पणजी पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार बाबूश मोन्सेरात यांनी बलात्कार केल्याच्या प्रकरणातील अल्पवयीन मुलीचे वसतीगृहातून पलायन

पणजी – पणजी पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार तथा माजी मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्यावर आरोप असलेल्या बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन मुलीने कासावली येथील कॉन्व्हेंटच्या वसतीगृहातून पलायन केले आहे. २८ एप्रिल या दिवशी ही घटना घडली आहे. याविषयी कॉन्व्हेंटच्या सिस्टरने वेर्णा पोलीस ठाण्यात १० मे या दिवशी तक्रार नोंदवली आहे. (तक्रार नोंदवायला कॉन्व्हेंटच्या प्रशासनाला १२ दिवस का लागले ? असा प्रश्‍न निर्माण होतो ! – संपादक)

पोलीस सूत्रानुसार काही वर्षांपूर्वी बाबूश मोन्सेरात यांनी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंद झालेली आहे आणि सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणी सत्र न्यायालयाने आरोप निश्‍चित केलेले आहेत. या बलात्काराच्या घटनेनंतर बलात्कारास बळी पडलेली मुलगी अल्पवयीन असल्याने आणि तिचे पालन-पोषण करणारे कोणी नसल्याने नागरिक कल्याण समितीने मुलीला कह्यात घेतले होते, तसेच मुलगी अल्पवयीन असल्याने तिला मेरशी येथे अपना घरात वास्तव्यास ठेवले होते. मुलीला १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला अपना घरातून बाहेर काढणे नागरिक कल्याण समितीला भाग पडले. यानंतर समितीच्या सदस्यांनी कासावली येथील एका सिस्टरच्या कॉन्व्हेंटच्या वसतिगृहामध्ये तिची रहाण्याची सोय केली. ती सध्या कार्मेल महाविद्यालयात ११ वीचे शिक्षण घेत होती; मात्र परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने ती अस्वस्थ होती. ‘अपना घरातील मैत्रिणींना भेटण्यासाठी जाते’, असे सांगून गेलेली संबंधित मुलगी परत आली नसल्याचे कॉन्व्हेंटच्या सिस्टरने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. संबंधित मुलीने यापूर्वी वसतिगृहात २ वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र वसतिगृहात रहाणार्‍या इतर मुुलींच्या सावधानतेमुळे तिचा हा प्रयत्न फसल्याची माहितीही सिस्टरने पोलिसांना दिली आहे. ‘न्यायालयात सुनावणीच्या वेळी संबंधित मुलगी अनुपस्थित राहिल्यास या खटल्याला वेगळेच वळण लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे यामागे मुलीला गायब करण्याचा कट रचलेला नाही ना?’, या अनुषंगाने सध्या पोलीस अन्वेषण चालू आहे.


Multi Language |Offline reading | PDF