वृक्ष प्राधिकरणाची मशागत आवश्यक !

वृक्षांचे योग्य प्रकारे संवर्धन करण्याची, तसेच विकासकामांसाठी अथवा अन्य कामांसाठी आवश्यक असेल, तर वृक्षतोडीची अनुमती देऊन त्यांची पुनर्लागवड करण्याचे महत्त्वपूर्ण दायित्व वृक्ष प्राधिकरणाकडे असते; पण निसर्ग आणि विकास यांचा समतोल साधून चांगले काम करण्याच्या संदर्भात प्राधिकरणामध्ये दुष्काळच दिसून येतो. कुठल्याही महापालिकेतील चित्र यापेक्षा निराळे नाही. पुणे महापालिकेमध्ये तर अनेक वेळा अपेक्षित सदस्यसंख्येच्या अभावी वृक्ष प्राधिकरणाच्या बैठका रहित झाल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासूनचे हे चित्र आहे. सध्याही या प्राधिकरणाची अवस्था बिकटच आहे. यासाठी पूर्णवेळ अधिकारीच उपलब्ध नाहीत. वृक्ष प्राधिकरणाकडे अनेक प्रकरणे ६ मासांपासून प्रलंबित आहेत. प्राधिकरणाचे संकेतस्थळही ‘आऊटडेटेट’ आहे. याविषयीची सर्व कामेही क्षेत्रीय कार्यालयानुसार विभागण्यात आल्यामुळे वृक्षलागवड अथवा वृक्षतोड यांसंदर्भात निर्णय द्यायचा असेल, तर सदस्याला संबंधित क्षेत्रीय कार्यालयातच जावे लागते. प्राधिकरण असले, तरी त्याची ‘अशी’ स्थिती असल्याने प्राधिकरणाचा काय उपयोग, असा प्रश्न सदस्यांकडून विचारला जात आहे.

वास्तविक शहरांची चोहोबाजूंनी होणारी अमर्यादित वाढ आणि झपाट्याने न्यून होणारे हरित क्षेत्र पहाता वृक्ष प्राधिकरणाने पूर्ण सक्षमतेने कार्य करणे आवश्यक आहे. वनविभागाच्या वतीने ‘हरित राज्या’चा नारा देत प्रत्येक वर्षी लक्षावधी रोपट्यांची लागवड करण्याचे ध्येय ठरवून उद्देशपूर्तीसाठी प्रयत्न केले जातात. अमुक इतकी वृक्ष लागवड झाल्याचा डांगोराही पिटला जातो; पण कागदावरील हिरवळ आणि वास्तवातील वनक्षेत्र यांमध्ये लक्षणीय भेद असतो.

एकंदरीत, शासनाचा कारभार पाहिला, तर कुठलेही प्राधिकरण असो वा कुठलीही समिती, आपापली दायित्वे आणि कर्तव्ये पार पाडण्यापेक्षा कामचुकारपणा करण्यामध्येच अनेकांना अधिक रस असतो, हे दिसून येते. वृक्ष प्राधिकरण हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. पर्यावरणासारखा ज्वलंत विषय असतांना खरेतर प्राधिकरणाला कार्य करायला पुष्कळ वाव आहे; पण दुर्दैवाने या विषयाचा आज केवळ ‘फार्स’ झाला आहे. वातानुकूलित खोलीत बसून पर्यावरण रक्षणाचे काम होऊ शकत नाही. त्यासाठी झाडाच्या सावलीचा गारवा अनुभवायला लागतो. शहरातील कुठलीच टेकडी आज हिरवीगार राहिलेली नाही. एक तर ती उघडीबोडकी झाली आहे किंवा तिचे सपाटीकरण झाले आहे. वृक्ष प्राधिकरण आणि संबंधित अधिकारी पर्यावरणविषयी किती संवेदनशील आहेत, त्याचे हे प्रमाण ! आज जिनिव्हा येथे पर्यावरणविषयक जागतिक परिषदांमध्ये सहभागी होऊन मंथन होते; मात्र स्थानिक स्तरावर निष्क्रीय राहून कार्यविस्ताराच्या फांद्या छाटण्याचेच काम होते. यासाठी वृक्षांच्या आधी वृक्ष प्राधिकरणाची मशागत करायला हवी.

– प्रा. (कु.) शलाका सहस्रबुद्धे, पुणे

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now