आनंदाची उधळण आणि हिंदु राष्ट्राचा उद्घोष करणार्‍या दिंडीमुळे अवघी पुण्यनगरी चैतन्यमय !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त पुणे येथे भव्य हिंदू एकता दिंडी !

  • ‘यदा यदा हि धर्मस्य …’ श्‍लोकामुळे वातावरण प्रेरणादायी झाले

  • वाहतूक पोलिसांकडून दिंडीवर पुष्पवृष्टी

पुणे, १३ मे (वार्ता.) – सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवानिमित्त १२ मे या दिवशी आयोजित केलेली दिंडी अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात पार पडली. धर्मध्वज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले अन् श्री भवानीमाता यांच्या पालख्या यांचे पूजन करून दिंडीला आरंभ झाला. भिकारदास मारुति मंदिरापासून चालू झालेली ही दिंडी शनिपार चौक – विश्रामबागवाडा – लक्ष्मीरस्ता – टिळक चौक (अलका टॉकीज चौक) मार्गे जाऊन डेक्कन येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाजवळ समाप्त झाली. शबरीमला अय्यप्पा सेवा समाजाच्या सुमती वेणुगोपाळ, रणसंग्राम ग्रुपचे राहुल कदम आणि राकेश शुक्ल आदी मान्यवर, तसेच ९०० जण दिंडीमध्ये सहभागी झाले होते.

धर्मध्वज पूजन करतांना रेणुका माता मंदिराचे मुख्य पुजारी १. श्री. रावसाहेब कुंभार

धर्मध्वज, पालख्या, पालख्यांच्या समोर मशाल घेऊन चालणारे मशालधारी, पारंपरिक वेशात सहभागी झालेल्या रणरागिणी अन् मावळे (कार्यकर्ते), स्वसंरक्षणाची आणि मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करणारे धर्मवीर, राष्ट्रपुरुषांच्या वेशातील बालसाधक आदींमुळे ही दिंडी वैशिष्ट्यपूर्ण आणि दुतर्फा असणार्‍या लोकांच्या मनाचा ठाव घेणारी ठरली. ‘आजूबाजूचे अनेक लोक ही दिंडी डोळ्यांमध्ये साठवत होते’, असे जाणवले. दिंडीमध्ये सहभागी साधकांचा उत्साह आणि आनंद ओसंडून वहात होता. सर्वांचेच मन जणू कृतज्ञतेने भरून गेले होते. गुरुमाऊलींच्या स्मरणात मग्न झालेल्या साधिकांनी काही चौकांमध्ये फुगडीचा फेर धरला. साधकांनी या निमित्ताने अत्यंत अवर्णनीय आनंद अनुभवला आणि गुरुमाऊलींच्या प्रती अपार कृतज्ञता व्यक्त करत साधक घरी परतले.

अशी झाली चैतन्यमय दिंडी

१. हिंदु जनजागृती समितीचे श्री. विजय चौधरी यांनी शंखनाद करून दिंडीचा शुभारंभ केला.

२. यल्लमा देवदासी संस्थेचे अध्यक्ष आणि श्री रेणुकामाता मंदिराचे मुख्य पुजारी श्री. रावसाहेब कुंभार यांनी धर्मध्वजाचे पूजन केले अन् श्रीफळ वाढवले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पालखीचेही त्यांनी पूजन केले. पौरोहित्य सनातन संस्थेचे साधक श्री. अनिल पेटकर यांनी केले.

३. शबरीमला अय्यप्पा सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा सुमती वेणुगोपाल यांनी श्री तुळजाभवानीच्या पालखीचे पूजन केले.

४. त्यानंतर ५ सुवासिनींनी दोन्ही प्रतिमांचे औक्षण केले.

पूजा करतो आम्ही सुवासिनी, आशीर्वाद द्यावा सर्वांना धर्मरक्षणासाठी

५. अशा अत्यंत उत्साहदायी वातावरणात ‘यदा यदा हि धर्मस्य …’ हा श्‍लोक ध्वनीवर्धकावरून लावण्यात आला आणि तेथील वातावरणच पालटले. हिंदु राष्ट्रासाठी शेवटपर्यंत प्रयत्नरत रहाण्याची प्रेरणाज्योतच जणू या श्‍लोकातून सर्वांच्या मनात जागृत झाली.

६. हिंदु जनजागृती समितीचे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. पराग गोखले यांनी दिंडीचा उद्देश सांगितला.

त्यानंतर रामनामाचा गजर झाला. ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’चा घोष दुमदुमला अन् चैतन्याची दाहीदिशांना उधळण करत दिंडी मार्गस्थ झाली.

दिंडीची वैशिष्ट्यपूर्ण रचना

सनातन धर्माचे प्रतीक असलेला धर्मध्वज दिंडीच्या अग्रस्थानी होता. सनातन वैदिक हिंदु धर्माची पताका पुढे विश्‍वभर फडकणार असल्याचेच जणू ते द्योतक होते. धर्मध्वजानंतर मांगल्याचे प्रतीक असलेला कलश डोक्यावर घेऊन साधिकांचे पथक सहभागी झाले होते. जणू त्या संस्कृतीरक्षणाचाच संदेश देत होत्या. त्यानंतर होते २ मशालधारी – दिंडीचा मुख्य चैतन्यस्रोत असलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले आणि भवानीमाता यांच्या पालख्यांना मानवंदना देण्यासाठी ! दोन्ही पालख्यांच्या मागे धर्मरक्षणासाठी कार्यरत असलेल्या अधिवक्त्यांचे पथक होते. त्यानंतर रामनामाच्या गजरात टाळ वाजवत महिला साधिका सहभागी झाल्या होत्या. त्यांच्यामागे होते शबरीमला अय्यप्पा सेवा समितीचे अय्यप्पा स्वामींचे भक्त, लेझीम पथक अन् रणरागिणी पथक ! त्यानंतर क्रांतीकारकांच्या वेशातील बालसाधक ‘ओपन जीप’मधून राष्ट्रकार्य करण्याचे आवाहन करत होते. त्यामागे होते प्रथमोपचार पथक ! ‘प्रथमोपचार शिका, समाजऋण फेडा’, ‘प्रथमोपचार शिकणे – काळाची गरज’ असे फलक या वेळी धरण्यात आले होते. त्यानंतर पारंपरिक वेशातील महिला आणि पुरुष हातात भगवे ध्वज आणि फलक घेऊन सहभागी झाले होते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची मेघडंबरीतील प्रतिमा आणि चारचाकी गाड्यांवर लावण्यात आलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सुवचनांच्या चौकटी लक्षवेधी होत्या.

स्वरक्षणाची प्रात्यक्षिके आजच्या काळाची आवश्यकता ।
हे विद्यार्जन उपयोगी पडेल धडा शिकवण्या समाजकंटका ॥

चौकाचौकांत झाले धर्मध्वजाचे पूजन, पालखीचे स्वागत अन् पुष्पवृष्टी !

१. नातूबाग गणपति चौक येथे श्री. चेतन नाईक आणि सौ. अपर्णा नाईक, तसेच नातूबाग मंडळाचे प्रमोद कोंढरे आणि त्यांचे सहकारी यांनी धर्मध्वज अन् दोन्ही पालख्या यांचे पूजन करून पुष्पवृष्टी केली.

२. नवा विष्णू चौक येथे ‘गंगाधर मिठाई’ या दुकानाचे मालक श्री. अभिजीत गंगाधर यांनी दिंडीचे स्वागत केले.

३. शनिपार चौक येथे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि ‘शुभकामना एंटरप्रायजेस’ श्री. शरद गंजीवाले यांनी धर्मध्वजाचे सपत्नीक पूजन करून पालखीवर पुष्पवृष्टी केली. पालखी थोडी पुढे येतांच ‘दि पूना मोटार गुड्स ट्रान्सपोर्ट’चे हसमुखभाई व्होरा, समर्थ ताटे आणि दीपक कुलकर्णी यांनी पहिल्या माळ्यावरून पालखी, मेघडंबरी आणि दिंडी यांवर पुष्पवृष्टी केली.

४. लक्ष्मी रस्ता येथे पूर्ण पोषाख आणि आरिनी वस्त्रदालनाचे मालक श्री. नेव्यूल गोगरी, शगुन चौकामध्ये ‘जोगेश्‍वरी सिल्कस्’ या आस्थापनाचे मालक आणि प्रखर धर्मप्रेमी श्री. चंद्रकांत पासकंठी, ‘कलाक्षेत्रम्’ या दुकानाचे मालक श्री. सागर पासकंठी आणि गोरख पासकंठी, गरुड गणपति चौकामध्ये प्रखर धर्माभिमानी श्री. विवेक कद्रीवेल आणि त्रिलोकसिंह शेखावत यांनी धर्मध्वजाचे पूजन करून पुष्पवृष्टी केली, तसेच दोन्ही पालख्यांचे पूजन केले.

