सात्त्विकता आणि चैतन्य प्रदान करणार्‍या सोन्याच्या अलंकारांचे महत्त्व

सोन्याचे अलंकार तेजाशी संबंधित चैतन्य उत्तम प्रकारे ग्रहण आणि प्रक्षेपण करू शकत असल्याने या चैतन्याचा परिणाम होऊ नये, म्हणून वाईट शक्तींनी आधीच साधिकांनी घातलेले सोन्याचे अलंकार काढून टाकणे

‘१६.११.२००६ या दिवशी साधिकांना त्रास देणार्‍या वाईट शक्तींवर भारतीय आणि पाश्‍चात्त्य संगीत यांचा काय परिणाम होतो, याचा अभ्यास करण्यासाठी सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात नादाचे विविध प्रयोग केले. त्या वेळी वाईट शक्तींनी प्रयोग चालू होण्यापूर्वीच साधिकांच्या अंगावरील सोन्याचे अलंकार काढून टाकले. अलंकार काढून टाकण्यामागे पुढील कारण असल्याचे लक्षात आले.

तेजतत्त्वाशी संबंधित सोन्याचे अलंकार तेजाशी संबंधित चैतन्य उत्तम प्रकारे ग्रहण आणि प्रक्षेपण करू शकत असल्याने या चैतन्याचा परिणाम होऊ नये, यासाठी वाईट शक्तींनी सतर्कता म्हणून आधीच अलंकार काढून टाकले. नादातील गतीमान तेजतत्त्वामुळे अलंकारांतील तेजतत्त्व कार्यरत होऊन त्यात साठवलेल्या काळ्या शक्तीचे विघटन करून देहावरही परिणाम करते; म्हणून शक्यतो वाईट शक्ती अलंकारांचा देहाला होणारा स्पर्श टाळतात.

अनुभूती

सोन्याच्या वस्तूकडे बघितल्यावर आध्यात्मिक उपाय होणे आणि डोक्यावर शीतलता अन् जिभेवर चांगल्या संवेदना जाणवणे : ‘२४.१०.२००६ या दिवशी सोन्याच्या वस्तूकडे बघितल्यावर मला खोकला आला, तसेच ढेकरा आणि जांभयाही येऊ लागल्या. (सोन्यातून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यामुळे आध्यात्मिक उपाय होऊन शरिरातील काळी शक्ती खोकला, ढेकरा आणि जांभया यांच्या माध्यमातून बाहेर पडली. – संपादक) सोन्याच्या वस्तूतून सात्त्विक आणि चैतन्यमय किरण बाहेर पडून त्यांचा माझ्या शरिराला स्पर्श होऊन तेथील काळी शक्ती उणावली (न्यून झाली) असे मला जाणवले.

थोड्या वेळाने मला डोक्यावर शीतलता आणि जिभेवर चांगल्या संवेदना जाणवल्या आणि माझा श्‍वास एका लयीत होऊ लागला. तेव्हा माझ्या नाकातील काळी शक्ती उणावल्यामुळे नाक मोकळे झाले. माझे डोके आणि पाठ यांवर मला चांगल्या संवेदना जाणवू लागल्या. मला शांत आणि स्थिर वाटू लागले.’

– कु. रजनी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

सोन्यातून प्रक्षेपित होणार्‍या तेजोमय लहरींमुळे स्त्रीमधील शक्तीतत्त्व कार्यरत होणे

‘अलंकार सोन्याचे असल्याने, तसेच सोने हा धातू तेजोमय, म्हणजेच तेजतत्त्व प्रदान करणारा असल्याने या धातूतून प्रक्षेपित होणार्‍या तेजोमय लहरींमुळे स्त्रीच्या शरिरातील सूर्यनाडी कार्यरत होऊन तिच्या आधारे स्त्रीमधील शक्तीतत्त्व कार्यरत होऊन संपूर्ण कुटुंबाचे रक्षण करते.’ – एक विद्वान (सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ ‘एक विद्वान’, या टोपणनावानेही लिखाण करतात. १७.१२.२००५)

‘सोन्याच्या अलंकारांमुळे व्यक्तीला अधिक प्रमाणात ईश्‍वरी ऊर्जा ग्रहण करणे शक्य होते.’

– एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, १६.४.२००७)

सोन्याच्या आणि चांदीच्या अलंकारांमुळे वाईट शक्तींपासून रक्षण होणे

स्त्रिया या पुरुषांपेक्षा अधिक संवेदनशील असल्याने त्यांच्यावर चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रकारच्या शक्तींचा लवकर परिणाम होतो अन् तो अधिक काळ टिकतो. अलंकार बनवण्यासाठी वापरण्यात येणार्‍या सोने आणि चांदी या धातूंमुळे त्या त्या प्रकारच्या वाईट शक्तींचे आक्रमण परतवले जाते. अन्य त्रासदायक लहरींपासून स्त्रीचे रक्षण होते. स्त्रियांतील सात्त्विकता वाढावी आणि वाईट शक्तींपासून त्यांचे रक्षण व्हावे, यासाठी स्त्रियांनी अलंकार घालावेत.


Multi Language |Offline reading | PDF