रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात लक्षकुंकूमार्चन विधीअंतर्गत श्री ललितात्रिपूरसुंदरी देवीचे पूजन संपन्न !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे, हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यातील सर्व अडथळे दूर व्हावेत आणि साधकांसह सर्व हिंदुत्वनिष्ठ यांचे त्रास दूर व्हावेत यांसाठी सद्गुरुद्वयींनी केला संकल्प

रामनाथी (गोवा) – परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात धार्मिक विधींना ५ मे पासून आरंभ झाला आहे. त्या अंतर्गत आतापर्यंत भृगु महर्षींच्या आज्ञेने सौरयाग, ६ मे या दिवशी मयन महर्षी यांच्या आज्ञेने महाराजमातंगी याग आणि ७ मे या दिवशी श्री सत्यनारायण पूजा करण्यात आली. श्रीविष्णूच्या चरणकमली स्थित असलेली श्री महालक्ष्मीदेवी निरंतर विष्णूसेवेत दंग राहून श्रीविष्णूच्या कार्याला गती प्रदान करते. श्री महालक्ष्मीदेवीची कृपादृष्टी लाभून लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, यासाठी ८ मे या दिवशी लक्षकुंकूमार्चना अंतर्गत स्फटिकाच्या श्रीयंत्रावर श्री ललितात्रिपूरसुंदरी देवीचे आवाहन करून पूजन करण्यात आले. ९ मे या दिवशी श्रीयंत्रावर लक्षकुंकूमार्चना करण्यात येणार आहे.

मयन महर्षींच्या आज्ञेनुसार ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे, हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यातील सर्व अडथळे दूर व्हावेत, या कार्यात सहभागी असलेल्या साधकांसह सर्व हिंदुत्वनिष्ठांचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास दूर व्हावेत, तसेच सर्वांचे आयुष्यवर्धन व्हावे’, असा संकल्प परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी केला. स्फटिकाच्या श्रीयंत्रावर श्री ललितात्रिपूरसुंदरी देवीचे आवाहन करून षोडषोपचार पूजा करण्यात आली. सनातन पुरोहित पाठशाळेचे संचालक ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. दामोदर वझेगुरुजी यांनी केलेले भावपूर्ण मंत्रपठण आणि प्रत्यक्ष श्री महालक्ष्मीस्वरूप असलेल्या सद्गुरुद्वयींनी केलेले भावपूर्ण पूजन यांमुळे पूजास्थळी देवीचे प्रत्यक्ष अस्तित्व उपस्थित संत अन् साधक यांनी अनुभवले.


Multi Language |Offline reading | PDF