पोलीस-प्रशासनाचे उत्तम सहकार्य !

पुष्पवृष्टी करून दिंडीचे स्वागत करतांना वाहतूक शाखेचे पोलीस

या दिंडीसाठी पोलीस-प्रशासनाचेही उत्तम सहकार्य लाभले. वाहतूक शाखेतील कर्मचार्‍यांनी टिळक चौक (अलका टॉकीज चौक) येथे पोलिसांसाठी असलेल्या मचाणीवर चढून दिंडीवर पुष्पवृष्टी केली. ‘आम्ही केवळ वाहतूक नियंत्रणच करणार नाही, तर आमच्याकडून सेवा व्हावी; म्हणून दिंडीवर पुष्पवृष्टीही करू’, असे ते म्हणाले आणि त्यांनी स्वागत केले. हा चौक शहरातील मुख्य चौक आहे. तेथे ५ मुख्य रस्ते एकत्र येतात. दिंडीसाठी पोलिसांनी काही काळ सर्व ठिकाणची वाहतूक रोखून धरल्यामुळे दिंडी व्यवस्थितरित्या मार्गस्थ झाली.

सहकार्य आणि आभार !

दिंडी यशस्वी होण्यासाठी सांगवी विकास मंचाचे श्री. महेश भागवत, त्र्यंबकेश्‍वर प्रतिष्ठानचे श्री. विनोद आढाव आणि त्यांचे सहकारी, धर्माभिमानी श्री. रामभाऊ सूल, वडगाव बुद्रुक येथील दत्त मंदिराचे श्री. गुलाब चरवड, साईबाबा मंदिराचे श्री. हेमंतदादा दांगट पाटील आणि सुहास पवार, हिंदु धर्माभिमानी श्री. कुमार शिंदे, धर्मप्रेमी श्री. प्रतापसिंह ठाकूर, श्री. मिलिंद करंबळेकर आदींचे अमूल्य सहकार्य लाभले.

वैशिष्ट्यपूर्ण आणि चैतन्यदायी घटना

१. दिंडी टिळक चौकात (अलका टॉकीज चौक) आल्यावर तेथे गजरे विकणार्‍या एका लहान मुलाने पळत येऊन परात्पर गुरु डॉ. आठवले आणि भवानी देवी यांच्या पालख्यांना चाफ्याच्या फुलांची माळ घातली आणि नमस्कार केला. गरीब असूनही कसलाच विचार न करता फुले अर्पण करणार्‍या या लहान मुलाची कृती वैशिष्ट्यपूर्ण होती.

२. शबरीमला अय्यप्पा सेवा संघाच्या पदाधिकार्‍यांना दिंडीचे निमंत्रण दिले, तेव्हा त्यांनी स्वतःहून ‘हिंदु राष्ट्राचे द्रष्टे गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ‘जन्मोत्सवानिमित्त काढण्यात येणार्‍या पायी दिंडीमध्ये पारंपरिक वेशात सहभागी व्हावे’, असा संदेश त्यांच्या परिचितांना पाठवला. संघटनेचा बॅनर घेऊन सेवा संघाचे कार्यकर्ते दिंडीमध्ये सहभागीही झाले.

३. सूर्यास्ताच्या वेळी दिंडी टिळक चौक (अलका टॉकीज चौक) येथे पोचली. तेव्हा आकाशामध्ये भगव्या रंगाची छटा पसरल्यासारखे दिसले.

४. मेघडंबरीच्या भोवती प्रकाश आणि चैतन्य दिसत होते.

५.  दिंडी शनिपार चौक येथे आली असता तेथील भाजी आणि फळविक्रेते यांनी स्वतःहून धर्मध्वजाला अन् पालखीला भावपूर्ण फुले वाहिली.

६. लक्ष्मी रस्त्यावरील ‘श्रीकृष्ण ज्वेलर्स’ या दुकानासमोर धर्मध्वज आल्यानंतर दुकानाबाहेरील सर्व दिवे लावण्यात आले.

