उत्साही, आनंदी आणि सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असलेला ६५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला आणि महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पुणे येथील चि. अर्जुन सम्राट देशपांडे (वय ४ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. अर्जुन सम्राट देशपांडे हा एक आहे !

चि. अर्जुन देशपांडे

पुणे येथील चि. अर्जुन सम्राट देशपांडे याचा अक्षय्य तृतीयेला चौथा वाढदिवस झाला. त्या निमित्ताने त्याची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

‘हे श्रीकृष्णा, हे गुरुमाऊली, तुमच्या कृपेमुळेच आम्हाला चि. अर्जुनसारखे दैवी बालक लाभले आहे. वैशाख शुक्ल पक्ष तृतीया, म्हणजे अक्षय्य तृतीया (७.५.२०१९) या दिवशी त्याचा चौथा वाढदिवस झाला. ‘तुम्हीच आमच्याकडून ‘त्याची गुणवैशिष्ट्ये लिहून घ्यावीत’, अशी आपल्या कोमल चरणी प्रार्थना आहे.

(एप्रिल २०१८ मध्ये चि. अर्जुन याची ६४ टक्के आध्यात्मिक पातळी होती. – संकलक)

१. निर्भय

‘आमच्या इमारतीतील ओळखीचे लोक अर्जुनला खेळतांना पाहून ‘तो पुष्कळ धडाडीचा आहे. तो ४ वर्षांचा वाटत नाही, तर ६ वर्षांचा वाटतो’, असे म्हणतात. तो प्राण्यांशी निर्भीडपणे खेळतो. ‘हाताने बेडूक पकडणे, गाय किंवा कुत्रा यांच्या पाठीवरून हात फिरवणे’, असे तो सहजपणे करतो. तो प्राण्यांशी फार प्रेमाने बोलतो.’ – सौ. प्रज्ञा आणि श्री. सम्राट देशपांडे (चि. अर्जुनचे आई-वडील), पुणे

२. उत्साही आणि आनंदी

‘मागील वर्षाच्या तुलनेत अर्जुन पुष्कळ आनंदी आहे’, असे जाणवते. तो दिवसभर उत्साही आणि आनंदी असतो. त्याला कधीच निराश झालेले पाहिलेले नाही.

३. जिज्ञासू

बाहेर गेलो की, अर्जुन जिज्ञासेने प्रश्‍न विचारतो, उदा. ‘दगड आणि झाडे यांमध्ये कोणते तत्त्व असते ? पाणी देवता का असते ?’

– श्री. सम्राट श्रीहरि देशपांडे (चि. अर्जुनचे वडील)

४. अनुकरणप्रिय

‘दसर्‍याच्या दिवशी सकाळी मी हार-तोरण करतांना पाहून अर्जुन ‘माझ्या छोट्या सायकलसाठी हार करायचा आहे’, असे म्हणून हार करायला बसला. थोड्याच वेळात त्याला काही न शिकवता त्याने त्याच्या परीने पुष्कळ सुंदर हार केला. नंतर त्याने त्याची सायकल पुसून, तिची पूजा करून स्वतः केलेला हार घातला. ते सर्व पाहून माझा आणि सम्राट यांचा (पतीचा) भाव जागृत झाला.

५. उत्तम निरीक्षणक्षमता

एकदा मी असात्त्विक नक्षी असलेले कपडे घातले होते. त्याने ते पाहिल्यावर मला कपडे पालटण्यास सांगितले.’

– सौ. प्रज्ञा सम्राट देशपांडे (चि. अर्जुनची आई)

६. समंजस

अ. ‘त्याला भ्रमणभाष आणि दूरचित्रवाहिनी पहायला पुष्कळ आवडायचे. शिक्षकांनी या दोन्ही गोष्टी न पहाण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले होते. त्यानंतर त्याने लगेच पहाणे बंद केले.

आ. अर्जुनची आई (सौ. प्रज्ञा) एक मासासाठी रामनाथी आश्रमात गेली होती. त्या वेळी त्याने एकदाही ‘आई हवी’, असा हट्ट केला नाही. उलट ‘मला त्रास होऊ नये’, यासाठी तो सकाळी वेळेवर उठून शाळेत जात असे, तसेच माझ्यासमवेत प्रसार सेवेलाही येत असेे.

७. उत्तम आकलनक्षमता

अर्जुन बोटांच्या वेगवेगळ्या मुद्रा तसेच शरिरातील सप्तचक्रेही व्यवस्थित ओळखतो. त्याच्या वर्गशिक्षिकांनी  आम्हाला सांगितले, ‘‘अर्जुनची ग्रहणक्षमता आणि निरीक्षणक्षमता फार चांगली आहे.’’

८. चप्पल चोरी होऊ नये; म्हणून युक्ती योजणारा अर्जुन !

एकदा अर्जुनच्या आईची चप्पल चोरीला गेली. त्यानंतर तोे स्वतःची एक चप्पल घराबाहेरील चपलांच्या मांडणीत आणि एक चप्पल घराच्या आत आणून ठेवू लागला. याविषयी विचारल्यावर तो म्हणाला, ‘‘चप्पल कोणी चोरून नेऊ नये’; म्हणून मी असे करत आहे.’’ हे ऐकून माझी भावजागृती झाली. एवढ्या लहान वयात ईश्‍वराच्या कृपेनेच त्याच्यात एवढी समज आहे !’

– श्री. सम्राट श्रीहरि देशपांडे

९. प्रेमभाव

‘एक दिवस माझ्या पोटात पुष्कळ दुखत असल्याने मी सतरंजी टाकून पहुडले होते. तेव्हा अर्जुन खोबरेल तेलाची बाटली घेऊन आला आणि त्याने माझ्या पोटाला तेल लावले. त्यामुळे थोड्या वेळाने मला बरे वाटू लागले.’ – सौ. प्रज्ञा सम्राट देशपांडे

१०. चुकांची खंत वाटणे

मार्चमध्ये ‘धरणात पाणी नसल्याने पुणे जिल्ह्यात पाणी कपात केली जाणार आहे’, असे वृत्तपत्रात आले होते. त्या वेळी मी त्याला सांगितले, ‘‘आपण आंघोळ करतांना, तसेच हात-पाय धुतांना पाणी वाया घालवतो ना ?; म्हणून बाप्पाने आता पाणी बंद करण्याचे ठरवले आहे.’’ त्या वेळी त्याला पुष्कळ खंत वाटली. त्याने लगेच जलदेवतेची क्षमायाचना केली आणि म्हणाला, ‘‘मी इथून पुढे पाणी वाया घालवणार नाही.’’ नंतर ‘पाणी कुठे कुठे वाचवू शकतो ?’ यावर तो चिंतन करू लागला. या प्रसंगातून त्याची अंतर्मुखता लक्षात आली, तसेच एवढ्या लहान वयात त्याला निसर्गाबद्दल वाटणारे प्रेम आणि त्याला असलेली चुकांची खंतही शिकायला मिळाली.

११. सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता

अ. २०.३.२०१९ या दिवशी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि त्यांच्यासमवेत असलेले साधक घरी येणार होते. त्या दिवशी तो शाळेतून घरी आल्यावर साधक ज्या खोलीत रहाणार होते, तेथे गेला आणि म्हणाला, ‘‘आज घर फार सुंदर दिसते आहे. आज मला घर आवडले.’’ त्या वेळी ‘त्याला सूक्ष्मातील स्पंदने कळतात’, असे मला जाणवले. मी त्याला म्हणालो, ‘‘आज सद्गुरु काकू आपल्याकडे येणार आहेत. त्या तुझ्यासाठी काय आणणार आहेत, ते माहिती आहे का ?’’ तो लगेच म्हणाला, ‘लाडू’ आणि खरेच सद्गुरु काकूंनी आल्यावर त्याच्या हातात लाडूचा खोका दिला.

