देवा, हे कधी थांबणार ?

हिंदूंच्या धार्मिक भावनांची नाळ मंदिरांशी निगडित असते, मग ते अगदी कोणतेही मंदिर असो. ‘याच नाळेच्या बळावर आज भारताचा आध्यात्मिक वारसा काही प्रमाणात तरी टिकून आहे’, असे म्हणावे लागेल; पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या वारशाला असुरक्षिततेचे ग्रहण लागले आहे. धार्मिकता जशी सर्व बाजूंनी संकटात आली आहे, तशी मंदिरेही दिवसेंदिवस असुरक्षित होत चालली आहेत. याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला तो, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध श्री वज्रेश्‍वरी देवीच्या मंदिरात झालेल्या चोरीनंतर ! तसे पाहिले, तर राज्यात काय किंवा देशात काय, कुठे ना कुठेतरी मंदिरात चोरी झाल्याची घटना  नित्याचीच झाली आहे. या आधी घरफोडी, बलात्कार, खून आदी घटनांची सवय झाली होती, तशी आता ‘मंदिरात चोरी’ याचीही हिंदूंना सवय झाली आहे. ‘पोलीस पाहून घेतील’, या हिंदूंच्या निष्क्रीय मानसिकतेचाच प्रत्येक वेळी अपलाभ उठवला जातो. श्री वज्रेश्‍वरी देवीच्या मंदिरातही असेच घडले. पहाटेच्या वेळी दरोडेखोरांनी ‘स्क्रू ड्रायव्हर’च्या साहाय्याने दानपेट्या फोडून ८ ते १० लाख रुपयांची रक्कम पळवली. सुरक्षारक्षकाचे हात-पाय बांधून दरोडेखोरांनी चोरी केली. चोरीमागील पार्श्‍वभूमीचा विचार केल्यास ३ ते ५ मे या कालावधीत मंदिराचा वार्षिक यात्रोत्सव पार पडला होता. तेव्हा भाविकांनी मोठ्या प्रमाणात धन अर्पण केले होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार या उत्सवानंतरच दरोडेखोरांनी मंदिराची रेकी केली असण्याची शक्यता आहे. मंदिरांची रेकी केली जाणे, हे अतिशय गंभीर आणि लाजिरवाणे आहे. भाविकांनी भक्तीभावाने आणि श्रद्धापूर्वक अर्पण केलेले धन अगदी सहजरित्या चोरट्यांच्या खिशात जाते, हे संतापजनक नव्हे का ?

हे झाले मंदिरातील चोरीचेे; पण महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या तुळजापूरच्या श्री भवानीदेवीच्या खजिन्यातील मौल्यवान दागिने आणि पुरातन नाणीही गहाळ झाली असल्याचे धक्कादायक वास्तव माहितीच्या अधिकारातून उघडकीस आले आहे. ‘आंधळं दळतयं आणि कुत्रं पीठ खातयं’, असाच हा प्रकार म्हणावा लागेल. मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी असा गलथान कारभार चालणे दुर्दैवी आहे. या सर्वच घटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रासाठी अशोभनीय आणि लज्जास्पद आहेत. जे हात मंदिरात भक्तीभावाने अर्पण करतात, त्याच हातांची मूठ मंदिरातील चोरी किंवा तुळजापूरसारख्या घटनांच्या विरोधात संयत मार्गाने आवळली गेली पाहिजे. सर्वच क्षेत्रांत होणार्‍या भ्रष्टाचाराची कीड आता धार्मिकता आणि मंदिरे यांनाही पूर्णपणे पोखरत आहे. जी काही उरलीसुरली सात्त्विकता आहे, ती नष्ट करण्याचे हे षड्यंत्र हिंदूंनी वेळीच ओळखायला हवे; मात्र ‘धर्म संकटात आहे’, हे सुस्त आणि निद्रिस्त हिंदूंना कसे बरे कळणार ? याचमुळे आपला धर्म आणि संस्कृती यांना आजारपण आले आहे. त्यामुळे ‘मानवाची, पर्यायाने हिंदूंचीच आज अधःपतनाकडे वाटचाल होत आहे’, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.

