कोलकाता येथील अमित शहा यांच्या ‘रोड शो’मध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

बंगालमध्ये निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी होणारा हिंसाचार तेथील कायदा आणि सुव्यवस्था यांची स्थिती दर्शवतो; मात्र तरीही केंद्रातील भाजप सरकार या राज्यातील सरकार विसर्जित न करता तेथील हिंसाचाराचा राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न करत आहे, हे भाजपला लज्जास्पद !

कोलकाता – १४ मेच्या सायंकाळी येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा ‘रोड शो’ आयोजित करण्यात आला होता. या ‘रोड शो’च्या वेळी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून ३ ठिकाणी आक्रमण करण्यात आले. या वेळी भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. या वेळी एका महविद्यालयाच्या वसतीगृहातील समाजसेवक ईश्‍वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. काही ठिकाणी वाहनांची जाळपोळही करण्यात आली. या हिंसाचारामुळे हा ‘रोड शो’ थांबवण्यात आला. या हिंसाचारावरून भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांनी एकमेकांना उत्तरदायी ठरवत आरोप केले आहेत.

अमित शहा यांनी ‘तृणमूल काँग्रेसने केलेल्या हिंसाचाराच्या विरोधात निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी’, अशी मागणी केली. दुसरीकडे ममता बॅनर्जी यांनी मात्र या हिंसाचारासाठी भाजपला दोषी ठरवले आहे. तृणमूल काँग्रेसने एक ‘व्हिडिओ’ प्रसारित केला असून त्यात भाजपचे कार्यकर्ते जाळपोळ करत असल्याचे दिसत आहे, तर दुसरीकडे भाजपनेही तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा हाणामारी करतांनाचा ‘व्हिडिओ’ प्रदर्शित केला आहे. ईश्‍वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची नासधूस भाजपच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे; मात्र अमित शहा यांंनी हा आरोप फेटाळला आहे. या पुतळ्याची तोडफोड केल्याचा ‘व्हिडिओ’ तृणमूल काँग्रेसने प्रसारित केला आहे. याप्रकरणी भाजपच्या कार्यकर्त्यांना मध्यरात्री अटक करण्यात आली आहे. या तोडफोडीच्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

भाजपचे नशीब चांगले असल्याने मी शांत बसले आहे ! – ममता बॅनर्जी यांची दर्पोक्ती

ज्या राज्याच्या मुख्यमंत्री गुंडगिरीची भाषा वापरतात, त्या राज्यातील स्थिती काय असते, ते संपूर्ण देश पहात आहे; मात्र या हिंसाचाराविषयी देशातील एकही पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी, लोकशाहीप्रेमी, राज्यघटनेचे आदर करणारे लेखक, अभिनेते, आदी लोक तोंड उघडत नाहीत. उलट भाजपलाच हिंसाचारी म्हणतात, यातून त्यांचे ढोंग लक्षात येते !

कोलकाता – तुमचे (भाजपवाल्यांचे) नशीब चांगले आहे की, मी शांत बसले आहे. कोलकात्यामध्ये इतका मोठा हिंसाचार कधीच झाला नाही. नक्षलवादाच्या वेळीही झाला नाही. आम्ही तुम्हाला सोडणार नाही, अशी धमकी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली आहे.

ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या, ‘‘देहलीतील गुंड आणि फॅसिस्ट नेते आमच्या बंगालमधील प्राचीन वारसांना हात लावत असतील, तर माझ्याहून अधिक वाईट कोणी नसणार. आमच्या नेत्यांना हात लावणार्‍यांना मी सोडणार नाही.  शांती शांती करून मी खूप संयम राखला आहे.’’

‘सीआरपीएफ’चे पोलीस नसते, तर मी जिवंत राहिलो नसतो ! – अमित शहा यांचा दावा

देहली – तृणमूल काँग्रेसने केलेल्या ‘रोड शो’वरील आक्रमणापासून मी थोडक्यात बचावलो आहे. तेथे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफचे) पोलीस उपस्थित होते. त्यांनी मला तेथून सुखरूप बाहेर काढले. ते नसते, तर मी जिवंत राहिलो नसतो, असा दावा अमित शहा यांनी केला आहे. रोड शोमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर देहली येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी त्यांची बाजू मांडली.

शहा म्हणाले, ‘‘भाजपची सत्ता असलेल्या कोणत्याही राज्यात हिंसाचाराची घटना घडलेली नाही. देशात ६ टप्प्यांतील मतदान शांततेत पार पडले आहे. केवळ बंगालमध्ये सहाही टप्प्यांत हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे हा हिंसाचार तृणमूल काँग्रेसच घडवत आहे. या सर्व घटनांकडे निवडणूक आयोग डोळेझाक करत आहे. प्रत्येक टप्प्यानंतर भाजपने बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराकडे निवडणूक आयोगाचे लक्ष वेधले. ‘तृणमूल काँग्रेसच्या गुंडांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत निवडणूक शांतपणे आणि निःपक्षपाती वातावरणात होणार नाही’, असे आम्ही आयोगाला सांगितले; मात्र आयोगाने आमच्या तक्रारीवर कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाचा दुटप्पीपणा दिसून येतो.’’

बंगालमध्ये हुकूमशाही ! – शिवसेना

मुंबई – ममता बॅनर्जी यांचा जर पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा अमित शाह यांना राजकीय विरोध असेल, तर त्यांनी प्रचारासाठी कर्णावती, गांधीनगर, सुरत किंवा इतर राज्यांत जायला हवे होते; परंतु त्या गेल्या नाहीत. जर घटनेने ममता बॅनर्जी यांना प्रचार करण्याचा अधिकार दिला आहे, तर तोच अधिकार अमित शहा, नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ आदी भाजपच्या नेत्यांना बंगालमध्ये जाऊन प्रचार किंवा ‘रोड शो’ करण्याचा आहे. अशा प्रकारे या देशाच्या निवडणुकांमध्ये जर हिंसाचार होणार असेल, तर जगामध्ये सर्वांत मोठी आणि सशक्त आमची लोकशाही आहे, हे कुठल्या तोंडाने सांगायचे? बंगालमध्ये ‘जय श्रीराम’चा नारा देता येत नाही; कारण ममता बॅनर्जी यांना ते आवडत नाही. ममता बॅनर्जी यांचे व्यंगचित्र काढणार्‍या मुलीला कारागृहात टाकण्यात आले. जर तुम्ही भाजपच्या नेत्यावर हुकूमशाहीचे आरोप करता, तर तोच आरोप तुम्हालाही लागू होतो.


Multi Language |Offline reading | PDF