बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्या प्रत्येकी एका कार्यकर्त्याची हत्या

  • तृणमूल काँग्रेसची सत्ता असणार्‍या बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा !
  • भाजपच्या राज्यात झालेल्या एखाद्या हिंसाचाराच्या घटनेवरून देशात असहिष्णुता वाढल्याचा आरोप करणारे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी बंगालमधील हिंसाचारावर मौन का बाळगतात ?

कोलकाता – लोकसभा निवडणुकीच्या ६ व्या टप्प्यासाठी १२ मे या दिवशी बंगालमधील ८ जागांसाठी मतदान झाले. मतदान चालू होण्यापूर्वी भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्या प्रत्येकी एका कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली.

१. झारग्राममध्ये भाजपच्या रामेन सिंह या कार्यकर्त्याचा मृतदेह आढळून आला. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सिंह याची हत्या केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.

२. मिदनापूरमध्ये तृणमूल काँग्रेसच्या २ कार्यकर्त्यांवर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

३. तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्ता नेमका कुठे ठार झाला, हे रात्री उशिरापर्यंत समजू शकलेले नाही.

भाजपच्या महिला उमेदवारावर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आक्रमण

भाजपच्या उमेदवार भारती घोष यांच्यावर तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी आक्रमण केले. तसेच त्यांच्या वाहनताफ्यावर गावठी बॉम्बही फेकण्यात आले. या वेळी झालेल्या दगडफेकीमध्ये त्यांचा एक सुरक्षारक्षक घायाळ झाला, तर त्यांच्या वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. या वेळी पोलिसांनी लाठीमार केला. या घटनांची माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकार्‍यांनी मिदनापूर जिल्हाधिकार्‍यांकडून मागवली आहे.

भाजपच्या प्रदेशाध्यक्षांवरही तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आक्रमण

गोपालपूर मतदारसंघात भाजपचे बंगाल प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्यावरही आक्रमण करण्यात आले. त्यांच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली, तसेच त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. ‘जोपर्यंत ममता बॅनर्जी जिवंत आहेत, तोपर्यंत आम्ही दिलीप घोष यांना येथे पाऊल टाकू देणार नाही’, अशी धमकीही तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आली.


Multi Language |Offline reading | PDF