‘सनातन’सूर्याला कोटी कोटी नमन !

संपादकीय

सनातन प्रभात’चे संस्थापक संपादक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यंदा ७८ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. या संपादकीयाच्या निमित्ताने त्यांच्या चरणी कृतज्ञतापुष्प अर्पण करतांना आमच्या अंतःकरणातील भाव दाटून येत आहे. प्रलयाच्या वेळी भगवान बालमुकुंद स्वरूपात प्रयागराज येथील अक्षयवटावर विराजित होऊन संपूर्ण सृष्टीचे बीज स्वतःच्या हातात सुरक्षित ठेवतात आणि त्यानंतर पुन्हा सृष्टीचे सृजन करतात. अगदी तसेच समाज आणि राष्ट्र रसातळाला जात असतांना, धर्माला ग्लानी आलेली असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले आजच्या या घोर कलियुगात धर्मबीजाचे सृजन करत आहेत. सनातन संस्थेच्या स्थापनेपासून त्यांनी विविध क्षेत्रांत विखुरलेली सनातन बीजे आज वृक्षात रूपांतरित होत आहेत. विविधांगी कार्य तर अनेकजण करतात; पण प्रवाहाच्या विरोधात जाऊन काळानुसार आवश्यक कार्य करणे, हे केवळ द्रष्ट्या धर्मधुरंधर तपस्वींच्याच माध्यमातून होऊ शकते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या विविधांगी कार्यातून याची प्रचिती येते.

हिंदूंचा आवाज : सनातन प्रभात !

 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रेरणेने सनातन संस्थेच्या स्थापनेनंतर अवघ्या ९ वर्षांत दैनिक ‘सनातन प्रभात’च्या ४ आवृत्त्या, साप्ताहिक आणि पुढे ३ भाषांमध्ये मासिक चालू करण्यात आले. कोणतेही प्रशिक्षित मनुष्यबळ नसतांना आर्थिक हानी सोसून सनातन प्रभातचा प्रारंभ झाला. आज मागे वळून पाहिल्यावर लक्षात येते की, पाश्‍चात्त्य, कथित आधुनिकतावादी आणि पुरोगामी यांचा वैचारिक आतंकवाद अन् धर्मांधांची झुंडशाही यांच्या अंधकारात वावरत असलेल्या महाराष्ट्रात सनातन धर्माची एक पहाट सनातन प्रभातच्या माध्यमातून पहायला मिळाली. हिंदु धर्मविरोधकांच्या विषाक्त विचाराने धर्मापासून दूर चाललेल्या हिंदु मनाला पुन्हा धर्माचे महत्त्व पटवून देण्यासह विरोधकांच्या विचारांचे परखड खंडण केल्याने सनातन प्रभात हिंदु मनामध्येही परिवर्तन करणारा ठरला.

प्रारंभीच्या काळात वाचक सनातन प्रभातला सार्वजनिक ठिकाणी न ठेवता लपवून ठेवत; कारण त्याच्यात धर्मांधांविषयी लिहिलेले परखड लिखाण त्यांना अंतःकरणापासून पटत असले, तरी त्याची वाच्यता करायला त्यांना भीती वाटायची. हळूहळू या सनातन प्रभातमुळे हिंदूंचा आत्मविश्‍वास वाढला. धर्महानीच्या घटनांना घरबसल्या दूरभाषवरून निषेध करण्याची उर्मी या आत्मविश्‍वासातून त्यांच्यात जागृत झाली. जो हिंदु समाज स्वतःवरील अत्याचारांची वाच्यता करायला घाबरायचा, तो हळूहळू रस्त्यावरील आंदोलनात येऊन उभा राहू लागला. धार्मिक आणि आध्यात्मिक ज्ञान देणारी अनेक नियतकालिके आहेत; पण भ्रमित झालेल्या हिंदूंना धर्माचे ज्ञान आणि संघर्षाची गीता सांगणारा सनातन प्रभात एकमात्र आहे. स्वातंत्र्यानंतर समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या उत्थानाचे कार्य कशातून झाले असेल, तर ते सनातन प्रभातमधून हे आज २० वर्षांनंतर आवर्जून सांगावेसे वाटते ! बंदी, संपादकांच्या अटका अशा अनेक संकटांतून पुढे जात आज सनातन प्रभात अन्य वृत्तपत्रांच्या बातम्यांचा विषय बनला आहे. ज्या घटकांनी हिंदु विचारांची दखल घेतली पाहिजे, असे राजकारणी, प्रसारमाध्यमे, हिंदु धर्म विरोधी सनातन प्रभातचा अभ्यास करत आहेत, हीच गुरुदेवांनी द्रष्टपणाने पेरलेल्या बीजाचे वृक्ष झाल्याची पावती आहे.

