बालपणापासूनच कृष्णाची ओढ असलेली, ५३ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला चिंचवड, पुणे येथील चि. मोक्षदा विनीत पाटील (वय १ वर्ष ८ मास) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. मोक्षदा पाटील ही एक आहे !

१. गर्भधारणेपूर्वी

१ अ. ‘धर्म अन् राष्ट्र यांसाठी कार्य करणारा पुत्र जन्मास यावा’, अशी कुलदेवीला प्रार्थना होणे : ‘लग्नाच्या आधी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील एक नाटक पाहिले होते. ते पहातांना माझी कुलदेवीस प्रार्थना झाली, ‘जिजाऊंसारखे क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज आणण्यासाठी माझ्याकडूनही प्रयत्न होऊ दे. प्रारब्धात लग्न आणि मातृत्व असेल, तर जिजाऊंच्या पोटी जसे शिवाजी महाराज जन्माला आले, तसा माझ्या पोटी शूरवीर, सात्त्विक आणि आध्यात्मिक पुत्र जन्मास यावा आणि त्याच्याकडून धर्म अन् राष्ट्र यांसाठी कार्य व्हावे.’

(स्त्रियांनी कोणती प्रार्थना करावी, याचे सौ. अनुराधा पाटील यांनी सर्वांपुढे एक आदर्श उदाहरण ठेवले आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले)

१ आ. एका संतांनी सांगितल्याप्रमाणे लग्नानंतर पूर्वजांचे त्रास होऊन गर्भपात होणे : गुरुदेवांच्या कृपेने साधनेस अनुकूल अशा मुलाशी माझे लग्न झाले. लग्नापूर्वी ‘साधना म्हणजे काय ?’, हे ठाऊक नसलेले माझे यजमान लग्नानंतर साधना आणि सेवा समजून घेऊ लागले. त्यांनी मला कोणत्याही सेवेला कधीच विरोध केला नाही. लग्नानंतर ३ – ४ मासांनंतर मला हाताला मुंग्या येणे, पाठीच्या मणक्याचे दुखणे, असे बरेच शारीरिक त्रास चालू झाले. त्या वेळी माझी व्यष्टी साधनाही व्यवस्थित होत नव्हती. ‘पूर्वजांचा तीव्र त्रास असल्यामुळे गर्भधारणेस अडचणी किंवा गर्भपात असे त्रास भविष्यात होऊ शकतात’, असे एका संतांनी आम्हाला सांगितले होते. याच कालावधीत मला गर्भधारणा होऊन दुसर्‍याच मासात माझा गर्भपात झाला.

१ इ. ‘सात्त्विक बाळ जन्मास येऊ दे’, अशी सतत प्रार्थना करणे : त्यानंतर आम्ही ‘जोपर्यंत आपली साधना व्यवस्थित होत नाही आणि आपण शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या सक्षम होत नाही, तोपर्यंत बाळाचा विचार नको’, असा विचार केला. या काळात माझ्याकडून नेहमी प्रार्थना व्हायची, ‘देवा, आमच्या पोटी सात्त्विक, तेजस्वी, आमच्या कुळाचा उद्धार करणारे आणि संत प्रवृत्तीचे बाळ जन्मास येऊ दे. त्यासाठी तूच आमच्याकडून प्रत्येक कृती साधना अन् सेवा म्हणूनच करवून घे; कारण हिंदु राष्ट्रासाठी अशा बाळास जन्म देणे, हीदेखील एक सेवाच आहे.’

१ ई. कुलदेवीच्या दर्शनाला गेल्यानंतर लगेचच दुसर्‍या मासात गर्भधारणा होणे : आम्ही लग्न झाल्यापासून आमच्या कुलदेवतेचे दर्शन घेतले नव्हते. प्रत्येक वर्षी तिच्या दर्शनास जाण्यात अडचणी येत होत्या. देवाच्या कृपेने जेव्हा आम्ही बाळासाठी प्रयत्न करायचे ठरवले, तेव्हा आम्ही कुलदेवीचे निर्विघ्नपणे दर्शन घेऊ शकलो. त्या नंतरच्या मासात वैद्यकीय तपासणी करणे, घरात सात्त्विक वातावरण ठेवणे, आध्यात्मिक उपाय करणे इत्यादी प्रयत्न देवानेच करवून घेतले आणि दुसर्‍याच मासात मला गर्भधारणा झाल्याचे कळले.

२. गर्भारपण

२ अ. सनातनच्या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे गर्भावर संस्कार करणे : गर्भधारणा झाल्यावर आम्ही सनातनच्या ‘संस्कार हीच साधना’ या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे पुरोहितांकरवी गर्भावर दुसर्‍या मासातील संस्कार आणि चौथ्या मासात सीमंतोन्नयन संस्कार केला.

२ आ. ग्रंथवाचन आणि स्तोत्र पठण : गर्भारपणात मी ‘श्रीमद्भगवद्गीता’ (मराठी), ‘हरिविजय कथासार’ आदी ग्रंथ आणि छ. शिवाजी महाराजांचे चरित्र थोडेफार वाचले. तेव्हा ‘बाळ क्षात्रवीर व्हावे. ते कृष्णाचे भक्त व्हावे’, असे मला वाटे. या दिवसात मला ‘मधुराष्टकम् स्तोत्र’ सतत ऐकावेसे वाटे. अनेकदा मी रामरक्षा, अथर्वशीर्ष, मारुतिस्तोत्र आणि रात्री झोपण्यापूर्वी ‘चंडीकवच’ ऐकत असे.

२ इ. लांबचा प्रवास करून नवचंडीच्या पूजेला जाता येणे : तिसर्‍या मासात माझ्या सासरी नागपूरला नवचंडीची पूजा आणि होम होता. त्याचाही गर्भाला अन् मला लाभ घेता आला. खरेतर आधुनिक वैद्यांनी ‘३ मास प्रवास करायचा नाही’, असे सांगितले होते; परंतु देवाच्या कृपेने मला १८ ते १९ घंट्यांंचा प्रवास करून तेथे जाता आले आणि दोन्ही दिवस पूजेला बसता आले. देवाच्या कृपेने संपूर्ण प्रवासात आणि पूजेच्या दिवसांत गर्भ सुरक्षित राहिला.

२ ई. परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांचा अमृत महोत्सवाचा सोहळा आणि गुरुपौर्णिमेचा सोहळा यांना जाता येणे : चौथ्या मासात परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांचा अमृत महोत्सवाचा सोहळा अनुभवता आला. मला हा सोहळा पहाण्यासाठी केंद्रात जाता आले आणि सोहळ्याच्या ठिकाणी पूर्ण वेळ बसून सोहळा अनुभवता आला. सहाव्या मासात मला गुरुपौर्णिमेस जाता आले आणि प्रासंगिक सेवाही करता आली.

२ उ. गर्भारपणात केलेल्या प्रार्थना आणि भावाचे प्रयोग

१. गर्भारपणात माझ्याकडून प्रार्थना, कृतज्ञता, गर्भावर वेगवेगळे भावाचे प्रयोग करणे, गर्भाशी बोलणे इत्यादी व्हायचे. मी प्रतिदिन गर्भाला सांगायचे, ‘परात्पर गुरुदेव साक्षात् श्रीविष्णूचा अवतार आहेत. तू सतत त्यांच्या अनुसंधानात रहाण्यासाठी प्रयत्न कर.’

२. आधुनिक वैद्यांना भेटायला जातांना किंवा सोनोग्राफी करतांना देवच भावाचे वेगवेगळे प्रयोग करवून घ्यायचा, उदा. आधुनिक वैद्यांना आधी सूक्ष्मातून मोरपीस लावणे, ‘त्यांच्या माध्यमातून गुरुदेवच तपासणी अन् मार्गदर्शन करणार आहेत’, असा भाव ठेवणे, सोनोग्राफीच्या पटलावर गर्भ दिसल्यावर त्यावरून सूक्ष्मातून मोरपीस फिरवणे, त्याच्याभोवती श्रीकृष्णाच्या नामाचे मंडल करणे, असे विविध प्रयोग देव माझ्याकडून करवून घ्यायचा.

३. आरंभी मला नामजप करतांना गर्भाची हालचाल जाणवायची. इतर वेळेस ती जाणवत नसे. पहिली सोनोग्राफी करतांना ‘मागच्यासारखा पुन्हा गर्भपात होणार नाही ना ?’, असा नकारात्मक विचार माझ्या मनात यायचा; परंतु प्रार्थना केल्यावर माझे मन सकारात्मक व्हायचे.

