कुठल्याही सत्कार्याचे अक्षय्य फळ देणारी साडेतीन मुहूर्तांपैकी एक ‘अक्षय्य तृतीया’ !

१. देवतांनी अवतार घेणे, महाभारताच्या रचनेचा आरंभ, त्रेतायुगाचा प्रारंभ इत्यादी वैशिष्ट्यपूर्ण घटना अक्षय्य तृतीयेला होणे : ‘भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय मुहूर्त आणि अक्षय्य फळ देणारी ती ‘अक्षय (अक्षय्य) तृतीया’ या वर्षी मंगळवार, ७.५.२०१९ या दिवशी आहे. याच तिथीला भगवान परशुरामाची जयंती आहे. या दिवशी केलेले कार्य दोषविरहित होते आणि क्षय (नष्ट) होत नाही.  त्रेतायुगाचा प्रारंभही याच तिथीला झाला होता. बुधवारी येणारी तृतीया रोहिणी नक्षत्रात असेल, तर ती पुष्कळ शुभ मानली जाते. या दिवशी गंगामाता पृथ्वीवर अवतरली आणि याच दिवशी अन्नपूर्णादेवीही अवतरली होती. याच दिवशी वेदव्यासांनी महाभारत ग्रंथाची रचना चालू केली. कुबेरही याच दिवशी धनाध्यक्ष झाले आणि युधिष्ठिराला याच दिवशी ‘अक्षय्यपात्र’ मिळाले. आदि शंकराचार्यांनी याच दिवशी ‘कनकधारा’ स्तोत्राची रचना केली होती.

२. अक्षय्य तृतीयेचा कधीही लोप न होणे, तसेच ती सर्व मंगल आणि पुण्य कार्यांसाठी अतिशय शुभ असणे : भारतीय वाङ्मयात अक्षय्य तृतीयेला पुष्कळ महत्त्व आहे. भारतीय पंचांगातील तिथीचा लोप होणे किंवा वाढणे एक सामान्य गोष्ट आहे; परंतु ही तिथी स्थिर (स्थायी) आहे. तिचा कधीही लोप होत नाही. ही तिथी सर्व प्रकारच्या मंगल आणि पुण्य कार्यासाठी अतिशय शुभ मानली जाते. याच दिवशी सोने, चांदी इत्यादी मौल्यवान वस्तू विकत घेतल्या जातात. या दिवशी नवीन व्यवसाय आणि नवीन उपक्रम चालू करणे श्रेष्ठ मानले जाते. ही तिथी विवाहासाठी अत्यंत शुभ मानली जाते; म्हणून या दिवशी एकत्रित (सामूहिक) विवाह केले जातात.’

(संदर्भ : श्री विश्‍वशांति टेकडीवाल परिवार, कांदिवली (पूर्व), मुंबई.)


Multi Language |Offline reading | PDF