सनातन प्रभात विषयी राजस्थानचे एक संत म्हणाले होते, ‘सनातन प्रभातच्या माध्यमातून स्थूल जगतात तुम्ही करत असलेल्या धर्मविरोधी विचारांच्या खंडणाचा सूक्ष्म जगतात स्पंदनांच्या रूपात पुष्कळ मोठा प्रभाव होत आहे. आजपर्यंत धर्माच्या आधारे पाखंडाचे खंडण करणारे कोणी नव्हते. आम्ही कल्पनाही केली नव्हती की, असे करणारे कोणी असेल. तुमचा हा अंक पाहून आता समाधान झाले.’

धर्मशिक्षण देणारी सनातन संस्था

हिंदूंच्या सर्व समस्यांचे एकमेव कारण आहे, ते म्हणजे धर्मशिक्षणाचा अभाव ! हेच हेरून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ३१० हून अधिक विषयांवर ग्रंथांचे संकलन करून हिंदूंना धर्मशिक्षण देण्याचा प्रयत्न सनातन संस्थेद्वारे प्रारंभ केला.

हिंदूंना जागृत करणारी हिंदु जनजागृती समिती

देशभरातील अनेक संघटनांना आधार देण्याचे कार्य परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रेरणेने चालू झालेल्या हिंदु जनजागृती समितीने केले. आज संघटना म्हणतात, ‘‘समितीच्या संपर्कात येण्यापूर्वी आम्ही अनाथ होतो. समितीने आम्हाला कडेवर घेतले, चालायला शिकवले आणि आज आम्ही जे काही आहोत, ते केवळ समितीमुळे आहोत.’’

हिंदु राष्ट्रासाठी प्रयत्न

धर्माधारित हिंदु राष्ट्राची निर्मिती धर्माचरणी प्रजा आणि संत यांच्या बळावरच होऊ शकते. यासाठी गुरुदेवांनी साधनाबळाने ओतप्रोत अशा संतांची आणि सत्त्वशील साधकांची निर्मिती केली. आदर्श हिंदु राष्ट्राची पायाभरणी आश्रमाच्या माध्यमातून केली. आज मोठ्या आध्यात्मिक संस्थांचे साधक खासगीत ‘‘तुमच्या साधकांमध्ये पुष्कळ गुणवत्ता आहे’’, असे जेव्हा सांगतात, तेव्हा कृतज्ञताभाव दाटून येतो. संत म्हणतात, ‘‘तुम्ही असाधारण कार्य करत आहात. आज नव्हे, पुढे ते लोकांच्या लक्षात येईल.’’ कुंभमेळ्यात अनेक संत म्हणाले, ‘‘आमचे कार्य तुम्ही करत आहात.’’ एकदा तर ‘जॅपनीज मॅनेजमेंट’चे एक प्रशिक्षक आश्रमात आले होते. त्यांनी सांगितले, ‘‘तुमचे व्यवस्थापन ‘जॅपनीज मॅनेजमेंट’पेक्षाही पुष्कळ पुढे आहे. कोणतेही प्रशिक्षण नसतांना तुम्ही हे करत आहात, हे असाधारण आहे.’’ हा गुरूंचा महिमा आहे ! जसे सूर्य उगवला की, सृष्टीचे चलन आपोआप चालू होते, तसे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रूपाने हा सनातन सूर्य उगवला आहे. केवळ या सूर्याच्या अस्तित्वाने सनातन धर्माला पुनःप्रतिष्ठा प्राप्त होत आहे. अशा या भगवंतस्वरूप सनातन सूर्याला कोटी कोटी नमन ! परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दीर्घायुष्य लाभो, हीच प्रार्थना !


Multi Language |Offline reading | PDF