राजकारणाचे गुन्हेगारीकरण !

संपादकिय

लोकसभेच्या निवडणुकीचा आता शेवटचा एकच टप्पा राहिला असून १९ मे या दिवशी होणारे एकच मतदान शिल्लक राहिले आहे. राजकारणात गुन्हेगारी प्रवृत्तींचा शिरकाव हे वारंवार उपस्थित होणारे सूत्र असून त्यावर काहीही करण्याची कोणत्याही राजकीय पक्षाची इच्छाशक्ती नाही. सर्वच राजकीय पक्ष ‘आम्ही गुन्हेगारांना थारा देत नाही’, असे सभांमधून, पत्रकार परिषदांमधून सांगतात. प्रत्यक्षात तिकीट वाटपात ‘निवडून येणे’, हाच एकमेव निकष असल्याने ‘बाहुबली’ उमेदवार अर्थात् गुन्हेगारी पार्श्‍वभूमी आणि ‘धनको’ उमेदवारांनाच उमेदवारी देण्यात येते. कोल्हापुरात नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका आणि माजी उपमहापौर शमा मुल्ला यांना अटक करण्यात आली. त्यांचे पती सलीम मुल्ला हेच मटका चालवणारे आणि अनेक गंभीर गुन्ह्यात सहभागी आहेत. मुल्ला आणि त्यांचे साथीदार यांनी पोलिसांवर आक्रमण करून त्यांच्याकडील बंदूक घेऊन पलायन केले. या उदाहरणाच्या निमित्ताने गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकप्रतिनिधी निवडून आल्यावर त्यांचा साम्राज्यविस्तार ते कसे करतात, प्रसंगी पोलिसांवर हात टाकायलाही मागे-पुढे पहात नाहीत, हेच या निमित्ताने पहावयास मिळाले.

‘असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स’च्या वतीने घोषित केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या ७ टप्प्यांमध्ये झालेल्या मतदानात ८ सहस्र ४९ उमेदवार उभारले असून यातील १ सहस्र ५०० उमेदवार म्हणजे १९ टक्के उमेदवार हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. यातील १३ टक्के लोकांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. ४९ पेक्षा अधिक मतदारसंघ असे आहेत की, ज्यातील तीनपेक्षा अधिक उमेदवार गुन्हेगारीशी संबंधित आहेत. १ सहस्र ७० उमेदवार असे आहेत की, ज्यांच्यावर लाच घेणे, खून, खुनाचा प्रयत्न, महिलांवर अत्याचार करणे अशा गुन्ह्यांची नोंद आहे ! असे उमेदवार जेव्हा निवडून येतील, तेव्हा सामान्य लोकांना ते न्याय देतील, अशी अपेक्षा करणे व्यर्थच आहे !

वर्ष २००९ मध्ये १ सहस्र १५८ उमेदवारांवर (८ टक्के) गंभीर गुन्हे नोंद होते. वर्ष २०१४ मध्ये १ सहस्र ४०७ (१७ टक्के) जणांवर, तर वर्ष २०१९ मध्ये १ सहस्र ५०० उमेदवारांवर गुन्हे नोंद आहेत. याचा अर्थ गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या उमेदवारांची टक्केवारी वाढून ती १९ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. केवळ गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवारांमध्ये वाढ होत आहे असे नाही, तर निवडणुकीत उभारणार्‍या कोट्यधीशांची संख्याही वाढत आहे. या लोकसभा निवडणुकीत २९ टक्के उमेदवारांकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती असून काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी कोट्यधीश असणार्‍यांनाच तिकीट दिले आहे. त्याची टक्केवारी ८३ टक्के आहे. कोट्यधीश असणारे आणि निवडून येणारे लोकप्रतिनिधी पुढील निवडणुकीपर्यंत अब्जाधीश होतात. सामान्य माणूस हे हतबलतेने पहाण्यापलीकडे काहीच करू शकत नाही ! हे रोखायचे असेल तर हिंदु राष्ट्रच हवे !

भ्रष्टाचार्‍यांवर कारवाई कधी ?

