६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला आणि रामनाथी आश्रमात राहून साधना करणारा कु. देवदत्त योगेश व्हनमारे (वय १४ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. देवदत्त योगेश व्हनमारे हा एक आहे !

कु. देवदत्त योगेश व्हनमारे याला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून शुभाशीर्वाद !

कु. देवदत्त व्हनमारे

रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात राहून साधना करणारा कु. देवदत्त योगेश व्हनमारे (वय १४ वर्षे) याचा वैशाख शुक्ल पक्ष दशमी (१४.५.२०१९) या दिवशी तिथीनुसार वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

श्रीमती अलका व्हनमारे

१. देवदत्तने ‘आई-वडिलांना साधना करता यावी’, यासाठी आजोळी रहाणे

पूर्वी मी देवदत्तची त्याच्या वयाच्या अन्य मुलांशी तुलना करायचे आणि प्रसंगी त्याला रागवायचेही. ‘आमची (आई-वडिलांची) साधना व्हावी’, यासाठी त्याने वयाच्या ६ व्या वर्षापासून १२ व्या वर्षांपर्यंत (ज्या कोवळ्या वयात मुलाला आईच्या मायेची आवश्यकता असते) आजोळी रहाणे सहजतेने स्वीकारले. हे आठवल्यावर मी निःशब्द व्हायचे. तेव्हा प.पू. गुरुदेव मला आतून सांगायचे, ‘त्याच्या या त्यागामुळे तो आनंदाच्या सर्वोच्च शिखरावर पोचेल.’ त्याने केलेल्या या त्यागाची मी कल्पनाही करू शकत नाही.

२. देवदत्तला लहानपणीही ‘वडिलांनी साधनेसाठी किती त्याग केला आहे ?’, याविषयी ठाऊक असल्याने त्याने वडिलांचा विशेष सहवास मिळत नसल्याविषयी कधीही गार्‍हाणे न करणे

‘देवदत्तला वडिलांचा विशेष सहवास मिळाला नाही. लहान वयातही ‘त्याचे वडील काय करतात ? त्यांनी किती त्याग केला आहे ?’, यांविषयी ठाऊक होते. त्यामुळे त्याचे वडिलांवर विशेष प्रेम होते. देवदत्तने त्याच्या वडिलांविषयी कधी गार्‍हाणे (तक्रार) केले नाही.

३. घरातील व्यक्ती आणि साधक यांना साधनेविषयी योग्य दृष्टीकोन सहजतेने सांगणे

त्याला साधनेविषयी विशेष काहीच शिकवले नसले, तरी त्याचे साधनेविषयीचे अनेक दृष्टीकोन स्पष्ट आहेत. ‘गुरूंचे आज्ञापालन केल्यानेच उद्धार होऊ शकतो’, असा त्याचा विचार असल्याने तो कधीच नातेवाइकांत अडकला नाही. कोणीही त्याला काही विचारल्यास तो त्यांना साधनेविषयी योग्य दृष्टीकोन सहजतेने सांगतो. हे पाहून ‘त्याला हे सर्व कोणी शिकवले ?’, याचे मला आश्‍चर्य वाटते. यावरून लक्षात आले, ‘त्याला हे सर्व गुरुतत्त्वानेच शिकवले आहे.’

४. देवदत्तच्या आईची ‘प.पू. गुरुदेवच देवदत्तचा सांभाळ करत असून योग्य वेळ आल्यावर ते त्याला त्यांच्या चरणांशी घेणारच आहेत’, अशी श्रद्धा असणे आणि जानेवारी २०१९ मध्ये तो रामनाथी येथील सनातन आश्रमात पूर्णवेळ साधनारत होणे

तो इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या शिक्षणासाठी त्याच्या मामाकडे होता. सुट्टीत घरी आल्यावर मी सेवेतील व्यस्ततेमुळे त्याच्याकडे विशेष लक्ष देऊ शकत नसे. मी स्वतःहून त्याच्यावर साधनेचे संस्कार केले नाहीत; कारण ‘त्याचा कल अध्यात्माकडे नाही’, असेच मला वाटायचे. ‘तो दूर रहात असल्याने त्याच्या मनाविरुद्ध काही करायचे नाही’, असा मी विचार करत असल्याने त्याने साधनेतील कृती करण्याविषयी मी त्याच्यावर बळजोरी केली नाही. मला मात्र नेहमी वाटायचे, ‘प.पू. गुरुदेवच त्याचा सांभाळ करतात. योग्य वेळ आल्यावर ते त्याला चरणांशी घेणारच आहेत.’ नंतर तसेच झाले. ‘डिसेंबर २०१८ मध्ये देवदत्त हा महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आला असून त्याची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी आहे’, असे घोषित करण्यात आले. जानेवारी २०१९ मध्ये तो रामनाथी येथील सनातन आश्रमात साधनारत झाला. देवदत्तच्या मामे-मावस भावंडांना ‘देवदत्तचा सहवास कधी मिळणार ?’, असे वाटत असते.

