गोव्यातील राज्य सरकारच्या पर्यटन खात्यात ‘कचरापेटी खरेदी’ घोटाळा ! – ‘होप फाऊंडेशन’चा आरोप

पणजी – पर्यटन खात्यात मोठ्या प्रमाणात ‘कचरापेटी खरेदी’ घोटाळा झालेला आहे. माहिती अधिकाराखाली मिळालेल्या माहितीच्या आधारे हा आरोप गोवास्थित ‘होप फाऊंडेशन’ या अशासकीय संस्थेने येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत केला. या पत्रकार परिषदेला ‘होप फाऊंडेशन’चे संचालक डॉम्निक परेरा यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

पत्रकार परिषदेत संचालक परेरा म्हणाले, ‘‘गोव्यातील समुद्रकिनारपट्टीच्या स्वच्छतेचे कंत्राट ‘दृष्टी’ संस्थेला देण्यात आले आहे. गेली ५ वर्षे ही संस्था वादाच्या भोवर्‍यात सापडलेली आहे. या संस्थेकडे स्वच्छता करण्यासाठी आवश्यक अनुभव नाही आणि या संस्थेने कर्मचारीकपात केली आहे. संस्थेने समुद्रकिनारा स्वच्छ करण्यासाठीच्या शुल्कातही वाढ केलेली आहे. या संस्थेने अनेक गोमंतकियांना कामावरून काढून टाकून गोव्याबाहेरील लोकांना कामावर घेतले आहे. या संस्थेने प्रथम ६ लक्ष ७२ सहस्र १२८ रुपये खर्चून १७८, दुसर्‍यांदा १७ लक्ष रुपये खर्चून २५५, तिसर्‍यांदा २४ लक्ष ७१ सहस्र रुपये खर्चून ७१० आणि शेवटी ३० लक्ष ६३ सहस्र रुपये खर्चून ७१० ‘कचरापेट्या’ खरेदी केल्या. या संस्थेने संबंधित देयके खात्याला सुपुर्द करून शासनाकडून याचे पैसे घेतले; मात्र एकही ‘कचरा पेटी’ समुद्रकिनारपट्टीवर पोचवली नाही. संस्थेने यामधील एका देयकामध्ये फोंडा येथील ‘सरदेसाई’ इमारतीतील एका व्यावसायिकाने या ‘कचरापेट्या’ खरेदी केल्याचे म्हटले आहे; मात्र ‘होप फाऊंडेशन’चे कार्यकर्ते त्या ठिकाणी गेले असता त्यांना ‘त्या’ इमारतीत हे कार्यालय नसल्याचे आढळून आले. शासनाने या प्रकरणी अन्वेषण करून सत्य लोकांसमोर आणावे अन्यथा ‘होप फाऊंडेशन’ हे प्रकरण ‘गोवा लोकायुक्तांसमोर नेणार आहे.’’


Multi Language |Offline reading | PDF