सनातनच्या संतांच्या मांदियाळीत आणखी ४ पुष्पे गुंफली !

  • सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचे आई-वडील श्री. सदाशिव परांजपे (वय ७६ वर्षे), सौ. शैलजा परांजपे (वय ७१ वर्षे) आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या आई श्रीमती हिरा मळ्ये (वय ८२ वर्षे), दिवंगत वडील वसंत मळ्ये संतपदी विराजमान !

  • सद्गुरुद्वयींना जन्म देणार्‍या मात्या-पित्यांनी एकाच वेळी संतपद गाठल्याची सनातनच्या इतिहासातील अविस्मरणीय घटना !

डावीकडून सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ, पू. सदाशिव परांजपे, पू. (सौ.) शैलजा परांजपे, पू. (श्रीमती) हिरा मळ्ये आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

रामनाथी (गोवा) – विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपाछायेत सनातनचे साधक ईश्‍वरी राज्याच्या (हिंदु राष्ट्राच्या) स्थापनेसाठी कार्यरत आहेत. या समष्टी ध्येयासह ईश्‍वरप्राप्तीचे अत्युच्च ध्येय घेऊन साधक स्वत:च्या आध्यात्मिक उन्नतीसाठीही प्रयत्नरत आहेत. धर्मसंस्थापनेचे हे अद्वितीय कार्य अधिकतम सूक्ष्मस्तरावर अन् संतांनी पुरवलेल्या आध्यात्मिक ऊर्जेच्या बळावरच चालू आहे. आतापर्यंत परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शिकवलेली अष्टांग साधना करून सनातनचे ८८ साधक संतपदी विराजमान झाले आहेत. वैशाख शुक्ल पक्ष नवमी या शुभदिनी या संतांच्या मांदियाळीत आणखी ४ पुष्पे गुंफली गेली. १३ मे या दिवशी सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचे वडील श्री. सदाशिव परांजपे (वय ७६ वर्षे) सनातनच्या ८९ व्या व्यष्टी संतपदी, सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू यांच्या आई सौ. शैलजा परांजपे (वय ७१ वर्षे) सनातनच्या ९० व्या व्यष्टी संतपदी, तर सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या आई श्रीमती हिरा मळ्ये (वय ८२ वर्षे) या सनातनच्या ९१ व्या व्यष्टी संतपदी आणि वडील कै. वसंत मळ्ये सनातनच्या ९२ व्या संतपदी विराजमान झाल्याचे येथील सनातनच्या आश्रमात पार पडलेल्या एका भावसोहळ्यात घोषित करण्यात आले. ‘मोगरा फुलला मोगरा फुलला । फुलें वेंचितां बहरू कळियांसी आला ॥ इवलेसे रोप लावियलें द्वारी । त्याचा वेलु गेला गगनावेरी॥’ या पंक्तींप्रमाणे सनातनची संतपरंपरा दिवसागणिक बहरतच आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आवश्यक संतसंख्या पूर्ण होण्यास आता अवघे ८ संतच शेष आहेत.

नुकतेच ११ मे या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवानिमित्त साधकांना श्रीसत्यनारायण रूपातील गुरुदर्शन लाभले. ५ मे या दिवशी  रामनाथी आश्रमात जन्मोत्सवानिमित्त चालू झालेल्या धार्मिक विधींची १२ मे या दिवशी विष्णुयागाने सांगता झाली. धार्मिक विधींची सांगता झाली असली, तरी परात्पर गुरुमाऊली साधकांना देत असलेल्या आनंदाला कोणतीही सीमा नाही, हेच साधकांनी या भावसोहळ्यातून अनुभवले !

(या सोहळ्याचे सविस्तर वृत्त वाचा लवकरच)


Multi Language |Offline reading | PDF