परात्पर गुरु डॉ. आठवले – शास्त्रज्ञ वृत्तीचे उच्च कोटीचे संत !

डॉ. (सौ.) नंदिनी सामंत

‘सर्वसाधारणपणे अध्यात्मातील अधिकारी व्यक्ती त्यांना प्राप्त झालेल्या सिद्धींमुळे किंवा त्यांच्या गुरूंच्या कृपेने विविध क्षेत्रांत बुद्धीअगम्य कार्य करतांना दिसतात, उदा. मोठ्या प्रमाणात व्यसनमुक्ती घडवून आणणे, असाध्य आजार बरे करणे इत्यादी. या संदर्भातील अनेक दाखले आपले धर्मग्रंथ, तसेच संतचरित्रे यांमध्ये आढळतात. सामान्य व्यक्ती या घटनांकडे ‘चमत्कार’ या दृष्टीने पहाते आणि असे ‘चमत्कार करणार्‍याला नमस्कार’ करते ! ‘चमत्कार करणारा’ आणि ‘चमत्कार करणार्‍याला नमस्कार करणारा’ असे दोघेही ‘हा चमत्कार कसा झाला, त्यामागील शास्त्र काय आहे ?’ याचा विचार करत नाहीत. चमत्कार झाला, यावरच ते अल्पसंतुष्ट असतात. त्यामुळे हे ‘चमत्कार’ केवळ त्या एका अधिकारी व्यक्तीपुरते मर्यादित रहातात. ते अधिकारी पुरुष दुसर्‍याला असे ‘चमत्कार’ करायला शिकवू शकत नाहीत. उच्च कोटीतील संतांना असे चमत्कार घडवून आणावे लागत नाहीत. त्यांच्या केवळ अस्तित्वाने अनेक बुद्धीअगम्य घटना घडत असतात. परात्पर गुरु डॉ. आठवले हे असेच उच्च कोटीतील संत आहेत. त्यांच्या केवळ अस्तित्वानेच घडणार्‍या अनेक बुद्धीअगम्य घटना ‘केवळ चमत्कार’ असे म्हणून सोडून न देता, त्या घटनांमागे कोणते शास्त्रीय कारण आहे, याचा ते गेली ३७ वर्षे न कंटाळता अव्याहतपणे वेध घेत आहेत. हेच त्यांच्यातील संतत्वामागील शास्त्रज्ञवृत्तीचे गमक आहे. त्यामुळेच त्यांच्या अस्तित्वामुळे घडत असलेले चमत्कार (म्हणजे बुद्धीअगम्य घटना) याचे विश्‍लेषण ते एकट्या-दुकट्याला नाही, तर संपूर्ण समाजाला शिकवू शकले आहेत.

लोलकाद्वारे परीक्षण करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले (२९.१२.२००९)

संशोधनासाठी स्वतःच्या वस्तू अभ्यासपूर्वक जतन करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

विविध वस्तूंमध्ये होणारे पालट अभ्यासण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विविध वस्तूंचे जतन केले आहे. एवढेच नव्हे, तर स्वतःचे केस आणि नखे यांचेही जतन केले आहे.

१. नखे जतन करण्याच्या पद्धतींत टप्प्याटप्प्याने झालेले पालट

परात्पर गुरु डॉ. आठवले जतनाच्या प्रत्येक वस्तूवर जतनाचा दिनांक आणि वस्तू कोणती हे लिहितात.

अ. हातांच्या आणि पायांच्या बोटांची नखे एकत्र जतन करणे

आ. हातांच्या आणि पायांच्या बोटांची नखे निरनिराळी जतन करणे

इ. उजव्या आणि डाव्या हातांच्या अन् पायांच्या बोटांची नखे निरनिराळी जतन करणे

ई. उजव्या आणि डाव्या हातांच्या अन् पायांच्या प्रत्येक बोटाची नखे निरनिराळी जतन करणे

२. केस जतन करण्याच्या पद्धतींत टप्प्याटप्प्याने झालेले पालट

अ. सर्व केस एकत्र जमा करणे

आ. डोक्याचे आणि दाढीचे केस निरनिराळे जतन करणे

इ. मांडीचे केस निराळे जतन करणे

ई. नाकातील केस निराळे जतन करणे

– (पू.) श्री. संदीप आळशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१. बुद्धीअगम्य घटनांमागील शास्त्र शोधण्याची वृत्ती !

