इतिहासाचे भयाण भविष्य !

संपादकीय

भूतकाळात घडलेल्या घटनांची निवळ मांडणी म्हणजे इतिहास नव्हे. ऐतिहासिक घटनांचे योग्य आकलन, तसेच एखाद्या ऐतिहासिक घटनेतील पात्रांचा दृष्टीकोन, यांचा विचार इतिहास लेखन करतांना होणे आवश्यक असते. त्याची वानवा असली की, राष्ट्रपुरुषांची वीरता हा भेकडपणा वाटतो आणि इंग्रजांचे प्रशंसक हे भारतविधाते वाटू लागतात. राजस्थानमधील काँग्रेस सरकारने काँग्रेसी परंपरेनुसार पुन्हा एकदा इतिहासाशी आणि अंतिमतः राष्ट्राशी प्रतारणा करण्याचे प्रयत्न चालू केले आहेत.

राजस्थानच्या ‘अभ्यासक्रम पुनरावलोकन समिती’च्या सुचनेनुसार सरकारने इयत्ता दहावीच्या पाठ्यपुस्तकातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील धड्यातून ‘वीर’ हा शब्द वगळून केवळ ‘विनायक दामोदर सावरकर’ एवढेच धड्याचे शीर्षक ठेवले आहे. प्रत्यक्ष धड्यामध्येही पालट करून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्यांच्या सुटकेसाठी इंग्रज सरकारला केलेल्या कथित माफीनाम्यांविषयी माहिती देण्यात आली आहे. काँग्रेसने पाठ्यपुस्तकात असे लिखाण घुसडलेले आहे की, ते वाचून विद्यार्थ्यांच्या मनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आकस निर्माण होईल. हा एवढा एकच पालट नाही, तर रजपूत स्त्रियांचे जोहार करतांनाचे छायाचित्र काढून टाकणे, महाराणा प्रताप यांचा ‘महान’ असा उल्लेख काढून टाकणे, असे अनेक उद्योग काँग्रेसने केले आहेत. हे पालट म्हणजे विद्यार्थ्यांना भारतीय सुपुत्रांच्या शौर्यगाथेपासून अपरिचित ठेवण्याचाच प्रकार आहे. एकदा का पूर्वजांच्या गौरवगाथेविषयी अनभिज्ञता निर्माण झाली आणि प्राचीन वैभवशाली परंपरेशी असलेली विद्यार्थ्यांची नाळ तुटली की, विद्यार्थ्यांना राष्ट्रीयत्वापासूनही दूर नेणे सोपे जाते. शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये होणारे पालट हे एका व्यापक देशद्रोही कटाचा भाग आहेत, ते अशाप्रकारे !

काँग्रेसच्या मनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी ठासून घृणा भरली आहे. त्याच द्वेषातून काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी मध्यंतरी अंदमानच्या कारागृहातील भिंतींवर असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या देशभक्तीपर काव्यपंक्ती उखडून टाकल्या होत्या. राहुल गांधी यांनी सभेमध्ये भाषण करतांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा ‘पळपुटे’ असा उल्लेख केला होता. काँग्रेसकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या ज्या कथित माफीनाम्यांचा उल्लेख केला जातो, त्या पत्रांचा गर्भितार्थ इतिहासकारांनी कित्येकदा स्पष्ट केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कधीही इंग्रजांची क्षमा मागितलेली नाही. त्यांनी इंग्रजांना जी पत्रे लिहिली होती, त्यामध्ये सर्व राजकीय कैद्यांच्या सुटकेची मागणी होती. ही मागणी यासाठी होती की, कारागृहाबाहेर पडून पुन्हा मातृभूमीची सेवा करता यावी आणि भारतमातेच्या स्वतंत्रतेसाठी प्रयत्न करता यावेत ! एका पत्रामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्पष्ट उल्लेख केला होता की, ‘जर राजकीय कैद्यांच्या सुटकेमध्ये विनायक दामोदर सावरकर या नावाचा तुम्हाला अडथळा वाटत असेल, तर त्यांची सुटका करू नका; पण अन्य कैद्यांची मुक्तता करा.’ तथापि या पत्रांमागील रणनीती लक्षात येण्याएवढी काँग्रेसींची पात्रता आहे कुठे ! स्वातंत्र्यवीर सावरकर यांना हिणवणार्या काँग्रेसींनी मग अन्य राष्ट्रपुरुषांनी जे तह केले, त्याविषयीची भूमिकाही स्पष्ट करायला हवी.

