एखाद्याचा खून केल्याने कोणी आतंकवादी होत नाही ! – अभिनेते शरद पोंक्षे यांचे नवाब मलिक यांना प्रत्युत्तर

अभिनेते कमल हसन यांच्या नथुराम गोडसे यांच्याविषयीच्या वक्तव्याचे प्रकरण

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी ‘न्यूज १८ लोकमत’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कमल हसन यांच्या वक्तव्याचे समर्थन करत ‘जेव्हापासून भाजप सत्तेत आहे, तेव्हापासून नथुराम गोडसे यांचे समर्थन चालू आहे’, असा आरोप केला. यास अभिनेते शरद पोंक्षे यांनी ‘एखाद्याचा खून केल्याने कोणी आतंकवादी होत नाही’, या शब्दांत प्रत्युत्तर दिले.

शरद पोंक्षे पुढे म्हणाले, ‘‘नथुराम गोडसे हे नाटक काँग्रेस पक्ष सत्तेत असतांना आले होते. भाजप आणि शिवसेना या पक्षांची सत्ता असतांना त्या नाटकावर बंदी घालण्यात आली होती. मग आता असे म्हणायचे का की, काँग्रेसने नथुराम गोडसे यांना पाठिंबा दिला ? ‘आतंकवाद’ ही संकल्पनाच वेगळी असून एखाद्याची विचारसरणी न पटल्याने त्याचा खून करणे, ही गोष्ट वेगळी आहे.’’ ‘मोहनदास गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदु आतंकवादी होता’, असे विधान अभिनेते आणि ‘मक्कल निधी मय्यम’ या पक्षाचे संस्थापक कमल हसन यांनी नुकतेच केले होते. या विधानावरून त्यांच्यावर चोहोबाजूंनी टीका होत आहे.

कलाकार आणि आतंकवाद यांना धर्म नसतो ! – अभिनेते विवेक ओबेरॉय यांची कमल हसन यांच्यावर टीका

‘जसा कलाकाराला धर्म नसतो, तसाच आतंकवादालाही धर्म नसतो’, असे म्हणत अभिनेते विवेक ओबेरॉय यांनी कमल हसन यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली. ओबेरॉय पुढे म्हणाले, ‘‘तुम्ही उत्तम कलाकार आहात. तुम्ही नथुराम गोडसे यांना आतंकवादी म्हणून शकता; परंतु त्यांच्या नावापुढे ‘हिंदु’ शब्द का वापरावा ? तुम्ही हे वक्तव्य मुसलमानबहुल भागात झालेल्या तुमच्या भाषणाच्या वेळी केले आहे. काही मुसलमानांची मते मिळावीत, यासाठी असे वक्तव्य करणे कितपत योग्य आहे ? आपण सर्व जण एकच आहोत. त्यामुळे देशाचे विभाजन होईल, असे वक्तव्य करू नका.’’ विवेक ओबेरॉय यांनी असे ट्वीट करून त्या समवेत ‘अखंड भारत’ असे लिहिले आहे.


Multi Language |Offline reading | PDF