परात्पर गुरु डॉक्टरांच्या कार्यात सर्वार्थाने समर्पण करून त्यांची निस्सीम भक्ती करणारे परात्पर गुरु पांडे महाराज !

परात्पर गुरु पांडे महाराज

१. प्रत्येक क्षणाचे महत्त्व जाणून वयाच्या ९२ व्या वर्षीही अखंड सेवारत रहाणारे परात्पर गुरु पांडे महाराज !

‘वेळ हे अमूल्य धन आहे. एकदा गेलेली वेळ पुन्हा कधीच येत नाही. त्यामुळे वेळेचा योग्य वापर होण्यासाठी परात्पर गुरु पांडे महाराज अखंड सेवारत रहायचे. अगदी पहाटे आणि सायंकाळी चालतांनाही ते त्यांच्या समवेत असलेल्या साधकाला चालू घडामोडी आणि साधना यांविषयी अमूल्य मार्गदर्शन करायचे. ते मोकळ्या वेळेत ‘दैनिक सनातन प्रभात’ आणि अनेक ग्रंथ यांचे वाचन करून त्यावर टिपणी (त्यांना सुचलेेले विचार) लिहून द्यायचे. परात्पर गुरु पांडे महाराज विविध विषयांवरील लेख, मजकूर यांचे संकलन करणे, त्या धारिका अंतिम करणे आणि साधकांना होणार्‍या आध्यात्मिक त्रासांवर मंत्रजप देणे यांसारख्या अनेक विषयांचा सतत अभ्यास करायचे. ‘ते कधी रिकामे बसले आहेत किंवा अनावश्यक झोपले आहेत’, असे कधीही दिसले नाही. वयाच्या ९२ व्या वर्षीसुद्धा त्यांचा हा दिनक्रम अखंडपणे चालू होता.

सद्गुरु राजेंद्र शिंदे

२. स्वतःकडील ज्ञान सोप्या भाषेत ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून समष्टीपर्यंत पोचवणारे परात्पर गुरु पांडे महाराज !

ज्ञानयोगी परात्पर गुरु पांडे महाराज यांना अनेक विषयांचे अफाट ज्ञान होते. त्यांनी ते ज्ञान कधीच स्वतःपुरते मर्यादित ठेवले नाही. त्यांच्या संपर्कात येणार्‍या प्रत्येकाला ते अतिशय सोप्या भाषेत ते समजावून सांगत. इतकेच नव्हे, तर ज्ञानाविषयीचे लिखाण ‘दैनिक सनातन प्रभात’साठी तत्परतेने पाठवून ते समष्टीपर्यंत पोचवायचे. त्यामुळे त्यांच्या ज्ञानामृताचा लाभ सर्व वाचक आणि साधक यांना झाला.

३. साधकांप्रती असलेल्या प्रेमभावामुळे त्यांना तळमळीने साहाय्य करणारे परात्पर गुरु पांडे महाराज !

३ अ. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी अनेक ग्रंथांचा अभ्यास करून साधकांच्या आजारांवर मंत्रोपाय सांगणे आणि ‘मंत्रजपाचे सामर्थ्य, परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या वाणीतील चैतन्य अन् त्यांचा संकल्प’ या त्रिवेणी संगमामुळे मंत्रोपाय अत्यंत प्रभावी ठरणे : परात्पर गुरु पांडे महाराज साधकांच्या दुर्धर आजारांवर मंत्रोपाय सांगायचे. साधकांना मंत्रजप देण्यासाठी ते अनेक ग्रंथांचा अभ्यास करून नवनवीन अधिक प्रभावी उपचार शोधून काढायचे. महाराज स्वतःच्या आवाजात मंत्रजप ध्वनिमुद्रित करायचे. त्यामुळे त्यांच्या वाणीतील चैतन्याचा लाभ साधकांना व्हायचा, तसेच त्यांच्या उच्च आध्यात्मिक सामर्थ्यामुळे त्यांचा संकल्पही कार्यरत व्हायचा, असे जाणवते.

मंत्रजपातील सामर्थ्य, परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या वाणीतील चैतन्य आणि त्यांचा संकल्प या त्रिवेणी संगमामुळे हे मंत्रोपाय अत्यंत प्रभावी ठरतात. वैद्यांच्या दीर्घ उपचारांनी बरे न होणारे आजार परात्पर गुरु पांडे महाराज यांनी दिलेल्या मंत्रोपायामुळे बरे होऊन व्याधीमुक्त झाल्याची अनुभूती साधकांना येते.

३ आ. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी एखादा साधक निराश किंवा दुःखी असल्याचे कळल्यास त्याच्या अडचणी समजून त्याला आत्मीयतेने मार्गदर्शन करणे, परिणामी साधक आनंदी होणे : परात्पर गुरु पांडे महाराज स्वतः सच्चिदानंद स्थितीत असलेे, तरी इतरांनाही आनंद मिळावा, यासाठी ते तळमळीने प्रयत्न करायचे. ‘एखादा साधक निराश, निरुत्साही किंवा अन्य काही कारणांमुळे दुःखी आहे’, असे कळले की, ते स्वतःहून त्याला बोलावून घ्यायचे आणि त्याच्या अडचणी अन् समस्या समजून घेऊन त्याला  आत्मीयतेने मार्गदर्शन करायचे. त्यामुळे जेव्हा साधक परात्पर गुरु पांडे महाराज यांना भेटून परत यायचा, तेव्हा त्याची निराशा आणि  दुःख पूर्णपणे जाऊन तो आनंदी दिसायचा.

४. परात्पर गुरु डॉक्टरांची निस्सीम भक्ती करणारे परात्पर गुरु पांडे महाराज !

परात्पर गुरु पांडे महाराज यांची परात्पर गुरु डॉक्टरांवर पूर्ण श्रद्धा होती. त्यांच्या प्रती उच्च स्तराचा भाव होता. ते सतत परात्पर गुरु डॉक्टरांविषयी बोलत. ‘परात्पर गुरु डॉक्टरांचे प्रत्येक लिखाण आणि कृती यांमागील उद्देश शोधून त्याचा अभ्यास करणे’, हा परात्पर गुरु पांडे महाराज यांचा ध्यास होता. ते परात्पर गुरुदेवांंविषयी बोलत असतांना भावस्थितीत जात. त्यांचे हे बोलणे ऐकायला मिळणे, हे भाग्याचेच क्षण होते; कारण ते ऐकतांना सर्वांची भावजागृती होण्यासह कृतज्ञताभावातही पुष्कळ वाढ व्हायची.’

– (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१२.३.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF