सद्गुरूंनी शिष्याला ‘त्यांची भेट पुन्हा कधी होईल ?’, याची समाधी घेण्यापूर्वी जाणीव करून देणे

वैशाख शुक्ल पक्ष एकादशीला असलेल्या सद्गुरु श्री देवेंद्रनाथ यांच्या समाधीदिनाच्या निमित्ताने…

‘वैशाख शुक्ल पक्ष एकादशी, शके १९०४ या तिथीला (सोमवार, ३ मे १९८२ या दिवशी) सद्गुरु श्री देवेंद्रनाथांनी योगमायेने संजीवन समाधी घेतली. त्या वेळी त्यांचे वय अवघे ४५ वर्षे होते. महाराज समाधीस्त होण्याच्या ४ दिवस आधी मी आणि कु. सुनिता (घाटे) कवडे, बहिरवाडी, ता. नेवासा येथे मुक्कामासाठी गेलो होतो. त्या ठिकाणी सद्गुरूंच्या समवेत पुष्कळ वेळ सत्संग चालला होता. या सत्संगाच्या वेळी मध्येच थांबवून ते क्षणभर भावावस्थेत गेले आणि शांतपणे बोलू लागले. माझा समाधीचा काळ आता जवळ आलेला आहे. माझे सद्गुरु स्वामी राघवेंद्र यांनी मला ‘आता हे कार्य थांबवून तू माझ्याजवळ ये’, असा आदेश दिला आहे. तेव्हा मला आता अधिक दिवस रहाता येणार नाही. श्री देवेंद्रनाथांचे उद्गार ऐकून मी अगदी सद्गदीत झालो आणि महाराजांना म्हणालो, ‘‘महाराज, समाधीचा विषय सोडून बाकीचे बोला.’’ त्यावर ते हसून म्हणाले, ‘‘अहो, जे सत्य आहे, ते मी तुम्हाला सांगतो. तुम्ही भावनावश होऊ नका. या चैतन्यातच चैतन्य बनून मी रहाणार आहे. मी कुठेही जाणार नाही. तुम्ही भक्तीभावाने माझे स्मरण केल्यावर तेथे मी हजर रहाणार आहे. मी निरंजन स्वरूपात आणि दिव्य तेजाच्या स्वरूपात तुम्हाला दर्शन देणारच आहे. प्रोफेसर, आता आपण ३०० वर्षांनी भेटणार आहोत. तोपर्यंत मी विश्रांती घेणार आहे.’’ त्यांच्या या वाक्याचा मला अर्थ उलगडेना; म्हणून मी त्यांना प्रश्‍न केला, ‘‘महाराज ३०० वर्षे म्हणजे ?’’ त्यावर ते हसून म्हणाले, ‘‘प्रोफेसर, माझे सद्गुरु स्वामी राघवेंद्र यांनी ७०० वर्षे समाधीत रहाण्याचा संकल्प सोडला आहे. ते ज्या वेळी संकल्प पूर्ण करून वृंदावनातून बाहेर येतील, त्या वेळी त्यांच्या स्वागताला आपण सर्व जण तेथे उपस्थित असणार आहोत हे विसरू नका.’’

– प्रा. अशोक जी. नेवासकर

(संदर्भ : सद्गुरु सत्संगातील अमृतानुभव)


Multi Language |Offline reading | PDF