जांबूरखेडा (गडचिरोली) येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात १६ सैनिक हुतात्मा

स्वातंत्र्याच्या ७१ वर्षांनंतरही नक्षलवाद्यांच्या आक्रमणात सैनिकांना वारंवार हुतात्मा व्हावे लागणे हे संतापजनक आणि लज्जास्पद ! आता ‘आतंकवाद सहन करणार नाही’, असे म्हणणारे पंतप्रधान मोदी आतंकवाद आणि नक्षलवाद कायमचा नष्ट करण्यासाठी काय कृती करणार आहेत, हे त्यांनी सांगायला हवे !

जांबूरखेडा (गडचिरोली) –  महाराष्ट्रदिनाच्या दिवशी (१ मे या दिवशी) येथील जांबूरखेडा गावात नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात सी-६० पथकाचे (शीघ्र कृती दलाचे) १६ सैनिक हुतात्मा झाले आहेत. स्फोटापूर्वी पोलीस आणि नक्षलवादी यांच्यामध्ये काही काळ चकमक झाल्याचेही सांगितले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटद्वारे या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

१. सकाळी साडेअकराच्या सुमारास सी-६० पथकाचे सैनिक खासगी वाहनाने कुरखेडा येथून पुढे जात होते. कुरखेड्यापासून ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळील पुलावर सैनिकांचे खासगी वाहन आले असता नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला.

२. या परिसरात तब्बल २०० नक्षलवादी लपून बसल्याचे वृत्त आहे.

३. नक्षलवाद्यांनी कुरखेडा तालुक्यात ३० एप्रिलला रात्री राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे कार्यालय जाळल्याचे वृत्त आहे. या वेळी नक्षलवाद्यांनी ३० पेक्षा अधिक वाहने जाळली असून त्यात अनुमाने ५ कोटी रुपयांपेक्षा अधिक हानी झाल्याचे सांगितले जात आहे.

(म्हणे) ‘आक्रमणाच्या सूत्रधारांना सोडणार नाही !’ – पंतप्रधान मोदी

आक्रमणांच्या सूत्रधारांना सोडणार नाही असे बोलण्यापेक्षा अशी आक्रमणे कधीच होणार नाहीत, यासाठी काय प्रयत्न करत आहात ? प्रत्येक वेळी सैनिक आणि पोलीस हुतात्मा झाल्यावरच कारवाई होणार असेल, तर नक्षलवाद आणि आतंकवाद कधीतरी नष्ट होईल का ?

या आक्रमणाविषयी पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करून म्हटले की, या आक्रमणाचा मी निषेध करतो आणि सैनिकांना वंदन करतो. त्यांचे बलीदान कधी विसरले जाणार नाही. आक्रमणाच्या सूत्रधारांना सोडणार नाही.

(म्हणे) ‘आक्रमणाचे वृत्त ऐकून पुष्कळ दु:ख झाले !’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गेली ५ दशके नक्षलवादी अशी आक्रमणे करत आहेत आणि शासनकर्ते केवळ दुःख व्यक्त करण्यापलीकडे काहीही करत नाहीत, यामुळे हा नक्षलवाद नष्ट झालेला नाही, ही वस्तूस्थिती आहे !

आक्रमणाचे वृत्त ऐकून पुष्कळ दु:ख झाले असून हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांसमवेत माझ्या सद्भावना आहेत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

(म्हणे) ‘हे भ्याड आक्रमण असून कितीही निषेध केला, तरी अल्पच!’ – अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

‘हे भ्याड आक्रमण आहे’, असे चौकटीतील वाक्य प्रत्येक आक्रमणाच्या वेळी प्रत्येक शासनकर्ता म्हणत असतो; मात्र शासनकर्त्यांनी शौर्य दाखवून अद्यापपर्यंत नक्षलवाद का संपवला नाही, हे ते कधीच सांगत नाहीत ? यापुढेही अशी आक्रमणे होणार नाहीत, याची निश्‍चिती ते देऊ शकणार नाहीत, ही सुद्धा वस्तूस्थिती आहे !

हे भ्याड आक्रमण असून कितीही निषेध केला, तरी अल्पच आहे. मतदारांनी लोकशाहीच्या उत्सवामध्ये (मतदानात) शांततेत सहभाग नोंदवला. नक्षलवाद्यांनी लोकांना मतदान न करण्याचे आवाहन केल्यानंतरही लोक मतदान केंद्रांपर्यंत पोचले, याचा राग त्यांच्या मनात होता. त्यातूनच हे आक्रमण झाले असावे’, अशी माहिती राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. ‘नक्षलवाद संपवण्याच्या दृष्टीने सरकार कठोर पावले उचलेल’, असेही मुनगंटीवार म्हणाले. (गेल्या ५ वर्षांत भाजपने कठोर पावले का उचलली नाहीत, हे मुनगंटीवार का सांगत नाहीत ? – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF