सायबर आक्रमणाच्या भीतीमुळे अमेरिकेत आणीबाणी

केवळ सायबर आक्रमण होण्याच्या भीतीमुळे अमेरिका देशात आणीबाणी घोषित करते, तर गेली ३ दशके भारतात जिहादी आतंकवाद्यांची आक्रमणे होऊनही भारत नेहमीच निष्क्रीय राहिला आहे ! भारत आतातरी अमेरिकेकडून शिकेल का ?

वॉशिंग्टन – सायबर आक्रमणाच्या भीतीमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे. ट्रम्प यांनी याविषयीच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे, अशी माहिती व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव सारा सॅण्डर्स यांनी दिली. आदेशात कोणत्याही आस्थापनाचे नाव नमूद करण्यात आलेले नाही; मात्र चीनमधील हुवेई आस्थापनाला लक्ष्य करण्यासाठी ट्रम्प यांनी आणीबाणी घोषित करण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. विदेशी शत्रूंपासून अमेरिकेवर होऊ शकणाऱ्या सायबर आक्रमणामुळे ट्रम्प यांनी हे पाऊल उचलले आहे. यामुळे अमेरिकेच्या आस्थापनांना राष्ट्रीय सुरक्षेत अडचणी आणणाऱ्या परकीय टेलिकॉम आस्थापनांची सेवा वापरता येणार नाही.

१. आणीबाणी लागू होताच हुवेई आस्थापनाने म्हटले आहे की, यामुळे केवळ अमेरिकी आस्थापनांची आणि नागरिकांची हानी होईल. हुवेईच्या उत्पादनांचा वापर चीनकडून अमेरिकेवर लक्ष ठेवण्यासाठी केला जात असल्याची चिंता अमेरिकेच्या आस्थापनांनी व्यक्त केली होती.

२. अमेरिकेच्या व्यापार मंत्रालयाने हुवेईचा समावेश ‘एन्टीटी सूची’मध्ये केला आहे. यामुळे अमेरिकी आस्थापनांमधील तंत्रज्ञान घेतांना हुवेईला अमेरिकेच्या सरकारची अनुमती घ्यावी लागणार आहे. यामुळे अमेरिका आणि चीन यांचे संबंध आणखी ताणले जाण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त होत आहे. अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये आधीच व्यापार युद्ध चालू आहे. त्यात आता यामुळे भर पडणार आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now