(अ)मानवतावादी ‘फादर’ !

संपादकीय

झारखंड या नक्षलवादाने प्रभावित राज्यामध्ये गेल्या वर्षी जूनमध्ये राज्याला हादरवून सोडणारी घटना घडली. ती घटना होती ५ अल्पवयीन मुलींवर नक्षलवाद्यांनी केलेल्या सामूहिक बलात्काराची. नक्षलवाद्यांच्या राक्षसी वृत्तीच्या अशा प्रकारच्या घटना देशाला तशा नवीन नाहीत. झारखंडमधील कोचांग गावामध्ये घडलेल्या घटनेने बलात्कारासारख्या दुर्दैवी घटनांमध्ये अजून एका घटनेची भर पडली; पण ‘नक्षलवाद्यांचे अमानवीय आणि नृशंस कृत्य’ एवढीच या घटनेची व्याप्ती नाही, तर ‘नक्षलवाद्यांसह जनताद्रोही ख्रिस्ती, जिहादी आणि राष्ट्र अन् धर्म द्रोही लोकांनी संधान साधले आहे’, असे जे आरोप केले जातात, त्याला पुष्टी देणारे धागेदोरे या घटनेमध्ये आहेत. या प्रकरणी फादर अल्फांसो आईंद यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. अल्फांसो आणि अन्य दोषी यांना काय ती शिक्षा १५ मे या दिवशी सुनावली जाईल; पण या निमित्ताने ख्रिस्ती धर्मगुरूंचा (अ)मानवतावादी तोंडवळा, प्रसिद्धीमाध्यमे अन् नक्षलसमर्थक यांचे सोयीस्कर मौन आणि सरकारची भूमिका यांविषयी ऊहापोह होणे आवश्यक आहे.

‘फादर’ यांची मूकसंमती

मानवी तस्करीच्या विरोधात जागृती करण्यासाठी एका स्वयंसेवी संघटनेच्या ५ मुली कोचांग या गावामध्ये गेल्या होत्या. त्या तेथे जागृतीपर नाटक करत होत्या. नाटक चालू झाल्यावर १५ मिनिटांनी ५ नराधम तेथे आले आणि त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून मुलींना पळवून नेले. त्या वेळी ‘स्टॉपमन मेमोरियल मीडल स्कूल’चे फादर अल्फांसो आईंद तेथे उपस्थित होते; पण त्यांनी मुलींना सोडवण्यासाठी प्रयत्न तर केले नाहीतच; पण उलट ‘तुम्ही जा, काहीही होणार नाही’, असे मुलींना सांगितल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. हे फादर महाशय येथेच थांबले नाहीत. नक्षलवाद्यांनी जेव्हा ५ मुलींसह एका ‘सिस्टर’चेही अपहरण करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ‘ती नन आहे. तिला सोडून द्या’, अशी सूचना या फादर महाशयांनी नक्षलवाद्यांना केली. परिणामी ती नन नक्षलवाद्यांच्या शिकारीपासून वाचली. पुढे अपहरण झालेल्या ५ मुलींवर जंगलात सामूहिक बलात्कार करून त्याचे चित्रीकरण करण्यात आले. जेव्हा दुसर्‍या दिवशी मुलींना सोडून देण्यात आले, तेव्हा अल्फांसो यांनी हे सर्व प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. एकूणच या प्रकरणात अल्फांसो यांची भूमिका संशयास्पद होती; कारण या फादर यांनी शाळेतून मुलींचे अपहरण झाल्याचे पोलिसांना कळवण्याचेही कष्ट घेतले नाहीत. याच संशयास्पद भूमिकेवरून पोलिसांनी त्यांना कह्यात घेतले आणि न्यायालयानेही त्यांना षड्यंत्रकारी ठरवले. या निमित्ताने ख्रिस्ती धर्मगुरूंचा खरा तोंडवळा पुन्हा एकदा जगासमोर आला. हिंदु धर्माच्या शिकवणीनुसार ‘गुन्हे करणार्‍यासह त्याला मूकसंमती देणाराही तेवढाच दोषी असतो आणि त्यास त्याची शिक्षा भोगावीच लागते.’

