वेदांचा सन्मान करणारे एकत्र आले, तर आव्हाने पेलणे शक्य ! – प.पू. स्वामी गोविंददेवगिरी (पूर्वाश्रमीचे आचार्य किशोरजी व्यास)

समर्थव्रती पू. सुनील चिंचोलकर यांच्या पुण्यस्मृती विशेषांकाचे प्रकाशन

‘समर्थव्रती सुनीलजी चिंचोलकर पुण्यस्मृती विशेषांका’चे प्रकाशन करतांना मान्यवर

पुणे, २९ एप्रिल (वार्ता.) – स्वतःला पुरोगामी, मानवाधिकारवाले म्हणवणार्‍यांनी गेल्या ६० वर्षांमध्ये भारतदेश फोडण्यासाठी जाणीवपूर्वक योजना आखल्या. भारताची एकात्मता आणि त्यातून निर्माण होत असलेला समर्थ भारत ही बाहेरील देशांसह अनेकांची डोकेदुखी आहे. पूर्वी परकियांची आव्हाने होती. आता स्वकियांची आहेत. वैदिक परंपरेशी प्रामाणिकता ठेवून वेदांविषयी सन्मानबुद्धी असणार्‍यांची आणि भारताला भारतमाता मानणार्‍यांची एकी झाली, तर ही आव्हाने पेलता येतील, असे प्रतिपादन प.पू. स्वामी गोविंददेवगिरी (पूर्वाश्रमीचे आचार्य किशोरजी व्यास) यांनी केले. समर्थव्रती सुनीलजी चिंचोलकर गौरव स्मृतीग्रंथ समिती आणि समर्थ व्यासपीठ यांच्या वतीने २८ एप्रिल या दिवशी भरतनाट्य मंदिर येथे ‘समर्थव्रती सुनीलजी चिंचोलकर पुण्यस्मृती विशेषांका’चे प्रकाशन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

या प्रसंगी विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, समर्थभक्त मोहनबुवा रामदासी, समर्थभक्त योगेशबुवा रामदासी, ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर, ह.भ.प. मंगलाताई कांबळे, गुरुकुल संस्थेचे डॉ. अशोक कामत, राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे, विश्‍व हिंदु परिषदेचे संघटनमंत्री श्री. दादा वेदक, निनाद संस्थेचे श्री. उदय जोशी, श्री. प्रमोद महाराज जगताप, श्री. जगन्नाथ चव्हाण, श्री. दादासाहेब जाधव, मोरया प्रकाशनचे श्री. दिलीप महाजन, ग्राहक पेठेचे डॉ. विजय लाड, रवींद्र खरे, सौ. हर्षदा जोशी, पू. सुनील चिंचोलकर यांच्या कन्या श्रीमती अपर्णा गोस्वामी आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

या प्रसंगी ‘ग्रंथराज दासबोध – अर्थ विवरणासह’ या पू. सुनील चिंचोलकर संकल्पित ग्रंथाचे, तसेच पू. सुनील चिंचोलकर लिखित ‘चिंता करितो विश्‍वाची’ या ग्रंथाच्या ८ व्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी मान्यवरांनी पू. सुनील चिंचोलकर यांच्याविषयीच्या आठवणी जागवल्या आणि पू. चिंचोलकर यांचे समर्थ विचारांचे प्रसारकार्य पुढे चालू ठेवण्याचा निर्धार केला. कार्यक्रमाच्या प्रारंभी पू. चिंचोलकर यांच्या जीवनावर आधारित ‘समर्थव्रती’ हा व्हिडिओ दाखवण्यात आला.

‘सर्व संप्रदायांची मूळ गंगोत्री वेद आहे. संप्रदायांमधील भेद बाजूला सारून ‘वेदांना मानणारे सर्व संप्रदाय आमचे आहेत’, ही भूमिका मनात ठसवण्याची आवश्यकता आहे. या संप्रदायांच्या पूर्वासुरींनी कधी मनात भेद ठेवला नाही. संप्रदायात राहून देशाचे आणि धर्माचे काम करणे आज आवश्यक आहे. पू. सुनील चिंचोलकर यांनीही त्याचसाठी प्रयत्न केले’, असेही प.पू. स्वामी गोविंददेवगिरी यांनी स्पष्ट केले.

विशेष

पू. सुनील चिंचोलकर यांच्या आठवणी सांगतांना प.पू. स्वामी गोविंददेवगिरी यांचाही भाव दाटून आला.

मान्यवरांनी पू. सुनील चिंचोलकर यांच्या सहवासात वेचलेले क्षणमोती पू. सुनील चिंचोलकर हे लोकशिक्षक होते ! – विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर

सर्वसामान्य शिक्षक नुसते शिकवतो. त्यापेक्षा चांगल्या दर्जाचा शिक्षक विषय स्पष्ट करतो, त्यापेक्षा चांगल्या दर्जाचा शिक्षक विषयाचा विस्तार करतो आणि त्याहीपेक्षा चांगल्या दर्जाचा शिक्षक म्हणजे लोकशिक्षक अंतःप्रेरणा जागृत करतो. पू. सुनील चिंचोलकर हे लोकशिक्षक होते. शास्त्र ठाऊक असणारे आणि मनात श्रद्धा असणारे ते एक उत्तम व्यक्ती होते. ‘धर्म स्थापने जनी, राम स्थापने मनी’ अशा प्रकारे समाजाला जागृत करण्याचे कार्य त्यांनी केले.