राजस्थानच्या काँग्रेस सरकारने ‘हळदीघाटीचे युद्ध महाराणा प्रताप यांनी जिंकले’, हाही उल्लेख काढून टाकून ‘ते युद्ध हिंदु-मुसलमान यांच्यामधील नव्हते’, असे म्हटले आहे. याविषयी शिक्षणमंत्री गोविंद सिंह दोतासरा यांनी तारे तोडले की, ‘हळदीघाटीचे युद्ध कोणी जिंकले हे जाणणे आवश्यक नाही. नवीन अभ्यासक्रमात महाराणा प्रताप यांच्या संघर्षाविषयीचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यातून विद्यार्थी प्रेरणा घेऊ शकतात.’ इयत्ता आठवीच्या एका पाठ्यपुस्तकाच्या मुखपृष्ठावर असणारे ‘जोहार’चे चित्र काढून टाकून त्या ठिकाणी एका किल्ल्याचे चित्र छापण्यात आले आहे. ‘जोहार ही आजची कायदाद्रोही कृती’, असे दोतासरा महाशयांचे म्हणणे आहे ! वासनांध धर्मांधांच्या तावडीत सापडण्यापेक्षा स्वधर्मात राहून प्राणार्पण करणार्‍या रजपूत स्त्रियांच्या भावना आणि त्यांची पतीनिष्ठा काँग्रेसींना कुठून कळणार ? राष्ट्र आणि धर्म हिताची काडीचीही जाण नसणार्‍याकडे सत्ता सोपवल्याचा हा परिणाम आहे. अन्य देशांमध्ये त्यांच्या देशांचा इतिहास जपण्यासाठी एक-एक विभाग कार्यरत आहे आणि भारतात मात्र इतिहासाच्या विकृतीकरणासाठी राज्य सरकारच प्रयत्नशील आहे !

इतिहासलेखनाचा उद्देश

स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेसी आणि साम्यवादी यांनी अतिशय पुळचट इतिहास विद्यार्थ्यांच्या माथी मारला आहे. कथित विचारवंतांनी केलेले इतिहासलेखन अशा स्वरूपाचे होते की, हिंदूंच्या आणि भारतियांच्या शौर्यगाथेविषयी अभिमानाची भावना निर्माण होणे दूरच, उलट एक प्रकारचा न्यूनगंड अन् अपराधीभाव निर्माण होईल. इतिहासलेखन करतांना आत्मगौरव टाळायला हवा, लिखाणात तटस्थता हवी आदी स्वरूपाची मांडणी करून काही महाभाग स्वतःचे पांडित्य दाखवण्याचा प्रयत्न करतात; पण त्यात तथ्य नाही. इतिहासलेखन करतांना आपण स्वकियांच्या बाजूने आहोत कि परकीय आक्रमकांच्या ?, हे ठरवणे महत्त्वाचे असते. ज्या काही त्रुटी अथवा चुका झाल्या असतील त्याची नकारात्मक नाही, तर वस्तूनिष्ठपणे मांडणी करणे आवश्यक असते. इतिहासलेखन हे अशा पद्धतीचे हवे की, त्या लिखाणातून पूर्वजांच्या पराक्रमाचे पोवाडे वाचकांच्या मनामनांत वाजत रहातील. स्वातंत्र्योत्तर काळात विदेशी दृष्टीकोनातून इतिहासलेखन झाल्याने इतिहासाचे विकृत वास्तव आणि भयाण भविष्य आज निर्माण झाले आहे. असे असले, तरी काळाच्या कसोटीवर सत्य इतिहासच टिकून रहातो. वीरपुरुष अजरामर ठरतात आणि इतिहास दडपणारे खलनायक ठरतात. अशा खलनायकांना ना इतिहास क्षमा करेल ना भारताची भावी पिढी !


Multi Language |Offline reading | PDF