‘शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती; देव, देश अन् धर्मासाठी प्राण घेतले हाती ।’, हे शौर्यगीत पूर्वी हिंदूंसाठी प्रेरणादायी होते; मात्र आज देव, देश अन् धर्म यांसाठी प्राण हाती घेणारा हिंदूच शेष राहिला नसल्याने हे शौर्यगीत कालौघात नष्ट होण्याची शक्यता आहे. हिंदूंना प्रेरणा देणारे सगळे स्रोतच आज संपत चालले आहेत. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणवणार्‍या एका वृत्तपत्राने तर श्री वज्रेश्‍वरी देवीच्या मंदिरातील चोरीचे वृत्त ‘धाडसी दरोडा’, अशा मथळ्याखाली प्रसिद्ध केले आहे. एकतर चोरीविषयी काहीही सुवेरसुतक नसणे आणि वर असे शब्द वापरून दरोड्याचे समर्थन करणे, हे निंदनीय आहे. मंदिरातील चोरीच्या घटनांच्या विरोधात हिंदूंचे संघटन होऊ नये, या दृष्ट हेतूने जाणीवपूर्वक हिंदुद्वेष बाळगणार्‍यांकडून समाजपरिवर्तन कसे घडणार ?

पूर्वी परकीय आक्रमक हे हिंदूंची मंदिरे आणि त्यांतील संपत्ती यांवर डोळा ठेवून असायचे. अनेक परकीय सत्तांनी हिंदूंची मंदिरे लुटून नेली, काहींनी तर मंदिरांचा विध्वंसही केला. त्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले खरे; पण हिंदूंची मंदिरे आजच्या काळातील नतद्रष्टांकडूनही सुटलेली नाहीत. आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांनी मंदिरांचे सरकारीकरण केल्याचाच हा परिणाम आज हिंदु समाज भोगत आहे. अर्थात केवळ निवडणुकांसाठी मंदिरात प्रवेश करणार्‍यांकडून न्यायाची तरी अपेक्षा काय करणार ? परकीय आक्रमणांच्या कह्यातून मंदिरे वाचवणारे पूर्वीचे आपले राजे हे शूर आणि पराक्रमी होते; पण सध्याचे सर्वपक्षीय राज्यकर्ते शूर आणि पराक्रमी तर जाऊ दे; पण खरे राष्ट्रप्रेमीही नाहीत. त्यामुळे मंदिरांचे रक्षण करणार कोण, हा प्रश्‍नच आहे.

हिंदूंनो, धर्मरक्षणार्थ संघटित व्हा !

वरील प्रकारच्या घटनांमुळे हिंदूंमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागत आहे. देवा, हे कधी थांबणार ? धर्मशिक्षण नसल्याचेच हे दुष्परिणाम आहेत. हिंदूंना धर्मशिक्षण मिळाल्यास ते धर्माविषयी सतर्क होतील. धर्माचा आदर आणि धर्मानुसार आचरण करतील. प्रत्येक हिंदू खर्‍या अर्थाने धर्माभिमानी झाल्यास मंदिरांकडे वक्र दृष्टीने पहाण्याचे कोणाचेही धाडस होणार नाही. हिंदूंनीच आता स्वतःचा वचक निर्माण करण्याची वेळ आली आहे. अन्य धर्मियांच्या धार्मिक स्थळांच्या संदर्भात अशा घटना घडल्या असत्या, तर त्यांनी एव्हाना संघटित होऊन शासनकर्त्यांवरच दबाव आणला असता. हिंदूंनो, तुमचे दायित्व वेळीच ओळखा ! संपूर्ण जगाला दिशादर्शन करणारे मंदिरासारखे स्रोत आपणच कलंकित करत आहोत. या पापाचे भागीदार होण्यापेक्षा धार्मिकतेला न्याय मिळवून देण्यासाठी धर्मपालन, धर्माचरण आणि धर्मरक्षण करा ! ‘भगवान के घर में देर है, अंधेर नही ।’ याप्रमाणे चोरी करणार्‍यांना आणि मंदिराच्या खजिन्यातील पुरातन वस्तू गहाळ करणार्‍यांना एक ना एक दिवस शिक्षा होईल अन् मंदिरांच्या रक्षणार्थ झटणार्‍या हिंदूंवर भगवंताचा कृपाशीर्वादरूपी हस्त सदोदित राहील, हे निश्‍चित !


Multi Language |Offline reading | PDF