे यांनी केलेला विरोध, निजामाच्या विरोधात लढण्यासाठी भाग्यनगरला (हैद्राबादला) मारलेली धडक हा देशद्रोह कसा ? पाकिस्तानातून आणि भारतातील मुसलमानबहुल प्रांतांतून हिंदूंचा नरसंहार होत असतांना, सहस्रो हिंदु स्त्रियांवर बलात्कार होत असतांना निष्क्रीय रहाणार्‍या काँग्रेसी नेत्यांचा विरोध, हा राष्ट्रद्रोह आहे का ? याची उत्तरे भाजपने द्यायला हवीत. आज केवळ गांधीहत्येमुळे नथुराम गोडसे या देशभक्त व्यक्तीवर ‘माथेफिरू’पणाचे ‘लेबल’ चिकटवले गेले आहे. नथुराम गोडसे यांना देशभक्त म्हणणार्‍या साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार्‍या काँग्रेसने इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर केलेल्या शीखविरोधी दंगलींविषयी क्षमायाचनेच्या संदर्भात अवाक्षरही काढलेले नाही, गांधीहत्येनंतर ब्राह्मण समाजावर झालेल्या आक्रमणांविषयी चकार शब्दही काढला नाही, उलट ओसामा बिन लादेन या आतंकवाद्याला ‘ओसामाजी’ असे संबोधले, हे लक्षात घ्यायला हवे. काँग्रेसची वृत्ती यातूनच लक्षात येते.

हत्या ही हत्या असते. त्यामुळे नथुराम गोडसे यांनी गांधींची हत्या केल्याचे समर्थन करू शकत नाही. गांधीहत्येची कारणे त्यांनी न्यायालयीन युक्तीवादाच्या वेळी कथन केली होती. ‘अखंड हिंदुस्थान’चे स्वप्न पहाणार्‍या नथुराम यांनी त्यांचे अस्थीविसर्जन अखंड हिंदुस्थानातून वहाणार्‍या सिंधु नदीत करण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. हा माथेफिरूपणा आहे कि नथुराम गोडसे यांचा युक्तीवाद प्रसारित करणार्‍यांवर निर्बंध घालणे, गांधीहत्येची कारणे दडपून टाकणे, देशभक्तांचे खच्चीकरण आणि आतंकवाद्यांचे उदात्तीकरण करणे, क्रांतीकारकांची अवहेलना करणे हा माथेफिरूपणा आहे ? डोके शांत ठेवून विचार केल्यास खरे माथेफिरू कोण, हे लक्षात येईल !


Multi Language |Offline reading | PDF