पू. सुनील चिंचोलकर यांनी देवघरातील दासबोध प्रत्येकाच्या हृदयस्थानी ठेवला ! – ह.भ.प. मोहनबुवा रामदासी

पू. सुनील चिंचोलकर यांच्या ठायी भक्ती आणि शक्ती यांचा अपूर्व संगम होता. ज्याप्रमाणे फळ परिपक्व होते, त्याप्रमाणे सज्जनगडावर सेवा झाल्यानंतर समर्थांनी त्यांना समाजात पाठवले. देवघरातील दासबोध प्रत्येकाच्या हृदयस्थानी ठेवण्याचे कार्य त्यांनी केले.

पू. सुनील चिंचोलकर साहित्यरूपाने जिवंत आहेत ! – डॉ. अशोक कामत

पू. सुनील चिंचोलकर यांना कोणताही संप्रदाय अस्पृश्य नव्हता कि त्यांनी कोणत्याही संप्रदायाचा अभिनिवेष बाळगून कार्य केले नाही. ‘आधी केले, मग सांगितले’, अशा स्वरूपाचे त्यांचे लिखाण होते. माणसे कशीही वागली, तरी ते कधीच त्यांच्याशी प्रतिक्रियात्मक वागले नाही. त्यांनी देहत्याग करण्याच्या काही वेळ आधी भ्रमणभाष करून ‘नजीकच्या काळात कोणते कार्य करायचे आहे’, याविषयी चर्चा केली. त्यांना कार्याचा ध्यास होता. ते स्थूलदेहाने आपल्यात नसले, तरी साहित्यरूपाने जिवंत आहेत.

‘ग्राह्यं बालादपि सुभाषितम्’ वृत्तीचे पू. सुनील चिंचोलकर ! – ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर

समर्थ संप्रदायाचे असले, तरी पू. सुनील चिंचोलकर यांचा वारकरी संप्रदायाचाही अभ्यास होता. ते समर्थ संप्रदायाचे वारकरी होते. त्यांनी ज्ञानेश्‍वरीतील एक शंका विचारण्यासाठी मला दूरभाष केला होता. निरूपणकार असले, तरी त्यांनी त्यांच्यातील विद्यार्थी वृत्ती कधी लोप पावू दिली नाही, हे त्याचे उदाहरण ! मी माझ्या परीने त्यांच्या शंकेचे समाधान केले. त्यानंतर पंढरपूरला आल्यावर त्यांनी मला दोनदा नमस्कार केला. ‘दुसरा नमस्कार हा त्या उत्तरासाठी होता’, असे ते म्हणाले. ‘ग्राह्यं बालादपि सुभाषितम्’ (बालकाचे योग्य बोलणेही ग्राह्य धरावे) अशा वृत्तीचे ते होते.

सांप्रदायिक ऐक्य घडवणारे पू. सुनील चिंचोलकर ! – ह.भ.प. मंगलाताई कांबळे

‘वारकरी संप्रदाय आणि समर्थ संप्रदाय एक आहेत’, अशा प्रकारचे सांप्रदायिक ऐक्य करण्याचे कार्य पू. सुनील चिंचोलकर यांनी केले.

पू. सुनील चिंचोलकर हे लढवय्ये वीर ! – दादासाहेब जाधव

पू. सुनील चिंचोलकर हे नेहमी चांगल्या व्यक्तींच्या शोधात असायचे. देवद्रोही आणि देशद्रोही व्यक्तींनी विरोध करूनही, त्यांना कार्य थांबवण्यासाठी धमक्या मिळूनही त्यांनी त्यांचे समर्थविचारांचा प्रसार, व्याख्याने आणि लेखन यांचे कार्य कधीच थांबवले नाही. क्षात्रवृत्ती असलेले ते एक लढवय्ये वीर होते.

वेळ वाया न घालवता विमानतळावरही ‘प्रूफ रिडिंग’चे काम करणारे पू. सुनील चिंचोलकर ! – श्रीमती अपर्णा गोस्वामी

ग्रंथराज दासबोधाचे लिखाण करण्याचा संकल्प केल्यावर तो पूर्ण करायचा त्यांना ध्यासच लागला होता. एकदा गुवाहाटीहून पुण्याला येतांना विमानतळावर काही वेळ मोकळा मिळाला होता. तेव्हा त्यांनी तेथेही वेळ न दवडता या ग्रंथाचे ‘प्रूफरिडिंग’ करायला घेतले. आजारपणामुळे त्यांना आधुनिक वैद्यांनी विश्रांती घेण्यास सांगितले होते; पण ‘समर्थ काम पूर्ण करून घेतील’, या श्रद्धेने ते कार्यरत रहायचे.

ह.भ.प. योगेशबुवा रामदासी, डॉ. विजय लाड, श्री. दिलीप महाजन यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. राम साठ्ये आणि सौ. स्वाती वाळिंबे यांनी केले. सौ. मंजुषा कुलकर्णी यांनी गायलेल्या ‘आमुचा कैवारी हनुमान’ या अभंगाने, तर राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी गायलेल्या ‘कल्याण करी रामराया’ या प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली.


Multi Language |Offline reading | PDF