शिवसेनेमुळे मंदिर पडल्याचा अपप्रचार जागरूक शिवसैनिकांनी रोखला

नवी मुंबई – शिवसेनेमुळे पावणे येथील अनधिकृत बावखळेश्‍वर मंदिर पडल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने चालवलेला अपप्रचार जागरूक शिवसैनिकांनी २७ एप्रिल या दिवशी हाणून पाडला. या प्रकरणी पत्रके वाटणार्‍यांना पोलिसांच्या कह्यात देऊन मूळ सूत्रधारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवडणूक अधिकार्‍यांकडे तक्रारीद्वारे केली आहे. ही माहिती शिवसेना उपनेते विजय नहाटा यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत आणि शिवसेना जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे उपस्थित होते.

नहाटा या वेळी म्हणाले की, पावणे येथील अनधिकृत बावखळेश्‍वर मंदिर तोडण्याचा शिवसेनेशी कोणताही संबंध नाही. असे असतांनाही राष्ट्रवादी काँग्रेसने या कारवाई प्रकरणी शिवसेनेला अपकीर्त करण्याचे कुभांड रचले आहे. या आशयाची पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांचे विडंबन केलेली छायाचित्रात्मक पत्रके सर्व नवी मुंबईत वाटून मतदारांच्या धार्मिक भावना भडकवण्याचा प्रयत्न केला जात होता. ही गोष्ट शिवसैनिकांच्या लक्षात येताच पत्रकांचे वाटप करणार्‍यांना पोलिसांच्या कह्यात दिले आहे. तसेच या प्रकरणी निवडणूक अधिकार्‍यांकडे तक्रार करण्यात आली आहे. ‘अभिजित एंटरप्राइजेस’ यांनी पत्रके छापली असून याच्या सूत्रधारावर कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांनी या वेळी केली.

या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांनी ‘युतीच्या मनातील देव, देश आणि धर्म खोटा आहे. बावखळेश्‍वर मंदिर तोडण्यात आले तेव्हा शिरीष वेटा यांनी नेमकी ही कारवाई कोणामुळे झाली, याची माहिती देणारी पुस्तिका अधिकृतरित्या प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला खुशाल कह्यात घ्यावे’, अशी प्रतिक्रिया दिली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now