मुलींची मुंज !

ठाणे येथे नुकतीच राष्ट्रसेविका समिती आणि भगिनी निवेदिता उत्कर्ष मंडळ यांच्या वतीने मुलींची मुंज करण्यात आली. ‘शिक्षा आणि संस्कार’ असे ब्रीदवाक्य असलेल्या मंडळाने जातीपातीची बंधने झुगारून वाजतगाजत आणि थाटामाटात मुलींच्या उपनयन सोहळ्याचा कार्यक्रम केला. या ‘हायटेक’ युगात मुलांची मुंज केली जाते, तर मुलींचीही मुंज करण्याचा अभिनव (?) उपक्रम या संघटनेने केला. ही बातमी वाचल्यानंतर ‘मुलांचीच मुंज नाही, तर मुलींचीही मुंज करायला हवी आणि आम्ही ती केली’, हा भागच अधोरेखित होतो. खरेतर धार्मिक कृती करण्यापूर्वी त्या कृतींचा उद्देश समजून केल्यास त्याचा करणार्‍याला आणि करून घेणार्‍यालाही आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो.

गर्भधारणेपासून विवाहापर्यंतच्या काळात पुत्र किंवा कन्या यांच्याकडून सम्यक (सात्त्विक) कृती व्हावी, यासाठी आई, वडील आणि आचार्य वैदिक पद्धतीने जे विधी करवून घेतात, त्यांना ‘संस्कार’ असे म्हणतात. संस्कार ही मूल्यवर्धक प्रक्रिया आहे. याचाच अर्थ चांगले करणे, शुद्ध करणे असा आहे. अर्थात ज्या क्रियेच्या योगाने मनुष्याच्या ठिकाणी सद्गुणांचा विकास आणि संवर्धन होते अन् दोषांचे निराकरण होते, त्या क्रियेला ‘संस्कार’ म्हणतात. ‘उपनयन (मुंज) हा संस्कार म्हणजे मुलांचा दुसरा जन्म, तर विवाह म्हणजे मुलींचा दुसरा जन्म’, असे धर्मामध्ये सांगितले आहे. उपनयन विधीमध्ये मुलांना गायत्रीचा उपदेश केला जातो. त्यामुळे त्यांना वेदाध्ययनाचा अधिकार येतो. यानंतर मुलांनी वेदांचा अभ्यास करून एकतर गृहस्थाश्रम किंवा संन्यासाश्रम स्वीकारायचा असतो. सध्या यातील वेदाध्ययन करण्याचा महत्त्वाचा भाग मुलांविषयीही होतांना जाणवत नाही.

पूर्वीच्या काळी गार्गी आणि मैत्रेयी या मुलींचीही मुंज केली होती; मात्र त्याकाळी मुलींवर धार्मिक संस्कार होते. समाजही सात्त्विक होता. यामुळे धर्मामध्ये सांगितलेल्या सर्व नियमांचे पालन त्या सहजपणे करत असत. सध्याचा काळ पाहिल्यास मुलींना धर्मशिक्षण देऊन त्यांना धर्माचरण करण्यास शिकवणे प्रथम व्हायला हवे. ते न झाल्यामुळे सर्वच मुलींचे आचरण शुद्ध, सात्त्विक आणि पवित्र आहे, असे म्हणता येत नाही. हा सर्व भाग पाहिल्यास सध्याच्या काळात मुलींची मुंज करणे अयोग्य आहे. धर्मामध्ये सांगिलेल्या विधींचा उद्देश समजून न घेतल्यास या कृती केवळ ‘फॅशन’ म्हणून होतात. हिंदूंनी धार्मिक विधी ‘फॅशन’ या उद्देशाने न करता आध्यात्मिक स्तरावर लाभ होण्यासाठी धर्मशास्त्रामध्ये सांगितलेले सर्व नियम पाळून करावेत. ‘शिक्षा आणि संस्कार’ हे ब्रीदवाक्य असलेल्या संघटनांनी बाल आणि युवा पिढीला योग्य संस्कार देण्याचे ध्येय ठेवल्यास त्याचा समाजाला, पर्यायाने राष्ट्राला आणि या संघटनेच्या कार्यकर्त्यांनाही लाभ होईल.

– वैद्या (कु.) माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल.


Multi Language |Offline reading | PDF