वसंतगौरीचा गौरव !

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी जे जे पुण्य करावे, ते ते ‘अक्षय्य’ होते, अशी हिंदूंची श्रद्धा आहे. हा दिवस वसंतोत्सवाचा आहे. चैत्र शुक्ल पक्ष तृतीयेपासून अक्षय्य तृतीयेपर्यंत ‘वसंतगौरी’चा उत्सव सर्व देवींच्या देवालयांत चालू असतो. मथुरा, वृंदावन, अयोध्या, काशी, द्वारका आदी ठिकाणच्या देवालयांतील उत्सव अत्यंत प्रेक्षणीय होतात. वसंत ऋतु सर्व ऋतूंत अत्यंत आल्हाददायक असतो.

कौमार्यावस्थेत माहेरी असलेल्या वसंतगौरी यौवनावस्था प्राप्त होताच अक्षय्य तृतीयेला श्‍वशुरगृही जातात. यामागील भावार्थ हाच की, याच सुमारास सृष्टीतील झाडे वैवाहिक स्थितीचा उपभोग घेऊन फलद्रूप होतात. आम्रादिक वृक्षांना लुसलुशीत पालवी आणि सुंदर फुले आलेली असतात अन् वैशाखाच्या आरंभी त्यांना फळे दृष्टीस पडतात. सृष्टीस यौवन आणि मातृत्व प्राप्त झालेले असते. धर्मशास्त्राने या दिवसाला सणाचे महत्त्व प्राप्त करून दिले. वैशाखाच्या आरंभी कडक उन्हाळा भासू लागतो, त्या वेळी तहानलेल्यांना पाणी देणे, हे पुण्यकर्म समजून उदककुंभ देण्याची वहिवाट पडली. दक्षिण भारतात याच दिवशी रहदारीच्या रस्त्यांवर पांथस्थांना गार पाणी पिण्यास देण्याची चाल आहे. अक्षय्य तृतीयेला काही जण ‘आखाजी’ किंवा ‘आखती’ असेही म्हणतात. या दिवसाच्या शुभमुहूर्तावर कोकणात शेतकरी लोक पेरणी करतात. वसंतगौरीच्या या उत्सवास चैत्रा गौरी किंवा दोलोत्सव असेही नाव आहे. या दिवशी वसंत कालास योग्य असे नृत्यगायनादि विधी आणि वसंतपूजा करण्याची वहिवाट आहे. शास्त्रकारांनी या तात्त्विक, प्रणयोत्पादक आणि हर्षदायक कालास देवतेच्या ठिकाणी मानले आहे.

संदर्भ : ‘दिनविशेष (भारतीय इतिहासाचे तिथीवार दर्शन)’ (लेखक : प्रल्हाद नरहर जोशी, पुणे. (प्रथम आवृत्ती : वर्ष १९५०))


Multi Language |Offline reading | PDF