पंतप्रधान मोदी यांनीही श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या पावलावर पाऊल ठेवून भारतातही ‘बुरखा’, तसेच ‘नकाब’ बंदी करावी ! – उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

पंतप्रधानांच्या अयोध्या दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेची राष्ट्रहितार्थ मागणी

मुंबई – भीषण बॉम्बस्फोटांनंतर श्रीलंकेत बुरखा आणि नकाब, तसेच चेहरा झाकणार्‍या प्रत्येक गोष्टीवर बंदी घालण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला असल्याचे राष्ट्र्रपती मैत्रिपाल सिरिसेना यांनी घोषित केले. आम्ही या निर्णयाचे स्वागत करत आहोत आणि पंतप्रधान मोदी यांनीही श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या पावलावर पाऊल ठेवून भारतातही ‘बुरखा’, तसेच ‘नकाब’ बंदी करावी, अशी मागणी राष्ट्र्रहितासाठी करत आहोत, असे मत शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी १ मे या दिवशीच्या ‘दैनिक सामना’च्या संपादकियातून व्यक्त केले आहे.

संपादकियात पुढे म्हटले आहे की,

१. श्रीलंकेत भीषण बॉम्बस्फोट झाले. कोलंबोतील बॉम्बस्फोट मालिकेत ५०० हून अधिक निरपराध्यांचा बळी गेला आहे. लिट्टेच्या आतंकवादातून मुक्त झालेला हा देश आता इस्लामी आतंकवादाचा बळी ठरला. हिंदुस्थान विशेषतः हिंदुस्थानचा जम्मू आणि काश्मीर प्रांत याच इस्लामी आतंकवादाने त्रस्त अन् जर्जर झाला आहे. श्रीलंका, फ्रान्स, न्यूझीलंड आणि ब्रिटन यांसारखी राष्ट्रे आतंकवादाच्या विरोधात कठोर पावले उचलतात, तशी पावले आपण कधी उचलणार?

२. एक तर असंख्य मुसलमान तरुणींना बुरखा झुगारायचा आहेच आणि दुसरे म्हणजे बुरख्याआडून नेमके काय चालू असते, याचा तर्क बांधता येत नाही. बुरख्यांचा वापर करून देशद्रोह, आतंकवाद घडवला जात असल्याची उदाहरणे समोर आली. तुर्कस्तान हे खरेतर इस्लाम मानणारे राष्ट्र; पण केमाल पाशाला बुरख्याआड काही घडत असल्याचा संशय येताच त्याने त्याच्या देशात मुसलमानी तरुणांची दाढी आणि बुरखा यांवर बंदी आणली.

३. मुळात बुरख्याचा इस्लामशी संबंध नाही. अरबस्तानातील वाळवंट आणि उन्हांच्या तप्त झळांपासून बचाव करण्यासाठी महिलांनी तोंडवळा झाकून बाहेर पडण्याची प्रथा कधीकाळी पडली; मात्र ‘नकाब’ किंवा ‘बुरखा’ घालणे हा जणू कुराणाचा आदेश आहे, अशा भ्रमात किंवा अंधश्रद्धेत येथील मुसलमान वावरत आहेत.

४. खरेतर मुसलमानांना त्यांचाच धर्म नीट समजलेला नाही. ‘राष्ट्र नंतर, आधी धर्म’ हा मुसलमान समाजाचा प्राधान्यक्रम आहे. मुसलमानांत कोणी फुले, शाहू निर्माण झाले नाहीत. किंबहुना होऊ दिले गेले नाहीत. त्यामुळे शहाबुद्दीन, आझम खान, ओवैसी बंधू आणि अबू आझमी या धर्मांध माथेफिरू नेत्यांचे फावले.

५. ही धर्मांधता आणि त्यांच्यातील रूढी-परंपरा राष्ट्रीय सुरक्षेच्या आड येत असतील, तर त्या मोडून काढल्या पाहिजेत. मोदी यांनीही हे सर्व करून घेतले पाहिजे. सर्जिकल स्ट्राईकइतकेच हे कार्य धाडसाचे आहे. श्रीलंकेच्या राष्ट्र्रप्रमुखांनी एका रात्रीत बुरखाबंदी केली. ‘सार्वजनिक ठिकाणी बुरखा किंवा नकाब परिधान करणे गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य ठरेल’, असे जाहीर करून श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल यांनी साहस आणि धैर्य यांचे दर्शन घडवले. रावणाच्या लंकेत जे घडले, ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार? पंतप्रधान मोदी अयोध्येला निघाले आहेत, म्हणूनच हा प्रश्‍न !


Multi Language |Offline reading | PDF