देवीपूजनाचे शास्त्र !

देवीची पूजा कशी करावी ?

देवीच्या कोणत्याही रूपाची पूजा करतांना तिला अनामिकेने, म्हणजेच करंगळीजवळच्या बोटाने गंध लावावे. देवीला हळद-कुंकू वाहतांना आधी हळद अन् नंतर कुंकू, उजव्या हाताचा अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन देवीच्या चरणांवर वाहावे. अंगठा आणि अनामिका जोडल्याने होणार्‍या मुद्रेमुळे पूजकाच्या देहातील अनाहतचक्र जागृत होते. त्यामुळे पूजकामध्ये भक्तीभाव निर्माण होण्यास साहाय्य होते.

विविध रूपांतील देवीला फुले कशी वाहावीत ?

देवतेच्या चरणी फुले विशिष्ट संख्येत अन् विशिष्ट रचना करून वाहिल्यास, फुलांकडे त्या त्या देवतेचे तत्त्व लवकर आकृष्ट होते. या तत्त्वानुसार देवीच्या सर्व रूपांना फुले वाहातांना ती नऊ किंवा नऊच्या पटीत आणि वर्तुळाकारात वाहावीत. वर्तुळाकारात फुले वाहतांना वर्तुळाचा मधील भाग फुलांनी भरलेला म्हणजे भरीव नसावा. देवीला अत्तर वाहतांना ‘मोगरा’ या गंधाचे अत्तर वहावे.

देवीला किती प्रदक्षिणा घालाव्यात ?

देवीला प्रदक्षिणा घालतांना विषम संख्येत म्हणजे १, ३, ५, ७ अशा संख्येत घालाव्यात. प्रत्येक प्रदक्षिणेनंतर देवीला नमस्कार करून मगच पुढची प्रदक्षिणा घालावी.

(संदर्भ : सनातनचा लघुग्रंथ ‘देवीपूजनाचे शास्त्र’)


Multi Language |Offline reading | PDF