जिहादी आतंकवादाविषयी बोला !

संपादकीय

‘स्व तंत्र भारताचा पहिला आतंकवादी हा हिंदू होता आणि त्याचे नाव नथुराम गोडसे होते’, असे विधान ‘मक्कल निधी मियाम’चे संस्थापक आणि अभिनेते कमल हसन यांनी केले आहे. सध्या निवडणुकीचे वारे चालू आहेत. मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये ‘हिंदु आतंकवाद’ हा शब्द हिंदूंच्या माथी मारणारे काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांच्या विरुद्ध ज्यांना ‘हिंदु आतंकवादी’ ठरवण्याचा आटापिटा करण्यात आला त्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर उभ्या आहेत. यामुळे ‘हिंदु आतंकवाद’ हा विषय पुन्हा चर्चिला जात आहे. आता यात कमल हसन यांनी उडी घेतली आहे. तमिळनाडूमध्ये एका प्रचारसभेच्या वेळी त्यांनी हे विधान केले. ते ज्या ठिकाणी बोलत होते, तो मुसलमानबहुल परिसर होता. भाषणात ‘हा परिसर मुसलमानबहुल आहे; म्हणून मी हे विधान करत नाही’, असेही त्यांनी साळसूदपणे सांगितले. तसे पहायला गेले, तर हसन यांना हिंदु आतंकवादाचा कधी अनुभव आला, असे ऐकिवात नाही; मात्र त्यांना जिहाद्यांच्या कट्टरवादाचा अनुभव मात्र नक्कीच आला आहे. काही वर्षांपूर्वी त्यांचा ‘विश्‍वरूपम्’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट जिहादी आतंकवादावर आधारित होता. तो चांगली कमाई करत असतांना अनेक धर्मांध संघटनांनी त्यातील कुराणामधील काही पंक्तींविषयी असलेले संवाद आदींवर कात्री लावण्याची मागणी केली. हसन यांच्यावर दबाव वाढल्यावर त्यांनी चित्रपटातील काही प्रसंगांना कात्री लावली. त्या वेळी त्यांना विचारस्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य या कशाचीच आठवण झाली नाही. हसन हे हिंदु धर्मावर टीका करत असतात. त्या वेळी धर्माभिमानी हिंदूंनी त्यांच्याकडे क्षमायाचना करण्याची मागणी केली की, ते या मागण्यांना नेहमीच केराची टोपली दाखवतात. ‘विश्‍वरूपम्’च्या वेळी धर्मांधांनी त्यांच्यावर जो दबाव आणला, ज्या धमक्या दिल्या, ते सर्व काय होते ? हसन यांना ते रूचले होते का ? त्या वेळी कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा उत्पन्न करून दहशत निर्माण करणार्‍यांच्या आतंकवादावर हसन कधीच बोलले नाहीत. अशांना हिंदु आतंकवादावर बोलण्याचा अधिकार आहे का ?

बेगडी सुधारणावाद !

कमल हसन हे ‘सुधारणावादी’ म्हणून ओळखले जातात. आताच्या काळात ‘सुधारणावादी’ होण्यासाठी हिंदुद्वेष, मुसलमानांचे लांगूलचालन आदी ज्या (अव)गुणांची आवश्यकता असते, ते सर्व त्यांच्यात ठासून भरले आहेत. हसन हे इतर वेळेला विवेकवाद आणि विकास यांच्या गप्पा मारतात; मात्र मुसलमानांची मते लाटण्यासाठी त्यांना हिंदु आतंकवादाचा आधार घ्यावा लागतो. यातून त्यांचा बेगडी सुधारणावाद दिसून येतो. मुसलमानांच्या परिसरात जाऊन हिंदूंना दूषणे दिली, त्यांच्यावर खालच्या थराला जाऊन आरोप केल्यावर ‘मुसलमान सुखावतील आणि स्वतःच्या झोळीत मते टाकतील’, अशी त्यांना आशा आहे. मुसलमानबहुल भागात जाऊन हसन यांनी विकासाच्या गप्पा का मारल्या नाहीत ? ‘मुसलमान समाजातील गुन्हेगारीचे प्रमाण अल्प करू’, ‘मुसलमानांना जिहादच्या वाटेवर जाण्यापासून रोखू’, ‘हिंदूंच्या वस्तीत जाऊन दंगल करणार्‍या धर्मांधांना रोखू’, ‘मुसलमान तरुणांसाठी शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध करू’, अशी आश्‍वासने हसन यांनी त्यांच्या सभेत दिली नाहीत, हे लक्षात घ्या. असे काही तरी सांगितले असते, तर तेथे उपस्थितांनी मते देणे, तर सोडाच त्यांना भाषण तरी करू दिले असते का ? इतर वेळी ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंदुत्वावर बोलून मतांचे ध्रुवीकरण करतात’, असा आरोप विरोधकांकडून केला जातो. असे आहे, तर ‘हिंदु आतंकवादा’वर बोलून हसन यांच्यासारखे राजकारणी वेगळे काय करत आहेत ? त्यांच्याकडे विकासाची सूत्रे नाहीत का ? मुसलमानांच्या वस्तीत जाऊन हिंदूंना दूषणे देणार्‍यांचा ‘सुधारणावाद’ आणि ‘विवेकवाद’ किती बेगडी आहे, हे यातून दिसून येते.