आ. एकदा चारचाकी गाडीतून बाहेर जातांना मी त्याला म्हणालो, ‘‘आता आपण श्रीकृष्णाचा नामजप करूया.’’ तेव्हा थोडा विचार करून तो म्हणाला, ‘‘नको. आपण हनुमानबाप्पाचा नामजप करूया.’’ नंतर एका सूत्राविषयी पू. गाडगीळकाकांशी बोलतांना मी त्यांना वरील प्रसंग सांगितला. तेव्हा ते म्हणाले, ‘‘हनुमान देवाचा जप करणेच योग्य होते.’’

इ. जानेवारी २०१९ मध्ये एकदा अर्जुन आणि मी ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप करत होतो. जप झाल्यावर मी त्याला विचारले, ‘‘आज तुला काय जाणवले ?’’ तेव्हा तो म्हणाला, ‘‘मला डोळे मिटल्यावर श्रीरामबाप्पा दिसला. त्याच्या हातात धनुष्यबाण होते.’’

– श्री. सम्राट श्रीहरि देशपांडे

१२. सद्गुरु स्वातीताईंनी चैतन्य मिळण्यासाठी दिलेली शाल स्वतःही पांघरून झोपणे

‘अर्जुनचा सद्गुरु स्वातीताईंप्रती पुष्कळ भाव आहे. अनेकदा तो त्यांची आठवण काढतो. सद्गुरु स्वातीताईंनी मला चैतन्य मिळावे यासाठी शाल दिली आहे. झोपतांना मी ती शाल अंगावर घेऊन झोपते. अर्जुनने त्याविषयी मला विचारले. तेव्हा मी त्याला ‘सद्गुरु स्वातीताईंनी मला चैतन्य मिळावे यासाठी शाल दिली आहे’, असे सांगितले. तेव्हा त्याने लगेच ‘मलाही चैतन्य मिळू देत’, असे म्हणून अर्धी शाल स्वतः पांघरून तो झोपी गेला.’ – सौ. प्रज्ञा सम्राट देशपांडे

१३. अर्जुनचे छायाचित्र पाहिल्यावर जाणवलेली सूत्रे

अ. छायाचित्रात अर्जुनच्या आज्ञाचक्राकडे पाहून आनंद जाणवला. तेव्हा परात्पर गुरुदेवांची पुष्कळ आठवण येऊन भावजागृती झाली.

आ. त्याचे डोळे पूर्वीच्या तुलनेत अधिक निळसर झाल्याचे जाणवले, तसेच ‘त्याची दृष्टी स्थिर झाली आहे’, असे जाणवले.’

– श्री. सम्राट श्रीहरि देशपांडे

इ. ‘छायाचित्राची मागील बाजू पांढर्‍या रंगाची असूनही अर्जुनभोवती पांढरी प्रभावळ दिसली. ‘भगवंताशी अनुसंधान आहे’, असे जाणवले. वयापेक्षा तो प्रगल्भ असल्याचे जाणवले.’ – सौ. प्रज्ञा सम्राट देशपांडे

१४. अर्जुनमध्ये जाणवलेले पालट

त्याचे डोळे सुंदर आणि पाणीदार दिसतात. त्याच्या तोंडवळ्यावरील तेज वाढले आहे. त्याचा स्पर्श फार वेगळा वाटतो. सद्गुरु अंजलीकाकू मार्चमध्ये घरी आल्या असतांना त्यांनी सांगितले, ‘‘अर्जुनमधील वायुतत्त्व वाढले आहे. त्यामुळे त्याची त्वचा मऊ लागते. त्याच्या आवाजात एक प्रकारचा गोडवा आला आहे. त्यामुळे त्याचे बोलणे ऐकावेसे वाटते.’’

१५. अर्जुनचे स्वभावदोष

हट्टीपणा, राग येणे, काही वेळा रागाने आई-वडिलांना मारणे.

‘हे श्रीकृष्णा, हे परात्पर गुरुमाऊली, आपणच आमच्याकडून अर्जुनचा योग्य असा सांभाळ करून घ्यावा’, अशी शरणागत भावाने प्रार्थना करत आहोत.’

– श्री. सम्राट श्रीहरि देशपांडे, पुणे (एप्रिल २०१९)


Multi Language |Offline reading | PDF