त्रास असलेल्या स्थानी मुद्रा करून नामजप करणारा साधक

परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओढ पहिल्यापासून ‘साध्या’कडे (end result कडे) नाही, तर त्या साध्यामागील कारणे जाणण्याकडे (wanting to know the basic laws) अधिक आहे. हे सूत्र आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊया. वर्ष २००० पासून सनातनच्या साधकांना सूक्ष्मातील वाईट शक्तींमुळे त्रास होऊ लागला. त्यावर आरंभी अशा प्रकारच्या त्रासांवर आध्यात्मिक उपाय करणार्‍या अनेक संतांनी सनातनच्या साधकांवर उपाय केले. त्या उपायांना काही प्रमाणात यशही आले; परंतु हे उपाय चालू असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे लक्ष केवळ ‘साधकांचे त्रास कमी होत आहेत ना ?’ यावर मर्यादित न रहाता, ‘ते संत नेमके काय करत आहेत’, ‘संतांच्या कृतीमुळे सूक्ष्म स्तरावर कोणती प्रक्रिया घडते’, ‘साधकांच्या त्रासात घट नेमकी कशामुळे होते’, याकडे असायचे. वर्ष २००० ते वर्ष २००३-२००४ पर्यंत अनेक संतांनी केलेल्या उपायांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी बारकाईने अभ्यास केला.

‘वाईट शक्तींचा त्रास असणार्‍यांवर नामजपादी उपाय कसे करावे’, हे शिकण्यासाठी एका संतांकडे ते सतत ३ मास प्रतिदिन जात राहिले. त्यानंतर त्यातून शिकायला मिळालेल्या मूलभूत सूत्रांवर आधारित त्यांनी ‘वाईट शक्तींचे त्रास म्हणजे नेमके काय’, ‘त्याचे प्रकार काय असतात’, ‘त्यावर उपाय कसे करायचे’, ‘संतांनी प्रत्यक्ष केलेल्या नामजपादी उपायांना साधक वैयक्तिक स्तरावर करावयाच्या कोणत्या उपायांची जोड देऊ शकतात’ आदी सूत्रांचा बारकाईने अभ्यास केला. या अभ्यासातून सूक्ष्मातील वाईट शक्तींच्या विश्‍वाविषयीच्या ज्ञानाचे एक मोठे दालन त्यांनी जगासाठी खुले केले. वाईट शक्तींविषयीची, तसेच त्यांचा त्रास कसा ओळखायचा, त्यांच्या त्रासावरील पीडित व्यक्तीने स्वतः करावयाच्या विविध उपायांची माहिती सनातनची नियतकालिके, ग्रंथ, ध्वनीचित्रफिती आणि संकेतस्थळे यांच्या माध्यमातून सर्व जगाला विनामूल्य उपलब्ध करून दिली. आज ही माहिती जगभरातील सर्वांना घरबसल्या उपलब्ध झाली आहे. अशा रितीने या अत्यंत क्लिष्ट अशा सूक्ष्मातील समस्या, तसेच त्यावरील उपाय यांविषयीही त्यांनी प्रत्येक स्तरावर मूलभूत शास्त्र शोधून काढल्याने या समस्येने पीडित असलेल्या जगभरातील व्यक्तींना उपायांच्या संदर्भात स्वयंपूर्ण केले.

२. ‘प्राणीमात्रांचे मूलभूत भले करण्याची तळमळ’ हे परात्पर गुरु डॉक्टरांच्या संशोधक वृत्तीचे मूळ !

सर्वसाधारणतः बहुतांश शास्त्रज्ञांच्या संदर्भात अंगभूत जिज्ञासा, लोकेषणा, आर्थिक स्वार्थ ही संशोधनाची प्रेरणास्थाने असल्याचे दिसते; परंतु परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संदर्भात मात्र ‘प्राणीमात्रांप्रती १०० टक्के प्रीती’ याच्या जोडीला ‘प्राणीमात्रांचे मूलभूत भले करण्याच्या तळमळीतून प्रेरित १०० टक्के जिज्ञासा’, हे त्यांच्या संशोधक वृत्तीचे मूळ असल्याचे जाणवते. त्यांनी कधीही ‘केवळ संशोधनासाठी संशोधन’ केले नाही. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेल्या आध्यात्मिक संशोधनाचा उद्देश समाजाला ‘हिंदु धर्माची महती कळावी’, ‘साधनेचे महत्त्व समजावे’ आणि ‘सर्वांनी स्वतः साधना करून आनंदप्राप्ती करून घ्यावी’ हाच आहे. या तळमळीपोटीच त्यांनी विविध प्रकारच्या सहस्रावधी आध्यात्मिक घटनांचे ‘न भूतो न भविष्यति’ एवढे संशोधन केले. त्याचसह पुढील पिढ्यांना त्याचा अभ्यास करता यावा, यासाठी अशा सकारात्मक आणि नकारात्मक शक्तींशी निगडित आध्यात्मिक घटना, उदा. उच्च कोटीच्या संतांनी केलेले यज्ञ किंवा आध्यात्मिक त्रास असलेल्या व्यक्तीतील वाईट शक्तीचे दृश्य प्रकटीकरण यांचे ‘जगभरात कदाचित अन्यत्र कुठेही उपलब्ध नसेल’, असे सहस्रावधी घंट्यांचे चित्रीकरण करून ठेवले आहे.

३. स्वतःतील संशोधक वृत्ती इतरांमध्ये रुजवून त्यांच्याकडूनही सक्षमपणे कार्य करवून घेणे !

वाईट शक्तींच्या संशोधनाच्या अंतर्गत ‘त्रास होणार्‍या साधकांना काही शारीरिक आजार आहे का’, याविषयी अभ्यास करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले आणि डॉ. (सौ.) नंदिनी सामंत (वर्ष २००८)

सामान्यतः स्वतःत संशोधक वृत्तीचे पोषण करणे आणि तिचा विकास करणे, हेच कठीण असते. त्यामुळे एखाद्या संशोधकाने कोणा सामान्य व्यक्तीमध्ये संशोधकदृष्टी रुजवणे, त्या व्यक्तीला संशोधन शिकवणे, हे अत्यंत कठीण आहे. या पार्श्‍वभूमीवर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निर्माण केलेला महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचा संशोधन विभाग अपवाद ठरतो. या विभागात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली होणार्‍या संशोधनाची व्याप्ती पहाता परात्पर गुरूंची तळमळ आणि आध्यात्मिक अधिकार आपण समजू शकतो.

अन्यत्र एखाद्या व्यक्तीची ‘संशोधक’ म्हणून नियुक्ती करतांना तिने किमान त्या क्षेत्रातील शिक्षण किंवा निदान प्रशिक्षण घेतलेले असणे अनिवार्य असते; परंतु परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अक्षरशः संशोधनाची काहीही माहिती, तसेच शिक्षण नसलेल्या साधकांना संशोधन गटात घेऊन त्यांच्यात संशोधक वृत्ती, तसेच संशोधन कौशल्य निर्माण केले. या गटात विविध वैज्ञानिक उपकरणांनी संशोधन करणारे साधक, यांच्या जोडीला सूक्ष्मातील संशोधन करणारे साधक, चाचण्यांतील मोजण्यांच्या नोंदींचे टंकलेखन करणारे, विश्‍लेषण करणारे, विश्‍लेषणात्मक लेख लिहिणारे, तसेच वैज्ञानिक परिषदांमध्ये सादर करण्यासाठी शोधप्रबंध लिहिणारे, शोधप्रबंध सादर करणारे, असे अनेक साधक घडवले. त्या त्या साधकामध्ये आवश्यक त्या प्रत्येक कौशल्याचा विकास करण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अत्यंत परिश्रम घेतले आहेत.

या परिश्रमांची माहिती सर्वांना व्हावी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वैज्ञानिक संशोधनाचे कार्य, त्याद्वारे घडलेले परात्पर गुरूंचे गुणदर्शन त्यांच्या ७७ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने त्यांच्याच कोमल चरणी अर्पण !’.

४. कृतज्ञता आणि प्रार्थना

हे गुरुदेव, ‘माझ्यामध्ये जिज्ञासा आणि तळमळ हे संशोधनासाठी आवश्यक किमान मूलभूत गुण नसूनही तुम्ही मला तुमच्या संशोधन गटात सामावून घेतले ! यायोगे आजवर तुम्ही घडवलेल्या या अभूतपूर्व लोककल्याणकारी संशोधन इतिहासाची केवळ साक्षीदार नाही, तर कार्यकर्ता बनून त्यात प्रत्यक्ष सहभागी व्हायची संधी गेली २० वर्षे मला दिलीत. एवढ्या वर्षांत डोळ्यांसमोर घडलेल्या अद्भुत संशोधनाचा कधी एकत्रितपणे विचार झालाच नाही. ‘या लेखाची सेवा ईश्‍वराच्या कृपेने मला मिळाली आणि तुम्हीच ती माझ्याकडून करवून घेतली’, असे तुमच्याच कृपेने जाणवत आहे. त्यानिमित्ताने या अज्ञानी जिवाला तुमच्या संशोधन कार्याची व्याप्ती अंशरूपाने का होईना; पण लक्षात येऊन, त्यायोगे मला तुमची महती लक्षात आली. परिणामस्वरूप माझ्यात भाववृद्धी झाली. यासाठी तुमच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करायला शब्दच नाहीत. तुम्ही कृपाप्रसादे मला दिलेली संशोधनसेवा यापुढे परिपूर्ण आणि भावपूर्ण करून तुमच्या अखंड कृपेला प्राप्त होऊन या जिवाचा उद्धार व्हावा, यासाठी अविरत प्रयत्न करवून घ्या’, अशी तुमच्या चरणी अनन्यभावे प्रार्थना आहे !’

– डॉ. (सौ.) नंदिनी सामंत, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा.


Multi Language |Offline reading | PDF