५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कुसगाव बुद्रुक (जिल्हा रायगड) येथील चि. नारायणी सुहास शिंदे (वय ३ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. नारायणी शिंदे ही एक आहे !

चि. नारायणी सुहास शिंदे हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

चि. नारायणी शिंदे

‘वैशाख शुक्ल पक्ष पंचमी (९.५.२०१९) या दिवशी चि. नारायणी सुहास शिंदे हिचा तिथीनुसार वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आजीला लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

१. बाळाच्या जन्मापूर्वी

अ. ‘बाळाच्या जन्मापूर्वी सून आणि मुलगा यांंनी डॉ. बालाजी तांबे अन् आयुर्वेदाचार्य तथा सनातनचे सद्गुरु डॉ. वसंत बाळाजी आठवले (परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे ज्येष्ठ बंधू) यांनी लिहिलेली पुस्तके वाचून त्याप्रमाणे आहार आणि आचरण केले. तसेच ते पंचकर्माचे उपचार घेत होते.

आ. सौ. सुप्रिया (चि. नारायणीची आई) श्रीरामरक्षा, मारुतिस्तोत्र, अथर्वशीर्ष आदी स्तोत्रे म्हणत असे. ती नामजप आदी आध्यात्मिक उपाय करत असे आणि ती ‘श्रीमद्भगवद्गीतासार’ या ग्रंथाचे वाचन करत असे.

इ. सौ. सुप्रियाला गर्भारपणात त्रास झाला नाही. ती नेहमी आनंदी आणि समाधानी असायची.

२. जन्मानंतर

२ अ. जन्म ते ६ मास : सौ. सुप्रियाची नैसर्गिक प्रसूती झाली. त्या वेळी बाळाला (चि. नारायणीला) फारसे औषधोपचार करावे लागले नाहीत.

२ आ. वय ९ मास

१. ती ‘चालणे-बोलणे’ या कृती स्वतःहून करण्याचा प्रयत्न करत असे. ती ‘आजी, आई, बाबा, दादा, मामा’ असे शब्द स्पष्टपणे म्हणत असे.

२. आम्ही तिची आवड पाहून सनातन पंचांगातील अष्टदेवतांची चित्रे कागदावर चिकटवली होती. तिला ती चित्रे दिवसातून ३ वेळा दाखवावी लागायची.

२ इ. वय १ वर्ष : ती श्रीकृष्णाच्या चित्राकडे बोट दाखवून ‘श्री…श्री’ असे म्हणून आनंदी होत असे.

२ ई. वय १ ते ३ वर्षे

२ ई १. देवाची आवड

अ. ती प्रतिदिन सकाळी देवघरात देवाला नमस्कार करते.

आ. तिला प्रतिदिन देवापुढे रांगोळी काढायला आवडते. तसेच तिला पूजा केलेले देवघर, देवाला वाहिलेली फुले, धूप आणि उदबत्ती बघायला आवडते.

इ. ती सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपतांना ‘देवा, मला चांगली बुद्धी आणि आरोग्य दे’, अशी प्रार्थना करते.

ई. नारायणीचे बाबा प्रतिदिन तिला मांडीवर घेऊन नामजप करतांना ती माळ ओढल्याप्रमाणे मुद्रा करते.

उ. ती ‘वक्रतुंड महाकाय…’, ‘सर्वमङ्गल माङ्गल्ये…’, ‘कृष्णाय वासुदेवाय…’ हे श्‍लोक स्पष्टपणे म्हणते.

२ ई २. धर्माचरणाची आवड : ती प्रत्येक सणाच्या दिवशी पहाटे उठते आणि अभ्यंग स्नान करते.

२ ई ३. चांगली ग्रहणक्षमता : तिला एखादी गोष्ट सांगितल्यावर तिच्या ती लगेच लक्षात रहाते.

२ ई ४. सात्त्विकतेची आवड : तिला सात्त्विक कपडे (उदा. परकर-पोलके) घालणे, अलंकार घालणे आणि केसांत गजरा घालणे या कृती करायला आवडतात.

२ ई ५. जयघोष करायला आवडणे

अ. तिला छत्रपती शिवाजी महाराज आवडतात. आमच्या घरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे चित्र आहे. ती ते चित्र बघून ‘छत्रपती शिवाजी महाराजांंचा विजय असो !’, असा जयघोष करते.

आ. ती ‘मंगलमूर्ति मोरया !’, ‘भगवान श्रीकृष्णाचा विजय असो !’ आणि ‘हर हर महादेव !’, असा जयघोष करत आनंदाने उड्या मारते.

२ ई ६. आध्यात्मिक उपायांची आवड

अ. ती श्रीरामरक्षास्तोत्र आणि नामजप ऐकल्यावर झोपते अन्यथा ती चिडचिड करते.

आ. तिची प्रतिदिन दृष्ट काढावी लागते.

इ. तिला आध्यात्मिक उपाय करायला आवडतात. ती आम्हाला तिला विभूती, अत्तर आणि कापूर लावायला सांगते. ती आम्हाला मोरपीस आणि ‘दैनिक सनातन प्रभात’ यांद्वारे तिच्यावरील त्रासदायक शक्तीचे आवरण काढायला सांगते.

२ ई ७. भाव : तिला ‘दैनिक सनातन प्रभात’ दाखवल्यावर ती आनंदी होते. ती आम्हाला दैनिकातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र दाखवते आणि ‘जय गुरुदेव’ असे म्हणते. ती ‘दैनिक सनातन प्रभात’ वाचण्याचाही प्रयत्न करते.

३. स्वभावदोष

चंचलता, हट्टीपणा आणि अपेक्षा करणे

४. प्रार्थना

‘नारायणीचा ‘ईश्‍वरी राज्यातील एक आदर्श बालक’ म्हणून नावलौकिक होऊ दे’, हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना आहे.’

– सौ. रंजना शिंदे (चि. नारायणीची आजी), विश्रामबाग, सांगली. (२.३.२०१९)

५. कृतज्ञता

‘हे ईश्‍वरा, तू आम्हाला नारायणीसारखी हुशार, सात्त्विक आणि गोड मुलगी दिल्याबद्दल आम्ही तुझे ऋणी आहोत.’ – सौ. सुप्रिया सुहास शिंदे आणि श्री. सुहास शिंदे (आई-वडील), कुसगाव बुद्रुक, जिल्हा रायगड. (२.३.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF