अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर मिरज येथील सनातनच्या आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पादुकांचे आगमन !

अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आणि परशुराम जयंतीच्या दिवशी मिरज येथील सनातनच्या आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हस्तस्पर्शाने चैतन्यमय झालेल्या त्यांच्या पादुकांचे आगमन !

  • गुरुपादुकांसह ‘श्री’ बीजमंत्रांकित पदकाचीही प्रतिष्ठापना !

  • सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आणि पू. जयराम जोशीआजोबा यांची वंदनीय उपस्थिती

मिरज आश्रमात पादुकांचे आगमन होतांना डावीकडे श्री. शंकर नरूटे आणि शेजारी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

मिरज, ९ मे (वार्ता.) – हिंदु राष्ट्राचे उद्गाते परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या हस्तस्पर्शाने चैतन्यमय झालेल्या त्यांच्या पादुका आणि श्री महालक्ष्मीदेवीचे ‘श्रीं’ बीजमंत्राकित पदक यांचे अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर अन् परशुराम जयंतीच्या दिवशी सनातनच्या मिरज येथील आश्रमात आगमन झाले. या वेळी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आणि पू. जयराम जोशीआजोबा यांची वंदनीय उपस्थिती होती. सर्व साधकांच्या वतीने पू. जयराम जोशीआजोबा यांनी गुरुपादुकांचे पूजन केले.

सायंकाळी ५.३० वाजता परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांच्या पादुकांचे आगमन झाले. श्री. शंकर नरूटे यांच्यासह सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आश्रमात प्रवेश करतांना सौ. तनुजा गाडगीळ यांनी त्यांचे औक्षण केले. पादुकांचे आगमन झाल्यावर साधकांनी दिलेल्या ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’, ‘हर हर महादेव’, ‘प्रभु श्रीरामचंद्रांचा विजय असो’, ‘भगवान श्रीकृष्णाचा विजय असो’ या घोषणांनी वातावरणात नवचैतन्य निर्माण झाले. या वेळी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी साधकांकडून भावप्रयोग करवून घेतला. पादुका पूजन सोहळा प्रारंभ होण्यापूर्वी श्री. रमेश लुकतुके यांनी शंखनाद केला. पादुका पूजनाचे पौरोहित्य श्री. योगेश जोशी यांनी केले. पूजनानंतर आरती करण्यात आली. त्यानंतर सर्व साधकांनी गुरुपादुकांचे भावपूर्ण दर्शन घेतले.

आश्रमात पादुकांना नमस्कार करतांना सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आणि पू. जयराम जोशीआजोबा

मारुतिरायांसारखा दास्यभाव आपल्याला निर्माण करायचा आहे ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

या वेळी साधकांना मार्गदर्शन करतांना सद्गुरु (कु.) स्वाती खाडये म्हणाल्या, ‘‘सध्या आपत्काळाची तीव्रता वाढत आहे. अशा स्थितीत आपल्याला गुरुपादुकांचे दर्शन घेण्याची अमूल्य संधी उपलब्ध झाली आहे. मारुतिरायांसारखा दास्यभाव आपल्याला निर्माण करायचा आहे. त्यामुळे गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करून मिळणारे चैतन्य आपण अंतर्मनात साठवूया.’’

विशेष

आश्रमासमोर गोमयाने सारवण्यात आले होते, तसेच देवतांचे तत्त्व आकृष्ट करणारी रांगोळी काढण्यात आली होती. आश्रमात पायर्‍यांवर दोन्ही बाजूंनी पणत्या लावण्यात आल्या होत्या. तसेच फुले ठेवण्यात आली होती. द्वारांवर आंब्याच्या पानांचे तोरण लावण्यात आले होते. यामुळे आश्रमात दिवाळीसारखेच वातावरण झाले होते. पायर्‍यांवर पणत्या लावण्यात आल्याने आणि चैतन्यमय वातावरणामुळे आश्रमात सर्वत्र पिवळा प्रकाश पसरला होता.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now