गुरुदेवांवर श्रद्धा असणारी आणि स्मरणशक्ती उत्तम असणारी ५५ टक्के अध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कल्याण, ठाणे येथील चि. अनुश्री उमेश सावंत (वय ४ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. अनुश्री उमेश सावंत ही एक आहे !

सनातन परिवाराकडून चि. अनुश्री सावंत हिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

(‘वर्ष २०१७ मध्ये चि. अनुश्री हिची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के होती.’ – संकलक)

यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

कल्याण, ठाणे येथील चि. अनुश्री सावंत हिचा आज तिथीनुसार वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

१. उत्तम स्मरणशक्ती

‘अनुश्रीची स्मरणशक्ती पुष्कळ चांगली आहे. तिने एखादे गीत किंवा श्‍लोक २ – ३ वेळा ऐकले की, तिचा तो लगेच पाठ होतो. मला आणि तिच्या आजीला परात्पर गुरु पांडे महाराज यांनी आध्यात्मिक उपायांसाठी संस्कृत मंत्र दिले होते. तेही तिला मुखोद्गत आहेत.

२. निरीक्षणक्षमता

तिची निरीक्षणक्षमता चांगली असल्यामुळे ती बाहेर फिरायला गेल्यावर ‘तिथे काय काय पाहिले ?’, ते अचूक सांगते.

३. गुरुदेवांवरील श्रद्धा

तिची परात्पर गुरु डॉक्टरांवर पुष्कळ श्रद्धा आहे. तिला दैनिकात किंवा कुठेही गुरुदेवांचे छायाचित्र दिसले की, ती मला सांगते, ‘आई, हे बघ परम पूज्य !’ एकदा ती आणि तिची मावशी बोलत होती. तेव्हा तिने मावशीला सांगितले, ‘मावशी, तू दुसर्‍या खोलीत एकटी झोप ना ! तू घाबरू नको; कारण तिथेही परम पूज्य आहेत. मग कशाला घाबरतेस ?’

४. देवावरील श्रद्धा

एकदा अनुश्रीचे बाबा घरी नव्हते. आम्ही दोघीच घरी होतो. तेव्हा रात्री झोपतांना अनुश्री मला म्हणाली, ‘‘आई, बाबा नाहीत, तर तू घाबरू नको. आपल्या घरी बाप्पा आहे ना ! तू झोप.’’ तिने चूक केल्यावर आम्ही तिला सांगतो, ‘‘बाप्पाला हे आवडत नाही’’ आणि ती लगेच ऐकते.

५. मुक्या प्राण्यांविषयी प्रेमभाव

अनुश्रीला मुके प्राणी आवडतात. ती शाळेतून घरी येतांना तिला वाटेत कुत्रे, गाय आणि मांजर दिसतात. तेव्हा ती म्हणते, ‘यांना आपण घरी घेऊन जाऊया आणि त्यांना खाऊ देऊया.’ ती जेव्हा गावी जाते, तेव्हा गोठ्यातील गायी-म्हशींकडे तासन् तास पहात उभी रहाते.

६. आध्यात्मिक उपाय करणे

अनुश्री दैनिकाने आवरण काढते आणि कापूर अन् अत्तराचे उपाय नियमित करते.

७. स्वच्छतेची आवड असणे

घरात फरशीवर काही पडले असेल, तर ती लगेच केरसुणी घेऊन उचलून टाकते. शाळेतून आल्यावर घर स्वच्छ असेल, तर मला म्हणते, अरे वा ! आई, तू घर किती छान ठेवले आहेस !’’ आणि घर अस्वच्छ दिसले, तर मला म्हणते, ‘‘आई, किती पसारा करून ठेवला आहेस ? किती गंदू (खराब) दिसते.’’

८. सहनशीलता

ती सहनशील आहे. त्यामुळे तिला कितीही जोरात लागले, तरी ती अधिक वेळ रडत बसत नाही.

९.  तिला सगळ्या गोष्टींविषयी जिज्ञासा असते.

१०. कलेची आवड

तिला रांगोळी काढणे, मेंदी काढणे आणि नृत्य करणे आवडते.

११. अनुश्रीचे स्वभावदोष

१. हट्टीपणा २. सांगितलेले न ऐकणे ३. चंचलता ४. उतावळेपणा ५. भ्रमणभाषवर चलचित्र (व्हिडिओ) पहाणे.

– गुरुचरणी अर्पण

सौ. विनया उमेश सावंत (चि. अनुश्रीची आई), कल्याण, ठाणे. (२६.४.२०१९)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now