५. अधिकोषादी व्यावहारिक गोष्टींचे विशेष ज्ञान नसतांनाही देवदत्तने सांगितलेले अचूक निर्णय ऐकून आश्‍चर्यचकित होणे आणि त्याविषयी विचारल्यावर देवदत्तने ‘श्रीकृष्ण सूक्ष्मातून निर्णय सांगतो’, असे सांगणे

त्याच्या वडिलांचे निधन झाल्यावर त्यालाच वडिलांचे मृत्यूत्तर विधी करावे लागले. त्यावेळी आर्थिक गोष्टींविषयी निर्णय घ्यायचे होते. माझी मानसिक स्थिती चांगली नसल्याने माझा गोंधळ होऊन मला निर्णय घ्यायला विलंब व्हायचा. ‘देवदत्तला सर्व ठाऊक असावे’, या उद्देशाने महत्त्वपूर्ण निर्णयांविषयी मी त्याच्याशी चर्चा करायचे. त्या वेळी तो क्षणांतच योग्य निर्णय सांगायचा. त्यात मलाही शंका नसायची. अधिकोष इत्यादींविषयी विशेष व्यावहारिक ज्ञान नसतांनाही त्याने सांगितलेले अचूक निर्णय ऐकून मी आश्‍चर्यचकित व्हायचे. एकदा मी त्याला विचारले, ‘‘तुला हे सर्व कसे सांगता येते ?’’ तेव्हा तो म्हणाला, ‘‘कृष्ण मला सांगतो. तो सर्वज्ञ आहे ना !’’

६. घरी असतांना सत्सेवा न करणे; मात्र वडिलांच्या मृत्यूनंतर त्याने सर्व कर्तव्ये व्यवस्थित पार पाडणे आणि पुढे झोकून देऊन साधना चालू करणे

पूर्वी मला वाटायचे, ‘हा मुलगा लाडात वाढला आहे. त्याच्या आजोळी नातेवाइकांनी त्याचे लाड केले. तो नाजूक फुलासारखा आहे. या मुलाचे पुढे कसे होईल ?’ प्रत्यक्षात त्याच्या वडिलांचे निधन झाल्यापासून तो सर्व कर्तव्ये व्यवस्थित पार पाडत आहे. कठीण काळातही त्याने मला धीर दिला. ‘वडिलांच्या मृत्यूत्तर प्रवासात अडथळा येऊ नये’, यासाठी सर्व धार्मिक विधी भावपूर्णरित्या केले. घरी असतांना कोणतीच सेवा केली नाही; मात्र आता तो आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करत आहे. त्याचे कोणाविषयीही गार्‍हाणे नाही. ‘माझा श्रीकृष्ण आणि गुरुदेव सुचवतील, तेच (साधना) मी झोकून देऊन करणार’, या ध्येयानुसार तो भावपूर्ण साधना करत आहे.

७. कृतज्ञता आणि प्रार्थना

अशा दैवी गुणांनी युक्त असे एक महर्लोकातील बाळ मला दिल्याबद्दल मी प.पू. गुरुदेवांच्या चरणी कोटी-कोटी-कोटी कृतज्ञ आहे ! ‘प.पू. गुरुदेवांच्या कृपेने त्याच्या जीवनात अखंड आनंद रहावा आणि ‘एका महान गुरूंचा महान शिष्य’ अशी त्याची ओळख व्हावी’, अशी मी प.पू. गुरुदेवांच्या चरणी शरणागत भावाने प्रार्थना करते.’

– श्रीमती अलका योगेश व्हनमारे, सोलापूर (९.५.२०१९)

संतांवरील दृढ श्रद्धेच्या बळावर देवदत्तने पूर्णवेळ साधना करण्याचा दृढ निर्णय घेणे

त्याला वाटत असते, ‘माझ्या जीवनात एक संत ‘गुरु’ म्हणून आले आहेत, तर मला त्यांचा लाभ करून घेता आलाच पाहिजे. ‘इथून पुढच्या आयुष्यात ‘ते जे काही सांगतील’, तेच मी करणार आहे’, या श्रद्धायुक्त विचारावर तो ठाम असतो. त्याच्या वडिलांचे निधन झाल्यावर त्या संतांनी त्याला पूर्णवेळ साधना करायला सांगितले. तेव्हा त्याने मनात काहीही विकल्प न आणता त्या निर्णयाचे पालन केले. त्या वेळी त्याची नवव्या इयत्तेची परीक्षा २ मासांनी होणार होती. नातेवाइकांनी त्याला पूर्णवेळ साधक होण्यापासून अनेकदा परावृत्त केले; पण तो त्याच्या निर्णयापासून मुळीच ढळला नाही. त्या वेळी ‘त्याच्या मनात द्वंद्व आहे का ?’, हे तपासण्यासाठी मीही त्याला सांगायचे, ‘‘तुला शिकायचे असेल, तर तू शिकत असतांनाही साधना करू शकतोस.’’ तेव्हा तो मला एकच उत्तर द्यायचा, ‘‘मला माझ्या गुरूंनी जे सांगितले आहे, त्यानुसार मला त्यांचे आज्ञापालन करायचे आहे. मला नातेवाइकांचे नाही, तर गुरूंचे मन जिंकायचे आहे. माझ्या गुरूंनी मला ‘शिकत साधना कर’, असे सांगितले नाही; तर ‘तू साधना करून लवकर संत हो’, असा आशीर्वाद त्यांनी मला दिला आहे. मी त्यांचेच ऐकणार, अन्य कोणाचेही ऐकणार नाही !’’ – श्रीमती अलका योगेश व्हनमारे

(नातेवाइकांनी पूर्णवेळ साधना करण्यापासून परावृत्त करण्याचा अनेकदा प्रयत्न केल्यावरही संतांवरील दृढ श्रद्धेच्या बळावर पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेणारा कु. देवदत्त योगेश व्हनमारे याचे कौतुक करावे, तेवढे थोडेच आहे ! देवदत्तने ईश्‍वरी नियोजनानुसार वर्ष २०२३ पासून स्थापन होणारे ‘हिंदु राष्ट्र’ (ईश्‍वरी राज्य) सांभाळणार्‍या भावी पिढीपुढे झोकून देऊन संतांचे आज्ञापालन करण्याचा एक आदर्शच ठेवला आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले)


Multi Language |Offline reading | PDF