आधुनिक वैद्यांनी सुस्पष्ट अक्षरात औषधाचे ‘जेनेरिक’ नाव लिहून देणे बंधनकारक !

रुग्णांचे हित जपण्यासाठी शासनाने ‘व्यावसायिक आचार, शिष्टाचार आणि नैतिक मूल्य विनियम २००२’मध्ये केलेल्या सुधारणा !

‘प्रत्येक वैद्य त्याची वैद्यकीय क्षेत्रात सेवा चालू करण्याआधी शपथपूर्वक वचन देतो की, ‘मानवतेच्या सेवेसाठी मी माझे जीवन अर्पण करतो.’ असे असूनही व्यवसाय चालू केल्यावर ‘अधिक धन मिळवण्याच्या हव्यासामुळे काही जण अवैध मार्गांचा अवलंब करतात’, असे दिसून येते. त्याही पुढे जाऊन स्वार्थापोटी या क्षेत्रातील काही ठेकेदारांनी जनतेच्या शोषणाचा मार्ग अवलंबला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील गलथान कारभार आणि रुग्णांची होत असलेली लूट यांवर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने ‘व्यावसायिक आचार, शिष्टाचार आणि नैतिक मूल्य विनियम २००२’मध्ये सुधारणा केल्या आहेत. यातील निवडक सुधारणा सर्वांच्या माहितीसाठी येथे दिल्या आहेत. ‘व्यावसायिक आचार, शिष्टाचार आणि नैतिक मूल्य विनियम २००२’मध्ये केलेल्या सुधारणांन्वये आधुनिक वैद्यांनी खालील नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.

१ अ. औषधांची नावे सुवाच्च अक्षरात, योग्य त्या आकारात आणि ‘कॅपिटल’ अक्षरांत लिहिणेे आवश्यक !

आधुनिक वैद्य रुग्णाला औषधे (प्रिस्क्रिप्शन) लिहून देतात. काही आधुनिक वैद्य औषधांची नावे अत्यंत गचाळ अक्षरांत लिहितात. त्यांचे अक्षर केवळ ठराविक औषध विक्री करणार्‍या दुकानदारांनाच वाचता येते. ते दुकान बंद असल्यास रुग्णाची धावपळ होते. रुग्ण आणि त्याचे नातेवाईक यांना मनस्ताप सहन करावा लागतो. रुग्णासाठी औषध मिळणे अपरिहार्य असते. ते मिळवण्यासाठी रुग्ण धडपडत असतोे. आधुनिक वैद्यांच्या या परिपाठाला सर्वसामान्य जनता वैतागून गेली आहे. देशाचे पंतप्रधानही याला अपवाद नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक वेळा विविध कार्यक्रमांत आधुनिक वैद्यांच्या लिखाणावर टिपणी केली आहे. आधुनिक वैद्यांच्या शैलीत पालट न झाल्यामुळे शेवटी शासनाला कायद्यात सुधारणा करावी लागली.

या कायद्यातील ५ व्या कलमामध्ये केलेल्या सुधारणेनुसार सर्व आधुनिक वैद्यांनी रुग्णाला औषधयोजना अथवा औषधे लिहून देतांना (‘प्रिस्क्रिप्शन’ देतांना) ते सुवाच्च अक्षरांत, योग्य त्या आकारात आणि ‘कॅपिटल’ अक्षरांत लिहिणेे बंधनकारक आहे.

अधिवक्ता नागेश जोशी (ताकभाते)

१ आ. औषधे बनवणार्‍या आस्थापनाचे नाव न लिहिता त्या औषधाचे ‘जेनेरिक’ नाव लिहून देणे बंधनकारक 

रुग्णालयातील आधुनिक वैद्य रुग्णाला एखाद्या विशिष्ट आस्थापनाची औषधे लिहून देतात. ही औषधे केवळ त्यांच्या रुग्णालयातील औषधांच्या दुकानात उपलब्ध असतात. एखादा रुग्ण उपचार घेण्यासाठी दुसर्‍या रुग्णालयात गेल्यास त्याच आजारावर दुसर्‍या आस्थापनाचे औषध दिले जाते. वास्तविक या दोन्ही औषधांतील अंगभूत घटक (कम्पोनन्ट) एकच असतात; पण औषध निर्माते वेगळे असतात. जे उत्पादक आस्थापन अधिक लाभांश देते, त्या आस्थापनाचीच औषधे आधुनिक वैद्य रुग्णाला देतात. एखाद्या आस्थापनाचे एक औषध १०० रुपयांत मिळत असल्यास दुसर्‍या आस्थापनाचे तेच औषध घेण्यासाठी प्रसंगी ५०० रुपयेही द्यावे लागतात ! औषधनिर्मिती आस्थापन करत असलेल्या या लुटीमुळे जनता हैराण झाल्याने शासनाने ‘व्यवसायिक आचार, शिष्टाचार आणि नैतिक मूल्य विनियम २००२’ प्रकरण – १ मधील ५ व्या कलमामध्ये सुधारणा केली आहे. यामुळे सर्व आधुनिक वैद्यांनी रुग्णाला औषधांचे ‘जेनेरिक’ नाव लिहून देणे बंधनकारक आहे.

१ आ १. जेनेरिक औषधे म्हणजे काय ? : औषधे बनवणार्‍या आस्थापनाने कोणतेही नवीन औषध बनवल्यानंतर त्या आस्थापनाला त्या औषधाचे ‘पेटंट’ (एकस्व अधिकार) प्राप्त होते. ‘पेटंट’मुळे त्या आस्थापनाला विशिष्ट कालावधीसाठी संबंधित औषधाविषयी सार्वभौम अधिकार प्राप्त होतात. त्या कालावधीत ते आस्थापन स्वत:चा आर्थिक लाभ करून घेते. ‘पेटंट’चा कालावधी समाप्त झाल्यानंतर हेच औषध अन्य आस्थापने बनवू शकतात. या औषधाच्या सर्व चाचण्या पूर्ण झालेल्या असतात. हे औषध बाजारात प्रचलित असते. अन्य आस्थापनांकडून तेच औषध त्याच गुणधर्माने युक्त औषधी घटकांचे प्रमाण आणि टक्केवारी एकसारखीच ठेवून ‘जेनेरिक’ औषध निर्माण केले जाते. या औषधांच्या निर्मितीचा खर्च अल्प असतो. त्यामुळे ते प्रथम उत्पादन करणार्‍या प्रस्थापित आस्थापनाच्या औषधापेक्षा अल्प मूल्यात उपलब्ध होते. भारतातील ९० टक्क्यांहून अधिक औषधांचे ‘पेटंट’ संपले आहे. त्यामुळे रुग्णांना औषधे अल्प मूल्यात मिळणे अपेक्षित आहे; मात्र औषध निर्मिती आस्थापनांवर नियंत्रण नसल्याने ही लूटमार चालू आहे.

२. प्रत्येक जिल्ह्यात किमान एक ‘जेनेरिक’ औषधालय चालू करणे अनिवार्य !

‘प्रधानमंत्री जनऔषधी’ योजनेखाली प्रत्येक जिल्ह्यात एक तरी जेनेरिक औषधालय चालू करणे अनिवार्य आहे. त्यासाठी शासनाने अनुदानही घोषित केले आहे. प्रत्येक तालुक्यात एक तरी ‘जेनेरिक’ औषधालय चालू व्हावे’, यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

३. रुग्णांनी आधुनिक वैद्यांना औषधांची ‘जेनेरिक’ नावे लिहून देण्याविषयी विनंती करावी

सध्या प्रचलित औषधांच्या किंमती प्रचंड वाढलेल्या आहेत. प्रचलित औषधांसारखे प्रमाण आणि गुणवत्ता असलेली ‘जेनेरिक’ औषधे बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण महागडी औषधे विकत घेऊ नयेत. काही वेळा आधुनिक वैद्यांकडून औषधांत पालट केला जातो. त्यामुळे रुग्णाने आधी विकत घेतलेली औषधे वाया जातात. यात त्यांची आर्थिक हानी होते. ही हानी टाळण्यासाठी ‘जेनेरिक’ औषधांचा वापर करू शकतो.

