कोल्हापूर येथील विशेष अन्वेषण पथकाकडून विनय पानवळकर यांची चौकशी

‘नुकतेच कोल्हापूरहून ‘एस्आयटी’चे (विशेष अन्वेषण पथकाचे) ३ पोलीस आणि १ चालक, असे ४ जण चौकशीसाठी देवरुख (जिल्हा रत्नागिरी) येथे श्री. विनय पानवळकर यांच्या घरी आले होते. त्यांपैकी १ निरीक्षक दर्जाचे पोलीस अधिकारी होते. या चौकशीच्या वेळी पोलीस आणि श्री. पानवळकर यांच्यात झालेले संभाषण येथे देत आहोत.(पोलिसांनी प्रथम नाव आणि दूरभाष क्रमांक विचारला. त्यावर श्री. पानवळकर यांनी त्यांना नाव सांगून दूरभाष क्रमांक दिला.)

पोलीस : आम्ही केवळ सर्वसाधारण (जनरल) चौकशीसाठी आलो आहोत. तुम्ही … याचे नातेवाईक आहात का ?

श्री. पानवळकर : हो

पोलीस : घरी कोणकोण असतात ? तुमची पत्नी आणि मुलगा यांचे नाव काय ? मुलगा कुठे असतो, काय करतो? तुमचे शिक्षण किती झाले? कोणत्या शाळेत शिक्षण घेतले ? कोणत्या महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले ? पूर्वी कुठे रहात होता? कोणती नोकरी करत होता? तेथील कंपनीचे नाव काय? किती वर्षेे नोकरी केली? भावाचे नाव काय ? ते काय करतात? त्यांना किती मुले आहेत ? ते कुठेे असतात ? बहिणीचे आणि मेव्हण्याचे नाव काय ?  ते दोघे कुठे असतात ? त्यांना किती मुले आहेत ? … कुठे असतो? त्याच्या पत्नीचे नाव काय?

(या सर्व प्रश्‍नांची उत्तरे श्री. पानवळकर यांनी दिली.)

पोलीस : तुम्ही एका डॉक्टरांना ओळखता का?

श्री. पानवळकर : हो. मी त्यांच्याकडूनच वैद्यकीय सल्ला घेतो.

पोलीस : त्यांची भेट कधी होते? तुमची आणि त्यांची ओळख आहे का?

श्री. पानवळकर : माझ्या हृदयाच्या आजारपणाच्या निमित्ताने मागील वर्षी भेट झाली होती. वैद्यकीय सल्ल्यापुरती आमची ओळख आहे.

पोलीस : त्यांच्या घरी तुमचे प्रशिक्षण केंद्र होते का?

श्री. पानवळकर : हो. काही वर्षांपूर्वी काही स्वरक्षण शिबिरे घेण्यासाठी मी तेथे जात होतो. जेव्हा शिबिरे असत, तेव्हाच जात होतो.

पोलीस : तुमच्या समवेत कोणकोण शिकवायचे ?

श्री. पानवळकर : आता मला नावे आठवत नाहीत. त्यांपैकी कोणी आता संस्थेच्या संपर्कात असतील, असेही वाटत नाही.

पोलीस : तरीपण काही नावे लक्षात आहेत का?

(श्री. पानवळकर यांनी दोघांची नावे सांगितली.

पोलीस : यापैकी ….. प्रकरणात कोणाचे नाव होते ?

श्री. पानवळकर : … यांचे  होते; पण ते निर्दोष सुटले आहेत.

पोलीस : तुम्ही गोवा येथील आश्रमात कधी जाता ?

श्री. पानवळकर : हिंदु अधिवेशनासाठी आणि त्या नंतरच्या हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांच्या शिबिरासाठी जाणे होते.

पोलीस : (परात्पर गुरु) डॉ. आठवले यांची भेट होते का ?

श्री. पानवळकर : ते आजारी असल्याने कोणाला भेटत नाहीत.

पोलीस : गोव्याला प्रशिक्षण केंद्र कुठे होते?

श्री. पानवळकर : … गावात होते. बाकी लक्षात नाही.

पोलीस : तेथे काय शिकवले जायचे ?

श्री. पानवळकर : स्वरक्षणासाठी कराटे आणि लाठी शिकवायचो.

