सूरत (गुजरात) येथील देना आणि बँक ऑफ बडोदा या बँकांमध्ये तोंडवळा झाकून येण्यावर बंदी

असा नियम सर्वच बँका, खासगी आणि सरकारी कार्यालये यांमध्ये का केला जात नाही ?

सूरत (गुजरात) – येथील अंबाजी मार्गावर असणार्‍या बँक ऑफ बडोद्याच्या शाखेने तोंडवळा (चेहरा) झाकणारी कोणतीही वस्तू घालून बँकेत येण्यावर बंदी घातली आहे. शिरस्त्राण, स्कार्फ, मोठ्या आकाराचा चष्मा आदींवरही बंदी घालण्यात आली आहे. अशा प्रकारचा नियम देना बँकेनेही केला आहे. बँकांच्या बाहेर यासंदर्भात फलक लावण्यात आले आहेत. पोलिसांच्या निर्देशानुसार असा नियम करण्यात आल्याचे यावर लिहिण्यात आले आहे.

१. बँक ऑफ बडोद्याचे व्यवस्थापक नवीन गोखिया म्हणाले की, या निर्णयातून कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. बुरख्याविषयी लोकांना आक्षेप होता. तो शब्द हटवून तेथे ‘स्कार्फ’ लिहिण्यात आला आहे.

२. सूरतचे पोलीस आयुक्त सतीश शर्मा म्हणाले की, पोलिसांनी अशा प्रकारचे कोणतेही निर्देश दिलेले नाहीत.

३. सूरतचे जिल्हाधिकारी म्हणाले की, बँकेविषयी आमच्याकडे कोणतीही तक्रार आलेली नाही.

४. मुसलमानांचे नेते आणि अधिवक्ता बाबू पठाण म्हणाले की, मी आमच्या धर्मातील कोणत्याही पोषाखावरील बंदीचा निषेध करतो. बुरख्यावर बंदी घालता येणार नाही. बँकेच्या व्यवस्थापनाने असे म्हटले पाहिजे की, सुरक्षेच्या कारणावरून कोणीही त्यांचा तोंडवळा झाकू नये.

बुरख्यावर बंदी घातली पाहिजे ! – उत्तरप्रदेशातील भाजपचे आमदार संगीत सोम

नवी देहली – बुरख्याच्या आडून लोकशाहीवर घाला घातला जात आहे. बनावट मतदान होत आहे. बुरख्याच्या आडून आतंकवाद फोफावत असल्याने यावर तत्काळ बंदी घातली पाहिजे, अशी मागणी भाजपचे उत्तरप्रदेशमधील सरधना मतदारसंघातील आमदार संगीत सोम यांनी केले आहे. या संदर्भात सोम यांनी फेसबूकवर एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. (देशात आणि उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना भाजपचे आमदार अशी मागणी त्यांच्या सरकारकडे का करत नाहीत ? उलट भाजपने अधिकृतरित्या बुरखाबंदीची मागणी फेटाळून लावली आहे ! म्हणजे भाजपमध्ये या संदर्भात दोन विचार आहेत, हे लक्षात येते ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF