एकमेवाद्वितीय संशोधक !

संपादकीय

‘जिज्ञासू हाच खरा ज्ञानाचा अधिकारी आहे’, असे म्हटले जाते. जिज्ञासा असेल, तर ‘असे का?’ असे प्रश्‍न पडतात आणि मग चालू होतोे त्यामागील कारणे शोधण्याचा प्रयत्न ! मनुष्यामध्ये मुळातच जिज्ञासू वृत्ती असल्याने सृष्टीच्या उत्पत्तीपासून तो जिज्ञासेने प्रत्येक गोष्ट जाणून घेत आहे. ही त्याच्यातील संशोधक वृत्तीच आहे. प्रत्येक व्यक्ती जीवनामध्ये काही ना काही तरी संशोधन करतच असते. ‘जीवन जगण्याची कला हेसुद्धा एक संशोधन आहे’, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. आज याच संशोधक वृत्तीमुळे विज्ञानाने मंगळावर यान पाठवण्याचा प्रयत्न केला. उपग्रहांद्वारे संपर्कयंत्रणा निर्माण केली. हे सर्वच भौतिक संशोधनाच्या परिणामांचे यश आहे. अशा संशोधकांची संख्या लक्षावधीत असणार आहे; मात्र त्याच वेळेस ‘आपण जीवन कशासाठी जगत आहोत?’, ‘मी कोण आहे?’, ‘माझी उत्पती कुठून झाली?’, ‘देव आहे का ?’, ‘भुते आहेत का ?’ ‘असुर असतात का ?’ ‘चमत्कार होतात का ?’ यांसारखी उत्तरे शोधणारे संशोधक या पृथ्वीतलावर पुष्कळच अल्प आहेत, असे म्हणावेसे वाटते. आपल्या जीवनाचा उद्देश जाणण्याची जिज्ञासा असणारे आणि ती जाणून उद्देशापर्यंत जाण्याचा प्रयत्न करणारे हाताच्या बोटावर मोजता येण्याएवढे असू शकतात. ‘भारत जगाचा आध्यात्मिक गुरु आहे’, असे म्हटले जाते. यास कारण असे की, स्वतः जन्माला येण्याचे कारण, त्यामागील उद्देश या अनादी कालापासून मनुष्याच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्‍नांची उत्तरे येथे मिळतात आणि त्यातून मनुष्याचे अंतिम ध्येय गाठण्याचे मार्गदर्शनही येथे मिळते. भारत ही गुरु, सद्गुरु, परात्पर गुरु यांची खाण आहे. यांच्यामुळेच जिज्ञासू मुमुक्षू होतो, मुमुक्षू साधना चालू करून साधक होतो आणि तो पुढे शिष्य होऊन गुरूंच्या कृपेने संत, गुरुही होतो. सध्याच्या विज्ञानयुगात, बुद्धीप्रामाण्यवाद्यांच्या आणि केवळ सुख उपभोगणार्‍यांच्या काळात, तसेच पाश्‍चात्त्यांच्या विकृतीच्या अनुकरणामुळे अशी जिज्ञासा असणारे पुष्कळच अल्प झाले आहेत. अशा वेळी पैसा, प्रसिद्धी आणि प्रचंड बुद्धीमत्ता असतांना केवळ अन् केवळ जिज्ञासू वृत्तीमुळे संमोहन उपचारतज्ञ असणारे परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी ३७ वर्षांपूर्वी अध्यात्म जाणण्याचा प्रयत्न चालू केला. त्यातून पुढे सनातन संस्थेचा जन्म झाला आणि आज सहस्रावधी जिज्ञासू हे अध्यात्म जाणून त्यानुसार साधना करून संत, गुुरु, सद्गुरु आणि परात्पर गुरु या स्थितीपर्यंत पोचले आहेत. हा कोणालाही चमत्कारच वाटेल; मात्र या चमत्कारामागील मूळ ‘बीज’ म्हणजे ‘जिज्ञासा’, हेच आहे !

बुद्धीप्रामाण्यवाद्यांचा द्वेष !

‘न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला’, असे म्हटले जाते. आता न्यूटनने नव्हे, तर भारतीय ऋषी-मुनींनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला, असे पुढे येत आहे. असो. याचा अर्थ असा होत नाही की, न्यूटनने शोध लावण्यापूर्वी गुुरुत्वाकर्षण अस्तित्वात नव्हतेच ! असे म्हणणे मूर्खपणाचेच ठरील. तसेच अध्यात्माचेही आहे. अध्यात्मशास्त्र हे अनादी आणि अनंत आहे. ‘याचा कोणी शोध लावला’, असे म्हणता येणार नाही; मात्र त्यातील तत्त्व आणि सिद्धांत यांनुसार आचरण करून अनुभूती घेणारे पुष्कळ आहेत. सनातन वैदिक धर्मामध्ये लाखो वर्षांपूर्वीपासून ऋषि-मुनींनी अनेक प्रयोग करून ईश्‍वराच्या विविध तत्त्वांची माहिती मिळवून ती ग्रंथ रूपाने समाजासमोर ठेवली. यातून पुढे कोट्यवधी लोकांनी आतापर्यंत या तत्त्वाची अनुभूती घेतली आणि घेत आहेत; मात्र सध्याच्या काळात त्याला बुद्धीच्या कसोटीवर शोधण्याचा प्रयत्न होत आहे. त्यातही पाश्‍चात्त्य जगात अशा प्रकारचे संशोधन केले जात आहे; मात्र भारतात कूपमंडूक वृत्तीचे बुद्धीप्रामाण्यवादी मात्र ईश्‍वरी तत्त्वांना, देवतांना, विविध शास्त्रांना नाकारण्याचे अज्ञान दर्शवत आहेत. गुरुत्वाकर्षण डोळ्यांनी दिसत नाही; मात्र ते न्यूटनने दाखवून दिले; म्हणून ते मान्य केले जाते; मात्र हिंदु धर्मातील, सनातन वैदिक धर्मातील विविध आचारधर्मांमुळे होणारे आध्यात्मिक लाभ नाकारण्याचा नतद्रष्टपणा केला जातो. अशा बुद्धीप्रामाण्यवाद्यांकडे जिज्ञासाच नसल्याने किंवा द्वेषापोटीच अशी जिज्ञासा दाखवायचीच नसल्याने ते यावर टीका करण्यापलीकडे काहीही करत नाहीत, हे लक्षात घ्यायला हवे.

जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सोडवणारे संशोधक !

सनातन हिंदु धर्मातील प्रत्येक कृतीमागील आध्यात्मिक लाभ वैज्ञानिक परिभाषेत आणि वैज्ञानिक उपकरणांद्वारे जगासमोर ठेवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले हे एकमेवाद्वितीय संशोधक ठरले आहेत. गेली ३७ वर्षे अध्यात्म जाणून घेण्याविषयी त्यांनी दाखवलेल्या जिज्ञासू वृत्तीमुळेच त्यांना ते शक्य झाले. काही पाश्‍चात्त्य संशोधकांनीही त्यांच्या संशोधन कार्याचे मुक्तकंठाने कौतुक केले आहे. अनेक पाश्‍चात्त्य लोकही हिंदु धर्मातील धार्मिक कृतींमागील आध्यात्मिक लाभ घेत आहेत. त्यामागील कार्यकारणभावही जाणून घेत आहेत. अनेक देशांमधील परिषदांमध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेल्या संशोधनांचे शोधनिबंध वाचण्यात आले आणि त्यांचे कौतुकही झाले. या संशोधनांचा लाभ अखंड मानवजातीला पुढे होणार आहे. ‘हिंदु धर्म म्हणजे मागासलेला आणि बुसरटलेल्या प्रथा अन् परंपरांचा धर्म’, अशी टीका पाश्‍चात्त्य आणि पाश्‍चात्त्यांचे अंंधानुकरण करणारे भारतीय करत असतात. अशांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारे हे संशोधन कोणी जिज्ञासेने अभ्यासले, तर त्याचा लाभ संबंधित व्यक्तीला या जन्मातच नव्हे, तर त्याचा पुढचा जन्म न होण्यासाठीच होईल म्हणजेच तो जीवनमुक्त होईल ! अणूबॉम्ब, परमाणू बॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब बनवून एकाच वेळी लक्षावधी लोकांचा प्राण घेण्याची शक्ती निर्माण करणार्‍या संशोधकांपेक्षा अध्यात्मातील कृतींच्या लाभाचे संशोधन करून कोट्यवधी जिवांना जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून कायमचे मुक्त करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारखे आध्यात्मिक संशोधक कधीही श्रेष्ठ ठरतात !


Multi Language |Offline reading | PDF