पोलीस : तुमच्या घरीही केेंद्र होते का?

श्री. पानवळकर : हो. वर्ष २००१ ते २००३ या काळात हे केंद्र चालू होते. पुढे उपस्थितीच्या अभावामुळे बंद केले. आता जिल्ह्यात, गावात मागणीप्रमाणे प्रशिक्षण दिले जाते. मी मात्र तब्येतीच्या कारणामुळे अनेक वर्षे प्रशिक्षण दिलेले नाही. मी केवळ धर्मप्रसाराची सेवा करतो.

पोलीस : तुम्ही धर्मप्रसारासाठी कोणकोणत्या राज्यांत गेला आहात ?

श्री. पानवळकर : प्रामुख्याने महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक येथे गेलो आहे. गेले ७-८ वर्षे  देहली भागात (येऊन-जाऊन) प्रसार करत आहे.

पोलीस : तेथे कुठे प्रसाराला जायचा ?

श्री. पानवळकर यांनी माहिती दिली.

पोलीस : हरिद्वारला गेला होता का ?

श्री. पानवळकर : संतांना भेटायला गेलो होतो.

पोलीस : … याने जसे केले, तसे तुम्हालाही कधी करावेसे वाटले का ?

श्री. पानवळकर : मुळात … याने असे काही केलेले नाही. कोणाला असे काही करावेसे का वाटेल ? आम्ही धर्मप्रसार करतो. आम्हाला कोणताही विरोध नाही. आमच्या संस्थेत ७० टक्के स्त्रिया सहभागी आहेत. असे काही असते, तर स्त्रियांचा सहभाग वाढला असता का ?

पोलीस : तुम्ही सारंग अकोलकर आणि विनय पवार यांना ओळखता का ? कधी भेट झाली होती का ?

श्री. पानवळकर : मी त्यांचे नाव दैनिकातून वाचले, संस्थेत शेकडो लोक नवीन जोडले जातात. काही सोडून जातात. सर्वांशी आमची ओळख होऊ शकत नाही. यांना मी कधी पाहिल्याचे जाणवत नाही.

पोलीस : तुम्ही कोल्हापूरला असाल ना ?

श्री. पानवळकर : मी गेल्या ५-६ वर्षांत कोल्हापूरला आलेलो नाही. तब्येतीच्या कारणामुळे मी रत्नागिरी जिल्ह्यातच रहातो आणि प्रसारसेवा करतो.

पोलीस : तुम्ही किती वर्षे संस्थेच्या संपर्कात आहात ?

श्री. पानवळकर : वर्ष १९९७ पासून संपर्कात आहे.

पोलीस :  … याच्याशी नियमित बोलणे होत असेल ना ?

श्री. पानवळकर : नाही, आम्ही सेवेत असल्यामुळे एकमेकांना वर्षातून १ – २ वेळा दूरभाष करतो, इतरवेळी नाही.

यानंतर श्री. पानवळकर यांनी पोलिसांसोबत साधना, नामजप यावर १५ मिनिटे चर्चा केली. त्यानंतर पोलिसांनी जाता जाता त्यांच्या भ्रमणभाषमधील श्री. विनय पवार आणि श्री. सारंग अकोलकर यांची छायाचित्रे दाखवून पुन्हा ‘यांना कधी भेटल्याचे आठवते का ?’ असे विचारले. त्यावर श्री. पानवळकर यांनी वरीलप्रमाणेच उत्तर दिले.

या वेळी पोलिसांनी गुढीपाडव्याचे महत्त्व समजून घेतले. दैनिक ‘सनातन प्रभात’चा विशेषांक घेतला. पोलीस म्हणाले, ‘‘आम्ही ४ जण तुमच्या संस्थेशी जोडले गेलो असे समजा. आम्ही साधनेविषयी एवढे कधी ऐकले नव्हते. आम्हाला तुमचे कार्य आवडेल. आता चौकशीला न येता साधक म्हणून भेटायला येऊ. आधी दूरभाष करून येऊ. तुम्हाला भेटून आनंद झाला.’’ (गोड बोलून माहिती काढण्याची आणि पुन्हा चौकशीला येण्यासाठी निमित्त शोधण्याची पोलिसांची क्लृप्ती ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF