श्रीमती आंभोरेआजी रुग्णाईत असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले त्यांना सूक्ष्मातून येऊन भेटल्याने त्यांचे आजारपण दूर होणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती आंभोरेआजी रुग्णाईत असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले त्यांना सूक्ष्मातून येऊन भेटल्याने त्यांचे आजारपण दूर होणे

श्रीमती आंभोरेआजी

१. स्वतः गंभीर रुग्णाईत असतांनाही सुनेला धीर देणे

‘१५.११.२०१८ या दिवशी आईची (श्रीमती आंभोरे आजी) प्रकृती अकस्मात गंभीर झाली. तेव्हा घरात कुणीही पुरुष नव्हते. मी सनातनच्या देवद, पनवेल येथील आश्रमात होतो आणि माझे थोरले बंधू कामानिमित्त बाहेर गेले होते. या परिस्थितीत वहिनींना ‘नेमके काय करावे ?’, ते सुचत नव्हते. त्यांच्या तोंडवळ्यावरील काळजी पाहून त्याही परिस्थितीत आईने त्यांना धीर दिला आणि म्हणाली, ‘‘अगं काही काळजी करू नकोस. वयोमानानुसार असे होणारच. मी जरा विश्रांती घेते, म्हणजे मला बरे वाटेल.’’

२. काही वेळाने बरे वाटून खोलीतून बाहेर येणे आणि प.पू. डॉ. आठवले घरी येऊन गेल्याचे सुनेला सांगणे

वहिनींनी आतल्या खोलीत आईला व्यवस्थित झोपवले. तिचे अंथरूण घातले आणि तिचे अंग चेपत त्या बाजूलाच बसल्या होत्या. काही वेळाने ‘आईला झोप लागली’, असे वाटून त्या खोलीबाहेर येऊन त्यांची कामे करू लागल्या. साधारण २० ते २५ मिनिटांनी आई खोलीतून बाहेर आली. ते पाहून वहिनींनी आईला लगेच विचारले, ‘काही पाहिजे का ? तुम्हाला काही होत आहे का ? बाहेर का आलात ? झोप येत नाही का ? अंग चेपून देऊ का ?’ वहिनींच्या प्रश्‍नांना आईने केवळ हात दाखवून थांबवले आणि आनंदाने म्हणाली, ‘‘मी म्हटले होते ना, काळजी करू नकोस.’’ तेव्हा वहिनींनी आईला पुन्हा खोलीत नेले आणि विश्रांती घेण्यास सांगितले. तेव्हा आई म्हणाली, ‘‘अगं, मला खरंच बरे वाटते आहे. माझे परात्पर गुरु डॉक्टर (परात्पर गुरु डॉ. आठवले) आले होते.’’ वहिनींनी लगेचच विचारले, ‘‘काय म्हणाले परात्पर गुरु डॉक्टर ? आई तुमच्यामुळे आज परात्पर गुरु डॉक्टर आपल्या घरी आले. आम्ही धन्य झालो.’’ त्या वेळी वहिनींच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि आंभोरेआजी यांच्यामध्ये सूक्ष्मातून झालेला संवाद

तेव्हा आई वहिनींना म्हणाली, ‘‘माझ्या गुरुदेवांना सतत साधकांची काळजी असते. आज परात्पर गुरु डॉक्टर येथे आले; कारण मला बरे वाटत नव्हते. ते येथे बसले आणि त्यांनी माझ्या अंगावरून हात फिरवला. त्या वेळी आमच्यामध्ये पुढीलप्रमाणे संवाद झाला.

परात्पर गुरु डॉ. आठवले : आजी, तुम्हाला काय होत आहे ?

आई (आंभोरेआजी ) (हात जोडून) : प.पू. डॉक्टर तुम्ही !

परात्पर गुरु डॉ. आठवले (अंगावरून हात फिरवत) : हो आजी ! तुम्हाला काय होत आहे ?

आई : काही नाही. जरा अस्वस्थ वाटते आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले : घाबरल्यासारखेही वाटते का ?

आई (केवळ होकारार्थी मान हलविली)

परात्पर गुरु डॉ. आठवले : आजी घाबरू नका. आता इकडे घरी आलात आहात, तर मुले आणि सुना यांना आनंद अन् चैतन्य द्या. तुम्हाला बघून तेही घाबरतील. होय ना !

आई : हो. आता घाबरणार नाहीत. थांबा, मुलीला बोलावते. (आई उठायचा प्रयत्न करू लागली.)

परात्पर गुरु डॉ. आठवले : आजी तुम्ही उठू नका. मुले कुठे दिसत नाहीत.

आई : माणिक (मोठा मुलगा) बाहेर गेला आहे आणि अशोक (धाकटा मुलगा) देवद आश्रमात आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले : अशोकला तुमच्यासोबत थांबावेसे वाटले नाही का ?

आई : तो दोन दिवस थांबला होता.

परात्पर गुरु डॉ. आठवले (हसून आईचा हात धरत) : आता मी जातो. मला पनवेललासुद्धा जायचे आहे.

गुरुदेव उठले, तशी आईसुद्धा उठली आणि गुरुदेवांसमवेत बाहेर आली. आईला परात्पर गुरु डॉ. आठवले पनवेलला रेल्वेमधून उतरेपर्यंत दिसत होते.

आता आईची तब्येत चांगली आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा म्हणूनच आई औषधोपचाराविना बरी झाली. खरंच गुरुदेवांना किती काळजी ! ते आईसाठी घरी आले आणि आईला पूर्ण बरे केले. केवळ आईमुळे आम्हाला परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा आणि प्रीती लाभत आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली तरी ती अल्पच आहे.’

– श्री. अशोक आंभोरे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (श्रीमती आंभोरेआजी यांचा धाकटा मुलगा) (१९.११.२०१८)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now