७. ‘सनातन प्रभात’च्या वाचक निर्मला फडणीस यांना दिंडीला येण्यास काही अडचण होती; पण शारीरिक क्षमता अल्प असूनही सर्व अडचणींवर मात करून त्या त्यांच्या मैत्रिणीसह दिंडीत सहभागी झाल्या, तसेच ‘माझ्या संपर्कातील सर्वांना मी दिंडीला येण्यास सांगते’, असेही म्हणाल्या.

८.  फुरसुंगी येथील २ धर्माभिमानी महिला त्यांच्या लहान मुलांसह दिंडीमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यांचा मुलगा दिंडीच्या आजूबाजूला ‘सनातन प्रभात’चे अंक देण्याच्या सेवेत सहभागी झाला होता. ‘आम्हाला पुष्कळ आनंद मिळाला. आम्ही एक दिवसासाठी नाही, तर आयुष्यभरासाठीच सेवेमध्ये आलो आहोत’, असे वाटले.

अभिप्राय

१. हिंदु राष्ट्र झालेच पाहिजे. हिंदुत्वाला चांगले दिवस आले पाहिजेत, यासाठी सर्वांनी हिंदु धर्माचे कार्य करण्याची आवश्यकता आहे. – श्री. शरद गंजीवाले

२. हिंदूंच्या जागृतीसाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता आहे. – श्री. हसमुखभाई व्होरा

३. वाहतुकीला अडथळा न येता नियोजनबद्ध पद्धतीने दिंडी चालू होती. दिंडी पाहून प्रसन्न वाटले. प.पू. गुरुदेवांचे मुख पाहून नकारात्मकता दूर होते. – श्री. नेव्यूल गोगरी

४. माझे भाग्य मोठे की, मला पूजनाचा मान मिळाला. – श्री. चंद्रकांत पासकंठी

५. पालख्यांचे दर्शन घेतल्यावर ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’, या वाक्याची प्रचीती आली. दिंडी म्हणजे सांस्कृतिक आणि पारंपरिक स्वरूपाचे शक्तीप्रदर्शन वाटते. ६. दिंडी म्हणजे हिंदुत्वाच्या एकात्मतेचे प्रतीकच आहे. – श्री. सागर पासकंठी, श्री. गोरख पासकंठी

७. दिंडीत सहभागी होणे हे पुण्यच आहे. कृतज्ञतेसाठी शब्दच नाहीत. – श्री. विवेक कद्रीवेल

८. हिंदु धर्मानुसार आचरण महत्त्वाचे आहे. हे केवळ सनातन संस्था करत आहे, याचा अभिमान वाटतो. – सुमती वेणुगोपाळ

क्षणचित्रे

१. श्री. शरद गंजीवाले यांच्या दुकानातील कर्मचार्‍यांनीही पालख्यांचे भावपूर्ण दर्शन घेतले. समाजातील अनेकांनी भ्रमणभाषमध्ये दिंडीची छायाचित्रे आणि चलचित्रे काढली. विदेशी नागरिकही दिंडी पाहून भारावून गेले. फ्रान्सच्या कॅथरिन यांनी दिंडीचे छायाचित्रण केले.

२. पारदर्शक लिफ्टमधून दिंडी पहाणारी महिला हात जोडून दिंडीला नमस्कार करत होती. एका वृद्ध महिलेने गुडघ्यावर बसून दिंडीला नमस्कार केला.

३. श्री. नरसय्या इनामदार या वयस्कर व्यक्तीने सायकलवरून उतरून पालखीचे दर्शन घेतले.

४. हडपसर येथील धर्मशिक्षणवर्गातील धर्माभिमानी सर्वश्री हितेश आकुल, समर्थ ताठे, दीपक कुलकर्णी आणि विवेक कद्रीवेल यांनी सेवांमध्ये सक्रीय सहभाग घेतला. शिरवळ येथील धर्मप्रेमी श्री. निखील पिसाळ आणि श्री. परशुराम पिसाळ दिंडीत सहभागी झाले होते.

५. वाहतुकीच्या दृष्टीने सर्व नागरिकांनी सहकार्य केले. दिंडी पाहून नागरिकांच्या तोंडवळ्यावर आदरभाव आणि कृतज्ञताभाव जाणवत होता.


Multi Language |Offline reading | PDF