जनतेची वैचारिक क्रांतीच्या दिशेने वाटचाल !

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुका होऊन २ आठवडे उलटले आहेत. लोकसभा निवडणुकांविषयी लोकांच्या मनात निरुत्साह आहे. त्यामुळे पुणे येथे सर्वांत अल्प, तर महाराष्ट्रात एकूण ६०.६८ टक्के मतदान झाले आहे. बर्‍याच शहरी आणि ग्रामीण भागांतील गावे अन् वाड्या येथे राजकीय नेत्यांनी विकासकामे न केल्यामुळे जनतेने मतदानावरच बहिष्कार टाकला होता. मुंबईतील गावदेवी भागातील ‘जे.के. बिल्डिंग’ ८ मधील २१३ कुटुंबियांनी इमारतीचा पुनर्विकास करणे अपेक्षित असतांनाही त्यांना कोणत्याही राजकीय पक्षांनी साहाय्य न केल्यामुळे त्यांनी मतदानावर बहिष्कार घातला.

शिवसेना-भाजप युतीचे संभाजीनगर येथील उमेदवार चंद्रकांत खैरे यांना शहरातील मतदारांनी ‘मागील ३० वर्षांमध्ये सेना-भाजप युतीला भरभरून मते दिली. या तुलनेत सत्ताधार्‍यांनी नागरिकांना काय दिले ? ९ दिवसांनंतर एकदा पाणी, कचर्‍याचे डोंगर, खराब रस्ते, २०० पेक्षा अधिक वसाहतींना टँकरनेही पाणी मिळत नाही’, असे असंख्य प्रश्‍न विचारून ते आणि कार्यकर्ते यांना भंडावून सोडले. दुसरीकडे अभिनेते अनुपम खेर हे पत्नी आणि अभिनेत्री किरण यांचा प्रचार करत असतांना त्यांना एका किरकोळ विक्री करणार्‍या दुकानदाराने ‘वर्ष २०१४ मधील भाजपच्या जाहीरनाम्यातील प्रश्‍न अद्याप का सुटले नाहीत ?’ असा प्रश्‍न विचारला. या प्रश्‍नाचे उत्तर न देता आल्याने अनुपम खेर यांना नि:शब्द होऊन परतावे लागले. या निवडणुकीच्या अनुषंगाने विविध पक्षांतील उमेदवार लोकांच्या घरी मत मागायला गेल्यानंतर त्यांना लोकांनी गेल्या साडेचार वर्षांत पक्षांच्या जाहीरनाम्यातील विकासकामांच्या संदर्भात अनेक प्रश्‍न विचारून भंडावून सोडले. विकासकामे पूर्ण न केल्यामुळे सत्ताधारी पक्षांतील उमेदवारांना माना खाली घालाव्या लागल्या. त्यामुळे ‘विकासकामे करूनच जनतेसमोर जावे लागणार’, हे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील नेत्यांना कळून चुकले आहे. लोकसभा निवडणुकीतून बोध घेतलेल्या सर्वच राजकीय पक्षांतील नेत्यांना पुढील विधानसभा आणि महापालिका निवडणुका सोप्या वाटत नाहीत. विधानसभेतही जनतेकडून विकासकामांच्या संदर्भात असेच प्रश्‍न विचारले जातील, याची धास्ती घेऊन बर्‍याच गावांत जनतेचे प्रश्‍न सोडवण्यासाठी राजकीय पक्षांतील नेत्यांची धडपड चालू झाली आहे. असे राजकीय पक्षांतील नेत्यांनी करणे म्हणजे ‘जनता आता सूज्ञ झाली आहे’, असे म्हणता येईल. केवळ आश्‍वासनांचे पोकळ गाजर (जाहीरनामे) दाखवून सत्ता मिळवता येत नाही, याची तीव्र जाणीव सर्वच राजकीय पक्षांना झाली आहे. सनातन प्रभातमध्ये ‘विकासकामे करणार्‍या, जनतेचे रक्षण आणि त्यांचे प्रश्‍न सोडवणार्‍या पक्षांतील उमेदवारांना मत द्या’, अशा दृष्टीकोनातून लेखमाला चालू केली होती. त्या दिशेने जनता आता विचार करू लागली आहे. त्यामुळे जनतेची वैचारिक क्रांतीच्या दिशेने जलद वाटचाल चालू झाली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही !

– श्री. सचिन कौलकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.


Multi Language |Offline reading | PDF