४. औषध निर्मिती आस्थापने आणि आरोग्य क्षेत्रातील कारखानदार यांच्याशी असलेले आधुनिक वैद्यांचे लागेबांधे तोडण्यासाठी आचारसंहिता

औषध निर्मिती आस्थापने आणि आरोग्य क्षेत्रातील कारखानदार यांच्याशी आधुनिक वैद्यांचे आर्थिक हितसंबंध आहेत. हे तीन घटक रुग्णांचे शोषण करून दृढ होतात. जनतेच्या पैशावर पोसली जात असलेली ही युती खंडित करण्याच्या उद्देशाने आता ‘व्यावसायिक आचार, शिष्टाचार आणि नैतिक मूल्य विनियम २००२’मधील प्रकरण ६ मधील कलम ८ मधील उपकलम १ मध्ये खालील नियम जोडले आहेत.

४ अ. आधुनिक वैद्यांनी भेटवस्तू स्वीकारू नयेत ! : वैद्यकीय व्यवसाय करणार्‍या आधुनिक वैद्यांनी औषधोत्पादक किंवा आरोग्य क्षेत्रातील कारखानदार अथवा त्यांचे प्रतिनिधी यांच्याकडून कोणत्याही प्रकारच्या भेटवस्तू स्वीकारू नयेत.

४ आ. आधुनिक वैद्यांना प्रवास सुविधा स्वीकारता येणार नाहीत ! : वैद्यकीय व्यवसाय करणार्‍या आधुनिक वैद्यांना देशात अथवा विदेशांत प्रवास करण्यासाठी औषधोत्पादक किंवा आरोग्य क्षेत्रातील कारखानदार अथवा त्यांचे प्रतिनिधी यांच्याकडून कोणत्याही प्रकारच्या प्रवास सुविधा (रेल्वे, विमान अथवा जहाज, क्रूज यांचे तिकीट) स्वीकारता येणार नाहीत.

५. नियमांचे उल्लंघन केल्यास आधुनिक वैद्यांवर कारवाई !

देशात वैद्यकीय व्यवसाय करायचा असल्यास त्याचे निश्‍चित नियम आहेत. त्याचे उल्लंघन केल्यास ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’ या वैद्यकीय व्यवसायावर नियंत्रण ठेवणार्‍या वैधानिक मंडळाद्वारे आधुनिक वैद्यांवर कारवाई होते. या पूर्वीदेखील हे सर्व स्पष्ट होतेच; परंतु ते आता बंधनकारक झाले आहे. त्यामुळे ‘रुग्णाला आधुनिक वैद्यांनी लिहून दिलेली औषधे अथवा उपचार समजण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे’, असे म्हणण्यास आडकाठी नाही.

– अधिवक्ता नागेश जोशी (ताकभाते), गोवा राज्य समन्वयक, हिंदु विधीज्ञ परिषद. (११.३.२०१९)

‘वैद्यकीय, वकिलीचे, अभियांत्रिकी इत्यादी सर्वच क्षेत्रांतील शिक्षण देतांना नैतिकता, सात्त्विकता इत्यादींचे शिक्षण न दिल्याने सर्वच क्षेत्रांत परमावधीची अधोगती झाली आहे, भ्रष्टाचार माजला आहे. त्यामुळे सरकार अन्याय दूर करणारे असे वरवरचे कायदे करते. समस्यांच्या मुळाशी न जाणार्‍या सरकारकडून कधी जनहित साधले जाईल का ?’ –  (परात्पर गुरु) डॉ. आठवले

वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्तींना वैध मार्गाने रोखण्यासाठी ‘आरोग्य साहाय्य समिती’ची मोहीम !

वैद्यकीय क्षेत्रात घुसलेल्या अनेक अपप्रवृत्तींना वैध मार्गाने रोखण्यासाठी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी संघटित होणे आवश्यक आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कटू अनुभव, तसेच आपल्या परिसरात काही अनुचित घटना घडत असल्यास त्याविषयी आम्हाला त्वरित कळवा.

चांगले आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांना नम्र विनंती !

पैसे लुबाडणार्‍या आधुनिक वैद्यांची नावे उघड करण्यासाठी कृपया साहाय्य करा. ही तुमची साधना असेल. तुमची इच्छा असल्यास तुमचे नाव गोपनीय ठेवता येईल.

आपले अनुभव कळवण्यासाठी आणि मोहिमेत सहभागी होण्यासाठी पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. पिन – ४०३ ४०१

संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१०

ई-मेल पत्ता : [email protected]


Multi Language |Offline reading | PDF