बोलके मौन

या निमित्ताने नक्षलसमर्थकांचे, नक्षलींच्या कृत्यांना वैचारिक आधार देऊ पहाणार्‍या पुरो(अधो)गाम्यांचे पितळही उघडे पडले आहे. ‘विकासाच्या अभावी नक्षलवाद्यांना शस्त्र हाती घ्यावे लागते’, असा युक्तीवाद करणारे नक्षलवाद्यांच्या या अधम कृत्याच्या विरोधात मात्र चकार शब्द बोलायला सिद्ध नसतात. याही प्रकरणात तेच दिसून आले. पुरोगामी टोळी जशी शांत होती, तशी महिला कार्यकर्त्या, स्त्री-मुक्तीचे नारे देणार्‍या महिलाही मूग गिळून गप्प होत्या. एरव्ही हिंदु संतांवर नुसते आरोप झाले, तरी त्याची शहानिशा न करता २४ घंटे ‘ब्रेकिंग न्यूज’ दाखवून हिंदु धर्माची करता होईल तेवढी अपकीर्ती करणारे पत्रकार, या घटनेच्या संदर्भात चिडीचूप होते. याविषयी ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु असणारे पोप यांनीही मौन बाळगले होते. वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या नावाखाली हिंदु धर्माची चिकित्सा करणारी मंडळी ख्रिस्ती आणि इस्लाम पंथांतील शिकवणीविषयी मात्र चर्चा करायला सिद्ध नसतात. अशा प्रकरणांत या सर्वांचे मौन पुरेसे बोलके आहे.

केवळ झारखंड राज्याचा विचार केला, तर गेल्या वर्षी जुलैमध्ये मदर तेरेसांच्या संस्थेच्या मिशनरी लोकांचे लहान मुलांची विक्री करण्याचा प्रकार उघड झाला होता. ‘मिशनरी ऑफ चॅरिटी’च्या ‘निर्मल हृदय केंद्रा’तील लहान बाळांच्या नशिबी मानवी तस्करीची ‘चॅरिटी’ आली होती. त्याच दरम्यान डुमका जिल्ह्यातील आदिवासींचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या १६ ख्रिस्ती मिशनर्‍यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर काही दिवसांतच मिशनर्‍यांकडून चालवल्या जाणार्‍या अथवा त्यांचा आर्थिक पाठिंबा असलेल्या ८८ स्वयंसेवी संस्थांवर झारखंड पोलिसांनी धाडी टाकल्या होत्या. विदेशी निधीचा धर्मांतरासाठी आणि राज्यविरोधी कारवायांसाठी वापर करण्याचा त्यांच्यावर ठपका होता. आताही फादर यांची विकृती समोर आली आहे. या सगळ्या घटना जरी वरकरणी स्वतंत्र असल्या, तरी या घटनांमध्ये ख्रिस्त्यांच्या गुन्हेगारीचे एक समान सूत्र आहे आणि त्याचे कारण झारखंड राज्यामध्ये मोठ्या संख्येने असलेल्या आदिवासी समाजामध्ये आहे. हेच कारण तेथील नक्षलवादाचेही आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासींचे धर्मांतर करण्यासाठी ख्रिस्ती कार्यरत आहेत, तर आदिवासींच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकार अन् पोलीस यांच्यावर निशाणा साधण्यासाठी नक्षलवादी कार्यरत आहेत. त्यांच्या विरोधात सरकारने ठोस कृती करणे आवश्यक आहे.

जिहाद्यांच्या तळावर सीमापार कारवाई करून त्यांना कंठस्नान घालणार्‍या सैन्याला ‘नक्षलवादी, जिहादी, ख्रिस्ती मिशनरी, पुरोगामी आदींच्या अभद्र युती’वर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करणे अवघड नाही; पण प्रश्‍न राजकीय इच्छाशक्तीचा आहे. ती जोवर प्रखर अन् राष्ट्र-धर्म हितैषी असणार नाही, तोवर कोचांगसारख्या घटना घडतच रहाणार !


Multi Language |Offline reading | PDF