महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेल्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या कु. नंदन कुदरवळ्ळी (वय ६ वर्षे) याची प्रगल्भता !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. नंदन कुदरवळ्ळी हा एक आहे !

कु. नंदन कुदरवळ्ळी

‘दैवी बालके कशी असतात ?’, याचे कुतूहल बर्‍याच जणांना असते. येथे दिलेल्या कु. नंदन आणि त्याची आई यांच्या संभाषणावरून दैवी बालकांचे विचार किती प्रगल्भ असतात, हे लक्षात येईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

१. प्रत्येक प्रसंगाकडे आध्यात्मिक स्तरावर पहाणे

कु. नंदन : ‘आई, शाळेत शिक्षिका काय शिकवते, हे ठाऊक आहे ? आम्ही छान लिहिले ना, तर ‘देव चॉकलेट देणार आहे’, असे शिकवते.

आई : यात चुकीचे काय आहे ?

कु. नंदन : आम्ही चांगले प्रयत्न केले की, देव आशीर्वाद देतो. यावरून मला असे वाटले की, नंदनला मायेची ओढ नाही.

२. साधनेविषयी विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे विचारपूर्वक देणे

आम्ही दोघे साधनेच्या संदर्भात अनेक गोष्टींविषयी चर्चा करतो. प्रत्येक वेळी मी नंदनला काही विचारले, तर तो विचार करून त्याचे उत्तर देतो. ‘काहीतरी उत्तर देऊन मोकळे व्हावे’, असा त्याचा हेतू नसतो. त्याला काही कळले नाही, तर तो तसे प्रामाणिकपणे सांगतो. तो कधीकधी डोळे मिटून श्रीकृष्णाला प्रार्थना करून प्रश्‍नाचे उत्तर देतो.

३. सतत शिकण्याच्या स्थितीत असणे

३ अ. कु. नंदनने अर्जुनासह दुर्योधनही आवडत असल्याचे सांगून त्यामागील कारण सांगणे : मी एकदा नंदनला विचारले, ‘‘तुला अर्जुन आवडतो कि दुर्योधन ?’’ त्याने उत्तर दिले, ‘‘मला दोघेही आवडतात.’’ त्याचे हे उत्तर ऐकून मला आश्‍चर्य वाटले. मी त्याला विचारले, ‘‘दुर्योधन दुर्जन आहे. श्रीकृष्णाने त्याचा संहार केला होता, असे असतांनाही तुला तो का आवडतो ?’’ तेव्हा तो म्हणाला, ‘‘आई, मला दुर्योधनाकडूनही शिकायला मिळाले. तो गुरु द्रोणाचार्यांचा शिष्य होता. त्याच्यामध्येही गुरुभक्ती होती. श्रीकृष्णाने त्याचा संहार एवढ्यासाठीच केला; कारण तो अतिशय अहंकारी होता. मला असे वाटते की, आपणही कधीकधी दुर्योधनासारखे वागतो. आपण तसे वागलो, तर श्रीकृष्ण आपलाही संहार करील.’’ त्यानंतर त्याला विचारले, ‘‘तुला अर्जुनाकडून काय शिकायला मिळाले ?’’ तेव्हा तो म्हणाला, ‘‘आपल्या लक्ष्यप्राप्तीचा ध्यास कसा ठेवायचा, हे मला त्याच्याकडून शिकायला मिळाले.’’

३ आ. चांगले आणि वाईट या गोष्टींची नंदनला जाणीव असणे : वरील संवादातून मला शिकायला मिळाले की, मी माझ्या मनात दुर्योधन म्हणजे दुर्जन, असा ग्रह करून ठेवला होता; पण नंदनमध्ये असलेल्या शिकण्याच्या वृत्तीमुळे तो सगळ्या बाजूंनी विचार करतो. चांगले काय आणि वाईट काय ?, याची तो मला प्रत्येक वेळी जाणीव करून देतो, उदा. त्याच्या काही मित्रांच्या संदर्भात मी त्याला सांगते, ‘‘त्यांच्यात अमुक एक दोष असून तुला सतर्क रहावे लागेल.’’ तेव्हा नंदनला ते आवडत नाही. तो लगेचच म्हणतो, ‘‘आई, त्याच्यामध्ये अमुक एक गुणसुद्धा आहे. आपण त्याचे गुणही पाहिले पाहिजेत.’’

४. साधनेतील छोटे छोटे दृष्टीकोन देऊन आध्यात्मिक परिपक्वता दर्शवणे

अ. विजेचा दिवा लावण्यासाठी जसे एक बटण असते, तसेच आपले सूक्ष्म आणि स्थूल देह यांची साधना होण्यासाठी एक बटण असते आणि त्यासाठी नामजप करावा लागतो. नामजप केल्यानंतर साधनेचे बटण दाबले जाते.

आ. नंदनला माझी चूक सांगत असतांना त्याने मला दृष्टीकोन देतांना सांगितले, ‘‘आई, तू साधनेचा ‘रॉड’ घट्ट धरला नाहीस; म्हणून तुझी घसरण झाली. तू साधनेचा ‘रॉड’ घट्ट धरला पाहिजेस.’’

– सौ. सौम्या कुदरवळ्ळी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.८.२०१६)

निरपेक्षता हा गुण असणार्‍या कु. नंदन कुदरवळ्ळी याचा संतांविषयी असलेला भाव

१. पू. सौरभ जोशी

 १ अ. खोलीत शांत वाटणे : ‘मे २०१६ मध्ये काही दिवसांसाठी पू. सौरभदादा आम्ही रहात असलेल्या खोलीत (४०२ क्रमांक) रहायला होते. नंतर आम्ही त्या खोलीत परत रहायला आल्यावर तिथे शांत वाटत होते. तेव्हा नंदन लगेच म्हणाला, ‘‘पू. दादा या खोलीत राहिल्यामुळे शांत वाटत आहे.’’

१ आ. खोलीच्या बाहेर ॐ उमटणे : सप्टेंबर २०१६ मध्ये आमच्या खोलीच्या बाहेर ‘ॐ’ उमटला होता. तो नंदनने पाहिला आणि म्हणाला, ‘‘पू. सौरभदादा आमच्या खोलीत राहिले; म्हणून ‘ॐ’ उमटला आहे.’’

२. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) गाडगीळ यांच्याविषयी काढलेले उद्गार !

एकदा नंदन माझ्या भ्रमणभाषमध्ये छायाचित्रे पहात होता. त्याला सद्गुरु बिंदाताईंचे छायाचित्र दिसल्यावर तो म्हणाला, ‘‘आई, ही महालक्ष्मी वाटते ना ?’’ सद्गुरु गाडगीळकाकूंकडे बघून तो म्हणाला, ‘‘आई, ही दुर्गादेवी वाटते ना ?’’ असे म्हणत असतांना त्याच्याकडे बघून त्याला संतांप्रती वाटणारा भाव आणि भक्ती जाणवत होती.

३. पू. संदीप आळशी

एक दिवस नंदन सौ. अवनीताईंविषयी सांगतांना म्हणाला, ‘‘आई, अवनीताई म्हणजे पू. संदीपदादांची (पत्नी) ना ? ते सर्वांना साधनेत साहाय्य करतात.’’ त्या वेळी नंदनच्या मनात पू. संदीपदादांविषयी ‘कृतज्ञता भाव’ जाणवत होता.

४. एक संत

४ अ. ‘एका संतांनी नंदनची पापी घेतली नाही; म्हणून त्याला वाईट वाटले नसेल ना ?’, असा विचार मनात येणे : ७.९.२०१६ या दिवशी नंदनला एका संतांचे दर्शन झाले. तेव्हा नंदनला पुष्कळ आनंद झाला. तो त्यांना भेटण्यासाठी आतुर झाला. ते संत बालसाधकांशी बोलत होते, तेव्हा त्यांनी काही बालसाधकांना उचलून त्यांची पापी घेतली आणि सर्वांना चॉकलेट द्यायला सांगितले. हे सर्व नंदनने मला सांगितल्यावर मला वाटले, ‘नंदनची पापी घेतली नाही; म्हणून त्याला वाईट वाटले नसेल ना ?’ याविषयी मी त्याला विचारले. तेव्हा तो म्हणाला, ‘‘आई, संतांनी माझी पुष्कळ वेळा पापी घेतली आहे. एकदा सेवेच्या ठिकाणी येऊनही त्यांनी माझी पापी घेतली होती. त्यामुळे आज त्यांनी माझी पापी नाही घेतली, तरी मला छान वाटत होते. संतांचे दर्शन झाले, हीच माझ्यासाठी मोठी पापी होती.’’

४ आ. ‘देवाला अपेक्षा केलेली आवडत नाही’ हे जाणून निरपेक्ष रहाणारा नंदन : थोड्या वेळाने मी त्याला परत विचारले, ‘‘इतर मुलांची पापी घेतल्यावर माझी पापी का नाही घेतली ?’, असे तुला खरेच वाटले नाही ?’’ तेव्हा नंदन मला म्हणाला, ‘‘आई, आपण अशी अपेक्षा नाही करायची. देवाला अपेक्षा केलेली आवडत नाही. देवाला पापी घ्यायची असेल, तर तो घेईल. ‘तुम्ही माझी पापी घ्या’, असे त्यांना म्हणायचे नाही; कारण संत म्हणजे देवच असतात. ते आले हीच माझ्यासाठी मोठी पापी आहे.’’

हे नंदनचे वाक्य ऐकले आणि मला अश्रू आले. मी देवाला सूक्ष्मातून म्हणाले, ‘देवा, नंदन तुमचाच आहे आणि त्याच्या साधनेकडे तुमचे लक्ष आहे, हे तुम्ही पुन्हा सिद्ध करून दाखवलेे. माझीच श्रद्धा उणी पडत आहे. नंदन तुमच्यावर ज्याप्रमाणे निरपेक्ष प्रेम करतो, तसे मलाही करता येऊन तो आनंद घेता येऊ दे.’

– सौ. सौम्या कुदरवळ्ळी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.९.२०१६)


Multi Language |Offline reading | PDF