भारतीय सैन्याला कारखान्यांकडून सदोष शस्त्रे पुरवली जातात ! – सैन्याचा आरोप

शत्रूराष्ट्रे युद्धसज्ज होत असतांना भाजपच्या राज्यात असे होणे लज्जास्पद !

देहली – भारतीय सैन्याला सदोष शस्त्रे पुरवली जात आहेत. त्यामुळे सैन्याची मोठी हानी होत आहे, असा आरोप सैन्याने शस्त्रे पुरवणार्‍या कारखान्यांच्या समितीवर (‘ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्डा’वर) केला आहे. ‘ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्डा’ने हे आरोप फेटाळले आहेत.

१. सैन्याने संरक्षणनिर्मिती खात्याचे प्रमुख सचिव अजय कुमार यांना लिहिलेल्या १५ पानी पत्रात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांमध्ये शस्त्रांमध्ये त्रुटी असल्यामुळे युद्धाच्या ठिकाणी सैनिकांची मोठी हानी होत आहे.

२. देशात ४१ सरकारी कारखान्यांमध्ये सैन्याच्या शस्त्रांची निर्मिती होते. या कारखान्यांवर सरकार १९ सहस्र कोटी रुपये व्यय (खर्च) करते. एकाही शस्त्रामध्ये थोडीशी जरी त्रुटी राहिली, तरी सैनिकांच्या जिवावर बेतू शकते.

३. या पत्रामध्ये कोणत्या शस्त्रांंमुळे प्रतिदिन अपघात होत आहेत आणि कोणत्या शस्त्रांंमुळे क्वचित अपघात होतात, याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. विविध बंदुका, पिस्तुल आणि ‘बोफोर्स’च्या तोफा यांचाही यामध्ये उल्लेख करण्यात आला आहे.

४. या त्रुटींविषयी अमेरिकेच्या अधिकार्‍यांनीही वर्ष २०१७ मध्ये प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते. पोखरण येथे झालेल्या एका युद्धाभ्यासाच्या वेळी ‘एम् ७७७ अल्ट्रालाईट होइटलायझर’ ही बंदूक तुटली होती. भारतीय सैन्य अमेरिकेसमवेत अमेरिकी बनावटीच्या १४५ अशा बंदुकांची निर्मिती करणार होते.

५. ‘ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्डा’ने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. ‘शस्त्रास्त्रांची नीट पडताळणी आणि परीक्षा केल्याविना ती सैनिकांच्या हातात आम्ही देतच नाही’. शस्त्रांचा आवश्यकतेपेक्षा अधिक आणि अयोग्य पद्धतीने वापर केला जातो; म्हणून ती खराब होतात’, असे बोर्डाने सांगितले.


Multi Language |Offline reading | PDF