स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, तसेच लालबहाद्दूर शास्त्री यांच्यासारख्या अनेकांना काँग्रेसने त्रास दिला. या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजप परत एकदा ही सूत्रे जनतेसमोर मांडत आहे. ‘लालबहाद्दूर शास्त्री यांचा गूढ मृत्यू आणि त्या संदर्भात काँग्रेसकडेच वळणारी सुई’, हे सूत्र सर्वांना ठाऊक आहे. त्यांच्या मृत्यूचे गूढ उकलावे, अशी समस्त राष्ट्रप्रेमींची इच्छा आहे. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपने हे सूत्र उचलले; मात्र केंद्रात भाजप सरकार आल्यापासून हे प्रकरण धसास लावण्यासाठी त्याने काय केले ? रॉबर्ट वाड्रा यांचे भूमी भ्रष्टाचार प्रकरण तर प्रत्येक ६ मासांनी समोर येतेच; मात्र त्याही प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा प्रविष्ट होण्याच्या पलीकडे काय झाले ? नुकतेच दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्यांच्या कार्यकाळात नौदलाचे युद्धवाहू जहाज वैयक्तिक कारणांसाठी वापरले, तसेच दिवंगत राजीव गांधी यांची प्रतिमा ‘भ्रष्टाचारी’ अशी होती, असे भाजपने सांगितले; मात्र त्या काळात ज्यांनी नौदलाचे जहाज वापरू दिले त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी भाजपने काय केले ? अथवा ‘बोफोर्स प्रकरण धसास लावण्यासाठी काय केले’, असे विचारले तर त्याचे उत्तर नकारार्थीच मिळेल !

राहुल गांधी यांनी उमेदवारी आवेदन प्रविष्ट केल्यावर त्यांच्या उमेदवारीवर ते भारतीय नसल्याविषयी आक्षेप घेतला जातो, न्यायालयात भाजपकडून याचिका प्रविष्ट होते; मात्र सत्तेवर आल्यावर गेल्या ५ वर्षांत राहुल गांधी ‘भारतीय नागरिक आहेत कि नाही’, हे शोधून काढण्यासाठी भाजप सरकारने काय प्रयत्न केले ? केंद्र ते राज्य आणि प्रत्येक यंत्रणा भाजपकडे असतांना हे प्रकरण धसास लावण्यासाठी भाजपने का प्रयत्न केले नाहीत ? शीख दंगलीचे सूत्रेही भाजप नेहमी उचलते; मात्र त्याही प्रकरणात केवळ एका काँग्रेस नेत्याला शिक्षा होण्याच्या पलीकडे काय झाले ? ‘केवळ निवडणुकांच्या निमित्ताने लोकांना भावनिक आवाहन केले जाते आणि निवडणुका जिंकल्यानंतर ही सर्व सूत्रे बासनात गुंडाळून ठेवली जातात’, असे भारतियांनी समजायचे का ? काँग्रेसचा भ्रष्टाचार, राष्ट्रहिताच्या विरोधी निर्णय घेणे यांमुळे जनता कंटाळली आहे. संबंधितांना शिक्षा मिळावी, यासाठीच राष्ट्रप्रेमींनी भाजपला भरघोस मतांनी निवडून दिले. सत्तेत आल्यावर विरोधकांवर केवळ टीका करून थांबायचे नसते, तर राष्ट्रहिताला बाधा पोचवणार्‍या लोकांना कठोर शिक्षा मिळण्यासाठी प्रयत्न करायचे असतात. भाजप या संदर्भात मात्र अपयशी ठरली आहे, असे खेदाने म्हणावे लागेल. त्यामुळे भारतात राष्ट्रघातकी, भ्रष्टाचारी मोकाट आहेत. त्यांनी त्यांच्या कारवाया काही थांबवलेल्या नाहीत. जनतेला मात्र या सर्वांचा त्या वेळीही त्रास होत होता आणि आताही होत आहे. त्यामुळे भाजपला जर खरोखरच येणार्‍या काळात प्रामाणिकपणे काम करायचे असेल, तर ही सर्व सूत्रे अंतिम टप्प्यापर्यंत नेऊन दोषींना शिक्षा करावीच लागेल, तरच ते लोकांचा विश्‍वास संपादन करू शकतील !


Multi Language |Offline reading | PDF