याकूब मेमनविषयी बोला !

नथुराम गोडसे यांनी गांधी यांची हत्या केल्यावर त्यांना फाशी ठोठावली आणि ती देण्यातही आली. गोडसे यांना फाशी दिल्यावर हिंदु समाजाने न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान केला आणि त्याविषयी काही टीका-टिप्पणी केली नाही. त्यांना फाशी दिल्यानंतर हिंदु समाजाने संयम दाखवला. त्यानंतर दंगली घडल्या नाहीत. याकूब मेमन याला फाशी देण्याचा निर्णय दिल्यानंतर काय झाले ? हसन ज्या ‘सुधारणावादी’, ‘निधर्मीवादी’ टोळीचे सदस्य आहेत, त्या सर्वांनी या निर्णयाला विरोध केला. या आतंकवाद्यासाठी रात्री १२ वाजता सर्वोच्च न्यायालयाचे द्वार ठोठावले गेले. ‘याकूब मेमन याला फाशीची शिक्षा सुनावून त्याच्यावर अन्याय झाला’, असे सातत्याने सांगण्यात आले. त्याच्या जनाजामध्ये सहभागी झालेल्या धर्मांधांमुळे मोठ्या प्रमाणात पोलीस कुमक तैनात करण्यात आली. स्वतंत्र भारतातील पहिल्या (कथित) आतंकवाद्याविषयी भरभरून बोलणारे हसन हे याकूब मेमन, महंमद अफझल, यासीन भटकळ, बशील खैरूला, झाकीर हुसैन यांच्याविषयी काहीच बोलत नाहीत. हे स्वतंत्र भारतात निपजलेले आतंकवादी आहेत. यांची सूची मोठी आहे आणि ती लांबतच चालली आहे. एवढेच कशाला तमिळनाडूमध्ये इस्लामिक स्टेटचे प्रस्थ वाढत आहे. हसन यांना त्याविषयी बोलायला वेळ नाही; मात्र नथुराम गोडसे यांच्याविषयी बोलायला वेळ आहे. ‘गोडसे यांनी गांधी यांची हत्या करणे चुकीचे होते’, हे स्वीकारायला हिंदू कचरत नाहीत; मात्र ‘याकूब मेमन याने जे केले, ते चुकीचे होते’, असे म्हणायला धर्मांधांची, सुधारणावाद्यांची, निधर्मीवाद्यांची जीभ जड होते. हिंदु आतंकवादाचे सूत्र उपस्थित करून मुसलमानांची मते लाटू पहाणार्‍या राजकारण्यांना आणि त्यांच्या पक्षांना हिंदूंनी मतदानाच्या माध्यमातून त्यांची जागा दाखवून दिली आहे. यापुढे भारतात कोण जिंकणार आणि कोण हरणार, हे हिंदूंचीच मतपेढी ठरवणार आहे. हिंदूंना ‘आतंकवादी’ म्हणून हिणवणारे कमल हसन यांना निवडणुकीच्या निकालानंतर त्याची नक्कीच जाणीव होईल !


Multi Language |Offline reading | PDF