२ ऊ. आश्रमात जाण्याची तळमळ वाढणे : मला गर्भारपणात ‘आश्रमात जावे, आश्रमातच रहावे, पूर्णवेळ साधना करावी’, असे पुष्कळ वाटायचे. मला सारखी आश्रमाची आठवण येऊन डोळ्यांत पाणी यायचे. ‘हे बाळ गुरुदेवांचेच आहे. हिंदु राष्ट्रासाठीच या बाळाचा जन्म होणार आहे. या बाळाला गुरुसेवा अन् साधना हेच करायचे आहे. आश्रमातील गुरुकुलातच बाळ शिकणार आहे. त्यामुळे त्याचा जन्म आश्रमातच व्हावा’, असा विचार माझ्या मनात सतत यायचा. माझे यजमानही मला म्हणायचे, ‘‘आपण एक दिवस किमान पनवेलच्या आश्रमात तरी जायचे का ? तू विचारून घे’’; पण मी विचारले नाही. ‘आपल्याला आश्रमात जाता येणार नाही’, या विचाराने मला रडू यायचे.

२ ए. सेवेतून आनंद मिळून सेवा करतांना शारीरिक त्रास उणावणे : शारीरिक त्रास असूनही मला गर्भारपणात ९ व्या मासापर्यंत देवाच्या कृपेने सेवा करता आली. देवालाच माझी काळजी होती; म्हणून देवाने मला सेवेतून आनंद दिला. सेवा चालू असल्यास माझे त्रास उणावत असत आणि मन आनंदी राही. मी सेवा केली नाही, तर त्रास वाढल्याचे लक्षात यायचे. शेवटच्या मासात मी जेव्हा सेवा करणे थांबवले, तसे माझे शारीरिक आणि मानसिक त्रासही वाढल्याचे माझ्या लक्षात आले.

२ ऐ. देवाच्या कृपेने सत्संग मिळून सकारात्मक रहाता येणे : देवाच्या कृपेने मला घरी राहूनच भ्रमणभाषद्वारे प्रसिद्धी सत्संगात सहभागी होता यायचे. साधकांमुळे मला घरी राहूनच सत्संग मिळायचा. मी सारखी नकारात्मक स्थितीत जायचे आणि देव कोणत्या ना कोणत्या प्रकारे मला पुन्हा सकारात्मक करायचा.

२ ओ. साधनेमुळे सकारात्मक रहात असल्याचे आधुनिक वैद्यांनी सांगणे : आठव्या मासात माझ्या पाठीच्या दुखण्यासाठी आम्ही व्यायाम शिकवणार्‍या आधुनिक वैद्यांकडे गेलो होतो. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘तू आता अधिक आनंदी वाटत आहेस. तुला इतके शारीरिक त्रास होत असूनही माझ्याकडे येणार्‍या इतर गर्भवती महिलांपेक्षा तू सकारात्मक आहेस. तू जे अध्यात्माचे (साधना) करतेस, त्यामुळेच असे असावे.’’

२ औ. सकारात्मक रहाण्यासाठी यजमानांनी केलेले साहाय्य : माझे यजमान अनेकदा गर्भाशी बोलायचे. ते त्याला गुरुदेवांविषयी सांगायचे. तेव्हा कधी कधी मला बाळाची हालचाल होत असल्याचे जाणवायचे. ‘बाळाचा जन्म देश आणि धर्म यांचे कार्य करण्यासाठीच व्हावा’, असे यजमानांना सतत वाटे. ‘आपली दोघांची साधना व्यवस्थित होत नाही. त्यामुळे बाळच आपली सेवा आणि साधना करवून घेणार आहे’, असे यजमान मला नेहमी सांगत. संपूर्ण गर्भारपणात मला सकारात्मक ठेवण्यासाठी त्यांनी पुष्कळ साहाय्य केले. ते घरातील आणि बाहेरील सर्व कामे आनंदाने आणि सकारात्मक राहून करत असत.

२ अं. गर्भारपणात झालेले त्रास

२ अं १. अस्वस्थता वाढणे : गर्भारपणात मला अनेक शारीरिक त्रास होत असल्याने माझ्या मनावर पुष्कळ ताण यायचा. आरंभी मला ३ मास पुष्कळ औषधे आणि इंजेक्शन्स घ्यावी लागली. त्यामुळे माझ्या मनावर पुष्कळ ताण यायचा. त्या काळात मला मानसिक अस्वस्थता पुष्कळ जाणवत होती. मला बसून सेवा करणेदेखील जमायचे नाही.  (क्रमश:)

– सौ. अनुराधा विनीत पाटील, चिंचवड, पुणे. (८.७.२०१७)


Multi Language |Offline reading | PDF